ऑगस्ट 1, 2014
'अमुक एवढी' गोष्ट झाली की मी निवृत्त होणार' असं आपल्यातील प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्यक्षात मात्र कोणीही निवृत्त होताना दिसत नाही कारण ती 'अमुक एवढी' गोष्ट एखाद्या क्षितीजाप्रमाणे असते. आपण क्षितीज म्हणून ठरवलेल्या जागी पुढचं क्षितीज तयार असतं . . .
प्रत्येक क्षितिजापुढती मजला लोक दिसत होते
गंमत म्हणजे तेही पुढे पुढे पळत होते
तरीही तेच लक्ष्य माझे विचार म्हणत होते
समोर दिसेल ते सारं मला काबीज हवं होतं
फार काही नाही
मला फक्त ते क्षितीज हवं होतं
जुलै 18, 2014
'देव कुणाला म्हणावे अथवा म्हणू नये' असा एक नवीनच वाद सध्या सुरु आहे. मला इतके दिवस वाटत होतं की देव हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखादी गोष्ट देव आहे किंवा नाही हे ठरवणारी एखादी संस्था आहे हेच मला ठाऊक नव्हतं. आमच्या office मध्ये दसऱ्याला phone आणि संगणकांचीही पूजा होते. त्याकरता परवानगी घेतली आहे का हे तपासलं पाहिजे . . .
. . .
देव असावा असा
सकाळची न्याहारी
दिनभरच्या कामाची
मिळेल उर्जा सारी
देव असावा असा
जशी वाट ती लांब
मार्गी त्या लागता
कुणी न म्हणते थांब
देव असावा असा
आसमंत ते निळे
जगी कुठेही जावे
त्याचे छप्पर मिळे
. . .
जुलै 4, 2014
पाप-पुण्याची अध्यात्मिक चर्चा ऐकायची असेल तर स्मशानासारखी जागा नाही. मरणाची अपरिहार्यता नजरेसमोर उभी ठाकली की राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्या भावनांचा फोलपणा जाणवू लागतो. मात्र स्मशानभूमीच्या बाहेर हे विचार जिवंत ठेवू शकणारा खरा योगी असतो!
निरखून बघती स्वामी चिंता चेहऱ्यावरती आली
माझे सोड अभाग्या लिहिले काय तुझिया कपाळी
तुझ्या जीवनी आता केवळ दिवस राहिले सात
स्पष्ट दिसतसे मजला ती मृत्यूची सावली काळी
भाविक तो दचकुनिया उठला जसा दिसावा साप
विसरुनी गेला प्रश्न स्वतःचा काय पुण्य अन् पाप
जून 6, 2014
अपघाताप्रमाणे इस्पितळात भरती व्हावं लागणं हे केवळ इतरांच्या बाबतीत घडतं असा आपला समज असतो. इतरांना भेटायला आपण अनेकदा इस्पितळात जातो. मात्र इस्पितळ ह्या जागेचं गांभीर्य आपल्याला स्वतःला भरती होण्याची वेळ येते तेव्हाच समजतं. आणि त्यानंतर इस्पितळ ह्या वास्तूकडे आपण वेगळ्याच आदराने पाहू लागतो . . .
गप्पा मारणं, बसणं, भेटीला जाणं
फालतू विनोद सांगून परतून येणं
एखाद्या रात्रीला झोपायला जाणं
कधी सकाळ होते वाट पाहाणं
आत्तापर्यंत होती माझ्या विचारी
इतुक्यापुरती इस्पितळाची वारी
मे 16, 2014
तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का? आपण एखाद्या (त्या ठिकाणी उपस्थित नसलेल्या) व्यक्तीबद्दल तक्रारीच्या सुरात बोलत असतो. समोरची व्यक्ती आपल्याशी सहमती दाखवत असताना सहज बोलून जाते, 'ते काहीही असलं तरी तो मनाने फार चांगला आहे'. मनाने वाईट असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का? विचार केलात तर तुम्ही अगदी कट्टर मानता ते शत्रूही 'मनाने चांगले'च वाटू लागतील . . . . . . आपलं विखुरलेलं एकत्र कुटुंब आठवून मनामध्ये झिजतोय पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघतोय माझं मत नाही बदलणार जरी त्याला फासावरती टांगला बाकी कसाही असला, तरी तो मनाने फार आहे चांगला ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/PnUWAFXPWE4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 2, 2014
लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांतच पार पडतील. आता बहुतेक नवा भिडू, नवे राज्य आणि नवीन राजा. हा नवीन किंवा नव्याने येणारा जुना राजा ह्या गोष्टीतून काही बोध घेईल का? . . . दोन वर्षांपूर्वी शेवटी वदले त्यांना स्वामी तुमच्या प्रश्नाकडे माझं खचितच आहे लक्ष माझे विचार काही काळात येतील तुमच्या कामी वठून जावा लागेल उद्यानातील तो वटवृक्ष शब्द ऐकुनी त्या मंत्र्याचं डोकंच होतं फिरलं समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं . . .
