फेब्रुवारी 14, 2026

हवी तूच

सर्वांना प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! रिक्षाच्या मागे लिहिलेलं आणखीन एक घोषवाक्य – ‘तुज्यासारखी नको, तूच हवी’. त्या रिक्षावाल्याच्या – कदाचित एकतर्फी – प्रेमभावनेबद्दल बरंच काही सांगून जाणारी. हल्लीच एका मराठी चित्रपटाकरताही हेच बोधवाक्य वाचलं. त्यावर आधारित ही एक गजल.

तू ज्योत ती दिव्याची मी कृमी एक साधा
अंधारी ह्या नको गं सोडूस रानी मजला ॥

दुसऱ्या कुणाहीसाठी त्यागेन प्रीत माझी
इतुकाही तू नको गं समजूस दानी मजला ॥

म्हण हो इथे नको गं सांगू कहाणी मजला
तुजसारखी नको गं हवी तूच राणी मजला ॥

ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/VfUlk_rtxa8 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 1, 2026

मला देव पावला

लहानपणी ऐकलेल्या अनेक गोष्टींमध्ये देवाला प्रसन्न करून वर मागून घेणं ह्या गोष्टीचं अत्यंत आकर्षण वाटत असे. तुम्हाला खरंच जर देव पावला तर तुम्ही काय वर मागाल ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय? थिल्लरपणे नाही, खोल, गंभीर विचार करून... एकदा प्रयत्न करून पाहा. वाटतं तितकं ते सोपं नाही..

मला देव पावला.. 
माझ्या पुढ्यात उभा ठाकला 
गालातल्या गालात हसत म्हणाला, तुला एक वर देतो 
माग काय हवंय ते..
पण.. फक्त स्वतःकरता 
मी नास्तिक.. मीच का?? समजलं नाही..  
काय गारुड घातलं कुणास ठाऊक पण.. 
मी विचार करू लागलो

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/emRYrEG4INo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 7, 2025

इथेच

अब्जावधी शुक्राणूंपैकी एकाचा बीजांडाशी संकर होऊन तुमचा जन्म होतो ही तुमच्या अस्तित्वाकरता अशक्यकोटीतील घटना आहे. ह्या ब्रह्मांडाचा अनुभव घेण्याची संधी मिळालेले आपण सारे नशीबवान आहोत हे वादातीत. मृत्यू अवचित आणि अटळ आहे. त्यामुळे आनंद उपभोगण्याकरता हाच तो जन्म, हीच ती वेळ, हाच तो क्षण!

इथेच जगायचंय इथेच मरायचंय
जे काही करायचंय इथेच करायचंय ॥

सात जन्म सोड तार मनाची जोड
नातं कर गोड इथेच नांदायचंय ॥

किती धडपडशील किती झगडशील
जे काही कमावशील इथेच ठेवायचंय ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/okDsufc8ex0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 15, 2025

मी अभियंता

राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर मोक्षगुंडम विश्वेशवरय्या ह्या विलक्षण भारतीय अभियंत्याच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या सामाजिक माध्यमं, दूरचित्रवाणी, बँका, सरकारं वगैरेंनी प्रक्षेपित केलेल्या आभासी जगात, आपण ह्या साऱ्याचा पाया असलेल्या भौतिक जगाला कमी लेखू लागलो आहोत. मात्र ह्या पायाचं महत्त्व एक अभियंता खचितच जाणून असतो..


वस्तू असो वा वास्तू थांबे तेव्हा मी ती बनता
मी तर अभियंता ॥

दूर सारते भ्रांती
औद्योगिक ती क्रांती
माझ्यामुळेच युद्ध जरी
तरी माझ्यामुळेच शांती

मी केवळ साहित्य बनवतो नाही कुणाशी तंटा
मी तर अभियंता ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ObxKzcqpthI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 3, 2025

क्षणमित्र

मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्या दिवशी एका रिक्षाच्या मागे एकच शब्द लिहिलेला पाहिला. क्षणमित्र. किती सुंदर शब्द आहे नाही! ऐन गरजेच्या वेळी  - मग ती गरज कितीही साधी असो - उभा ठाकतो तो खरा मित्र. टोपलीला हात लावणारे, हेडलाईट्स चालू आहेत असं सांगणारे, आपल्याकरता लिफ्टचं दार धरून ठेवणारे, असे कित्येक क्षणमित्र आणि मैत्रिणी आपल्यात वावरत असतात. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, त्यांच्यासारखं बनलं पाहिजे..

अडचण लहान, नाही संकट जया म्हणावे
मदतीस येई कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥

रिक्षातुनी उतरलो भाडे कमीच होते
देईल सुटे कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥

प्लॅटफॉर्म उंच होता गाडीही येत होती
देईल हात कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥

माझी ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/fx2o9f8M3HY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 5, 2025

बोथट

आपण हाताळत असलेलं हत्यार तीक्ष्ण असेल तर आपण सावध असतो. त्यामुळे बोथट हत्यारंच आपल्याला जास्त जखमा देऊन जातात. ह्या जखमा जीवघेण्या नसल्या तरी वेदनादायी नक्कीच असतात..

आता सुपारी ती काय! पण अडकित्त्याला जर धार नसेल तर नीट कातरल्या न गेलेल्या सुपारीमुळे काय होऊ शकतं ह्याची सुपारी न खाणारेही कल्पना करू शकतात..

कंठाशी प्राण येतो साध्या सुपारीनेही
जखमा कितीक दिल्या बोथट कट्यारीनेही ॥


माझी ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/v1GdBHH7738 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जून 1, 2025

बोला

काही वेळा लहान मुलांकरता लिहिलेल्या गोष्टी मोठ्यांना समज देण्याकरताही वापरता येतात. मध्यंतरी अभिनेते प्रकाश राज ह्याच्या एका मुलाखतीत ह्याचं उत्तम उदाहरण ऐकायला मिळालं. पंचतंत्रातील एका गोष्टीचं त्यांनी केलेलं रुपांतर काव्यरुपात मांडण्याचा हा एक नम्र प्रयत्न..

