कविता

व्यक्तिवाचक

आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात ज्यापैकी ‘व्यक्ती’ म्हणता येतील अशी फार थोडी – जी आपल्या मनावर एक अमिट ठसा उमटवून जातात. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या व्यक्तींचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अशाच काही व्यक्तींवर आधारित ह्या कविता.

सप्टेंबर 15, 2025

मी अभियंता

राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर मोक्षगुंडम विश्वेशवरय्या ह्या विलक्षण भारतीय अभियंत्याच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या सामाजिक माध्यमं, दूरचित्रवाणी, बँका, सरकारं वगैरेंनी प्रक्षेपित केलेल्या आभासी जगात, आपण ह्या साऱ्याचा पाया असलेल्या भौतिक जगाला कमी लेखू लागलो आहोत. मात्र ह्या पायाचं महत्त्व एक अभियंता खचितच जाणून असतो..


वस्तू असो वा वास्तू थांबे तेव्हा मी ती बनता
मी तर अभियंता ॥

दूर सारते भ्रांती
औद्योगिक ती क्रांती
माझ्यामुळेच युद्ध जरी
तरी माझ्यामुळेच शांती

मी केवळ साहित्य बनवतो नाही कुणाशी तंटा
मी तर अभियंता ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ObxKzcqpthI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 3, 2025

क्षणमित्र

मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्या दिवशी एका रिक्षाच्या मागे एकच शब्द लिहिलेला पाहिला. क्षणमित्र. किती सुंदर शब्द आहे नाही! ऐन गरजेच्या वेळी  - मग ती गरज कितीही साधी असो - उभा ठाकतो तो खरा मित्र. टोपलीला हात लावणारे, हेडलाईट्स चालू आहेत असं सांगणारे, आपल्याकरता लिफ्टचं दार धरून ठेवणारे, असे कित्येक क्षणमित्र आणि मैत्रिणी आपल्यात वावरत असतात. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, त्यांच्यासारखं बनलं पाहिजे..

अडचण लहान, नाही संकट जया म्हणावे
मदतीस येई कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥

रिक्षातुनी उतरलो भाडे कमीच होते
देईल सुटे कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥

प्लॅटफॉर्म उंच होता गाडीही येत होती
देईल हात कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥

माझी ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/fx2o9f8M3HY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत हे एकदा पुरुषांनी मान्य केलं की उरतात ते पुरुषांचे प्रश्न. पण मग आजच्या महिलादिनी हे प्रश्न उपस्थित करण्याचं काय औचित्य आहे? औचित्य आहे. कारण आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाबद्दल कधी ऐकिवात आलेलं नाही.

तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
कसंही वागलं तरी शेवटी आमचंच होतं हसं ॥

बायकोचं ऐकावं तर आर्इ म्हणते गेलास तू माझ्यापासून लांब
आईचं ऐकावं तर बायको म्हणते तू तर अगदीच भोळा सांब
तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
दोघींना आवडेल असं वाक्य तरी सुचवा एक छानसं ॥

माझी ‘पुरुषप्रश्न’ ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/qpK1i8iHqoo ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 1, 2021

जेवण

गेल्या काही महिन्यांत मध्यमवर्गीय पुरुषांना घरातील स्त्रीचं महत्त्व काही प्रमाणात समजू लागलं आहे. अनेक पुरुष घरातील स्त्रीला चक्क घरकामात मदत करू लागले आहेत. त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेताना ते अजिबात दमत नाहीत. मात्र संसारात बुडून गेलेल्या ह्या स्त्रीच्या आयुष्यातील काही अगदी साध्या साध्या अपेक्षा समजून घेऊन पूर्ण करण्यात आपण पुरुष खरच यशस्वी झालो आहोत का?!

त्याच्या कमाईतच त्यांचं सुख होतं तिला सतत होती जाण
मग ती आपल्या दोन मुलांच्या विश्वातच झाली रममाण

त्याला मिळाला कुटुंबप्रमुख, अनभिषिक्त राजाचा मान
तिने स्वीकारलं कुटुंबातील तिचं दुय्यम स्थान

कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा म्हणून आपण राहावं
तिची एकच अपेक्षा होती, रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/YAvi8iAzEjM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 21, 2021

कवीराज

आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे. बरेचदा असं होतं की मित्र-मैत्रिणींचा एक छान समूह असतो. सगळं अगदी मजेत चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस त्या समूहावर संकटाचा डोंगर कोसळतो. त्या समूहातील एका व्यक्तीला कविता होते. म्हणजे अगदी एखाद्याला सर्दी होते किंवा कावीळ होते ना, तशी कविता होते. दुर्दैवाने त्या असाध्य रोगाच्या परिणामांची जराही कल्पना त्या रोगी व्यक्तीला नसते. भोगतात ते बिचारे त्या समूहातील इतर जण ...

कवीराज ते आले आले झाली पळापळ
आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥

काही लपले खुर्चीखाली टेबलखाली काही
बाथरूममध्ये गेला जो तो बाहेर आला नाही
कवीराज ते आले आले झाली पळापळ
खिडकीतूनच सूर मारती होते जे चपळ ॥

उरले होते त्यांना वाटे रडू या काढून गळे
तरीही कवीला पाहून हसती सारेच बळेबळे
कवीराज ते आले आले झाली पळापळ
केविलवाणे भाव जैसी शिक्षा आता अटळ ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Pp-ZLpZqC9k ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 1, 2020

लोकमान्य

आज लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या ह्या लोकोत्तर पुरुषाला वकिल, गणितज्ञ किंवा शास्त्रज्ञ ह्यापैकी कोणत्याही क्षेत्रात धनसंचय करता आला असता. परंतु आपले देशबांधव दारिद्र्यात आणि अज्ञानात खितपत पडलेले असताना ते करणं त्यांनी नाकारलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकारणात प्रवेश केला. अशा ह्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला एक अल्पशी श्रद्धांजली...

स्वराज्य माझा हक्क ज्यापुढे विकल्प नाही अन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥

इंग्रज पाहती भले स्वत:चे ह्या देशाचे नव्हे
नोकरशाही अत्याचारी स्वत: इंग्रज नव्हे
जाणून होते पिचलेल्या जनतेची करूण कहाणी
इलाज असतो रोगाकरता रोग्याकरता नव्हे

चकित पाहूनी झेप बुद्धीची आंग्ल ते अहंमन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥

लोकाभिमुख मते म्हणूनी जहाल त्यांना म्हणती
विलग जाहले नाइलाज राष्ट्रीय सभेतून अंती
जनतेला संघटित करण्या ध्यास घेतला मनी
गणेश उत्सव सुरू करविले आणखीन शिवजयंती

समाजातले जाऊ लागले अकर्म औदासिन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uM_DD1-Fmh4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.