एप्रिल 18, 2014
जनतेशी निगडीत असा साऱ्या जगातील भव्यतम सोहोळा - भारतीय लोकसभेची निवडणूक! आणि ह्या सोहोळ्याचे उत्सवमूर्ती, निवडणुकीचे उमेदवार . . . अहाहा, काय वर्णावी त्यांची महती! एकास झाकावे आणि दुसऱ्यास काढावे . . . ह्याला सोड त्याला जोड ह्याला गिरव त्याला खोड शत्रू होते क्षणापूर्वी जे आता नाते झाले गोड भाऊ ठाकला भावासमोर लक्तरं काढी गावासमोर शत्रू सुद्धा अवाक् होती नातलगांच्या डावासमोर धर्म काढ जात काढ भाषा काढ प्रांत काढ मतांकरता काही चालेल आवस वाढ बये आवस वाढ जेथील बाभळी तेथील बोरे उडदामाजी काळे गोरे
मार्च 21, 2014
दर वर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जलदिन' म्हणून साजरा होतो. आपल्यापैकी कोणी पाण्याचं महत्व न समजण्याइतके अनभिज्ञ नसावेत. जलदिनानिमित्त ह्या अनन्यसाधारण जीवनस्रोताचं महत्व अधोरेखित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न . . .
तेरा अब्ज परार्ध लिटर पृथ्वीवर ते राही
पण त्याच्यापैकी तीनच टक्के समुद्रात नाही
तीन टक्क्यांपैकी फक्त एक शतांश आपलं
बाकी सारं धृवांवरच्या बर्फामध्ये लपलं
ह्यात आले नदी नाले आणि सर्व तलाव
त्याला जीवन ऐसे नाव
मार्च 7, 2014
आपल्यापैकी किती पुरुष नोकरी सोडून घर सांभाळू शकतील? हसण्यावारी नेऊ नका, नुसत्या विचारानेही घाम फुटेल. अनेक कमावते पुरुष घरची आघाडी भक्कम ठेवणाऱ्या गृहिणीला सोयीस्करपणे कमी लेखतात. आठ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' संपन्न होत आहे. त्यानिमित्त ह्या 'गृहिणी'चं केलेलं हे थोडंसं कौतुक . . .
बाहेरचे अन् घरचे सारे काम पाडिते पार
सुट्टी नाही त्या कामाला ना सण ना रविवार
स्वागत करते आगंतुकाचे तरी प्रसन्न हसुनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी
पदोन्नतीची आशा नाही पदक नाही ना चषक
गृहीतच धरती सारे तिजला राबे तरीही अथक
कौतुक सारे तिचे करूया निदान ह्या स्त्रीदिनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी
फेब्रुवारी 21, 2014
कोणत्याही धंद्यात यशस्वी होण्यापूर्वी नुकसान सहन करण्याची तयारी आणि ताकद ठेवावी लागते. अगदी प्रेमाचा धंदाही ह्याकरता अपवाद नाही . . .
इतकं प्रेम तयार केलं मोठा झाला साठा
विकण्यासाठी मोकळ्या होत्या मला चारी वाटा
ग्राहक कुठून येईल ह्याचा नव्हता काही नेम
किंमत माझ्या प्रेमाचीही होती फक्त प्रेम
जिथे तिथे ग्राहक होते एक नाही सतरा
वस्तू विकण्यासाठी सुरु झाल्या माझ्या चकरा
महिना नाही पाहिला नाही तारीख नाही वार
प्रेमाच्या ह्या धंद्यामध्ये नुकसानच फार
फेब्रुवारी 7, 2014
'गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला' किंवा 'सरळ फासावर चढवा' असे शब्द आपल्या तोंडून किती सहजपणे निघून जातात. जगाच्या अति लोकसंख्येमुळे मृत्यूबद्दल आपल्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत का? चर्चा करू या असं म्हणून आपला देश शत्रूपुढे वाकतो धडधड बॉम्ब टाकून शत्रूचा देश करा बेचिराख तो किती सहज निघतात आपल्या तोंडून असे विखारी बोल विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल
जानेवारी 17, 2014
जानेवारी महिना आला की बहुतेक सर्व संस्थांमध्ये appraisalचे वारे वाहू लागतात. ह्या वेळी प्रमोशनच्या यादीत माझं नाव असेल का? हा प्रश्न सर्व नोकरपेशांना छळू लागतो. जितकी वरची जागा तितकी प्रमोशनची शक्यता कमी. मग वर्षभर केलेल्या अट्टाहासाचा आढावा घेतला जातो . . .
गाणं होतं डोंगराला आग लागली पळा रे पळा
तयार होतो कापायला एकमेकांचा केसाने गळा
सभोवती उभे राहून बायको मुलं टाळ्या पिटत होती
दमून थांबलो तर त्यांचं काय होईल ह्याची काळजी होती मोठी
गाणं बंद झाल्यावर बेभानपणे घातला एकच धुमाकूळ
मला खुर्ची मिळाली आहे हे समजेपर्यंत बसली होती आजूबाजूची धूळ