अचानक एक कासव भेटलं, ओळखीचं वाटलं, डोळ्यांवर विश्वास बसंना
म्हटलं, अरे तू तर तोच पंचतंत्राच्या गोष्टीतील कासव ना?
हसून आलं माझ्या पुढ्यात चेहरा करून भोळा
म्हणालं, होय मीच तो काय कसं काय, बोला.. ॥

अरे पण बगळ्यांसोबत उडताना तुझ्या बोलण्याच्या सवयीने केला होता ना घात
बोलण्याचे तोटे, तुझ्या मरणाची गोष्ट सांगून अजून शाळेत शिकवतात
अहो, अर्धीच गोष्ट ठाऊक तुम्हाला, मला म्हणालं मारत डोळा
पडलो तरी रक्षण करणारी आहे माझी कणखर पाठ, आता बोला! ॥


माझी ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/xkTjH8LLTCU ह्या ठिकाणी ऐकता येईल.,
मे 1, 2025

एका मैत्रीचं थडगं

आपल्या समाजात एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडते एवढं एक कारण मैत्री होण्याकरता पुरेसं नसतं, जेव्हा त्यातली एक व्यक्ती पुरुष आणि दुसरी स्त्री असते आणि त्यातलं कोणीही विवाहित असतं. अश्या मैत्रीकरता ‘गळचेपी’ हे एकच अंतिम सत्य असतं.

ती वेंटिलेटरवर आहे
अंहं.. कोण नाही, काय असं विचारा
एक मैत्री, एक सुंदर मैत्री
मला माहीत आहे, आयुष्यापेक्षा मोठं काहीच नसतं 
पण काही गोष्टी आयुष्याला अर्थ देतात
त्यातलीच ही एक
अवचित आयुष्यात आली, वाढत गेली, सवय लावली आणि एक दिवस..
खुंटली!

माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mcwsNK3kuMQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 7, 2025

न वटलेला चेक

जागतिक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा! शारीरिक आरोग्याइतकंच, किंबहुना थोडं जास्तच महत्त्वाचं मानसिक आरोग्य असतं. स्वतःच्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना जेव्हा संकटं घेरतात तेव्हा मनाला उभारी देण्याकरता कुणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणंही पुरेसं असतं..

बागेमध्ये बसला होता चुरगळलेला वेश
चेहरा होता उदास होते अस्ताव्यस्त केस
तरूण होता मनात त्याच्या विचार होते घोळत
स्वत:शीच बोलत होता हात होता चोळत
वृद्ध पाहात बसला होता जवळच बाकावर
जाऊन त्यास म्हणाला तरूणा स्वत:ला सावर
शून्यात नजर लावून तरूण म्हणे सावरू कसा
नोकरी गेली माझी त्याचा दाटून आला घसा
खिशामधून चुरगळलेला कागद काढला एक
आज मिळाला फुल अॅण्ड फायनल सेटलमेंटचा चेक ॥


माझी ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/SfSx8KZqNUw ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 8, 2025

प्रेम – त्याचे आणि तिचे

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा! दशकानुदशकांच्या सूक्ष्म आणि तपशीलवार चिकित्सेनंतर अस्मादिक काही निष्कर्षांपर्यंत येऊन थडकले आहेत. त्या निष्कर्षांवर आधारित हे एक स्वल्पचिंतन..


मुंग्यांच्या वारुळासारखं पुरुषांचं प्रेम असतं
जे प्रत्येक सावध-बेसावध सावजावर तुटून पडतं
सावजाच्या रंग-रूप-आकाराचे त्याला विधिनिषेध नसतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥

बायकांचं प्रेम म्हणजे मात्र जणू बिबट्याची शिकार
आधी पूर्णपणे हेरतात रंग-रूप आणि आकार
सावजाचे सावज बनण्याकरता काही नियम असतात
कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/PW79oDdP2MU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 3, 2025

बाटलीतला राक्षस

लहानपणीची बाटलीतल्या राक्षसाची गोष्ट आठवतेय ना? परीकथेतला राक्षस परीकथेतच राहायचा ते बरं होतं. पण आता एक बाटलीतला नवीनच राक्षस मानवाने बाहेर काढला आहे. त्याच्या कामाचा आवाका परीकथेतल्या राक्षसासारखाच आहे ज्याचा आता आपल्याला त्रास व्हायला लागला आहे. परीकथेतला राक्षस माणसाच्या चातुर्याने परत बाटलीत गेला. हा राक्षस मात्र माणसापेक्षा जास्त चतुर आहे.. त्याची ही गोष्ट.

एका मोठ्या कंपनीची ही बातमी आहे आतली
त्या कंपनीच्या एका एम्प्लॉयाला सापडली एक चमत्कारी बाटली ॥

आतून एक राक्षस निघाला उघडताच झाकण
म्हणाला कैक युगं करत होतो मी ह्या बाटलीची राखण ॥

काम करण्याचा माझा अचाट आहे आवाका
कोणतंही आणि कितीही काम सांगा फक्त एक नियम याद राखा ॥

मी थकत नाही ना कंटाळत ना झोप मला ना भूक
कामाशिवाय मला ठेवण्याची मात्र तू कधीही करू नकोस चूक ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Hexr70V6ivI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 4, 2025

चविताक

सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा?

चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो 
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥

{अशी एक भाषा आहे तिला नाही तोड 
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥}

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/DqFtusxacyU ह्या ठिकाणी ऐकता येईल.