
मला देव पावला
जानेवारी 1, 2026हवी तूच

सर्वांना प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! रिक्षाच्या मागे लिहिलेलं आणखीन एक घोषवाक्य – ‘तुज्यासारखी नको, तूच हवी’. त्या रिक्षावाल्याच्या – कदाचित एकतर्फी – प्रेमभावनेबद्दल बरंच काही सांगून जाणारी. हल्लीच एका मराठी चित्रपटाकरताही हेच बोधवाक्य वाचलं. त्यावर आधारित ही एक गजल.ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/VfUlk_rtxa8 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
म्हण हो इथे नको गं सांगू कहाणी मजला
तुजसारखी नको गं हवी तूच राणी मजला ॥
तू फूल अन् भ्रमर मी तुजसाठी जन्म माझा
मधु नाही तर नको गं पाजूस पाणी मजला ॥
तू ज्योत ती दिव्याची मी कृमी एक साधा
अंधारी ह्या नको गं सोडूस रानी मजला ॥
संशयी हृदय म्हणते आहे तुझ्या मनात
दुसरा कुणी नको गं समजू अडाणी मजला ॥
दुसऱ्या कुणाहीसाठी त्यागेन प्रीत माझी
इतुकाही तू नको गं समजूस दानी मजला ॥
देणार तर दिलाचा दे मला चेक कोरा
भिक्षेत तू नको गं देऊस नाणी मजला ॥
मनी तुझ्या कोपऱ्यात माझेही स्थान आहे
फसवू आता नको गं तुजलाही आणि मजला ॥
करणार नाही त्रागा असला जरी नकार
अडखळू तू नको गं ऐकू दे कानी मजला ॥
ठेवीन जपून काही एक स्मित एक स्पर्श
थांबू आता नको गं दे तू निशाणी मजला ॥
जे चालले मनात ते तुझे तुला ठावे
चुकूनही पण नको गं म्हणू बेईमानी मजला ॥
म्हण हो इथे नको गं सांगू कहाणी मजला
तुजसारखी नको गं हवी तूच राणी मजला ॥



