कविता
प्रेमकाव्य
कथा-कादंबऱ्या आणि चित्रपट-नाटकांमध्ये दाखवतात तेवढं अवास्तव नसलं तरी प्रेमाचं आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असतं एवढं नक्की. स्थळ, काळ, वय, ऐपत वगैरे कोणतीही बंधनं न पाळणारी ही भावना व्यक्त करण्याकरता शब्द अपुरे पडतात आणि मग काव्याचा आधार घ्यावा लागतो.
फेब्रुवारी 14, 2026
सर्वांना प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! रिक्षाच्या मागे लिहिलेलं आणखीन एक घोषवाक्य – ‘तुज्यासारखी नको, तूच हवी’. त्या रिक्षावाल्याच्या – कदाचित एकतर्फी – प्रेमभावनेबद्दल बरंच काही सांगून जाणारी. हल्लीच एका मराठी चित्रपटाकरताही हेच बोधवाक्य वाचलं. त्यावर आधारित ही एक गजल. तू ज्योत ती दिव्याची मी कृमी एक साधा अंधारी ह्या नको गं सोडूस रानी मजला ॥ दुसऱ्या कुणाहीसाठी त्यागेन प्रीत माझी इतुकाही तू नको गं समजूस दानी मजला ॥ म्हण हो इथे नको गं सांगू कहाणी मजला तुजसारखी नको गं हवी तूच राणी मजला ॥ ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/VfUlk_rtxa8 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 1, 2025
आपल्या समाजात एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडते एवढं एक कारण मैत्री होण्याकरता पुरेसं नसतं, जेव्हा त्यातली एक व्यक्ती पुरुष आणि दुसरी स्त्री असते आणि त्यातलं कोणीही विवाहित असतं. अश्या मैत्रीकरता ‘गळचेपी’ हे एकच अंतिम सत्य असतं. ती वेंटिलेटरवर आहे अंहं.. कोण नाही, काय असं विचारा एक मैत्री, एक सुंदर मैत्री मला माहीत आहे, आयुष्यापेक्षा मोठं काहीच नसतं पण काही गोष्टी आयुष्याला अर्थ देतात त्यातलीच ही एक अवचित आयुष्यात आली, वाढत गेली, सवय लावली आणि एक दिवस.. खुंटली! माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mcwsNK3kuMQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 8, 2025
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा! दशकानुदशकांच्या सूक्ष्म आणि तपशीलवार चिकित्सेनंतर अस्मादिक काही निष्कर्षांपर्यंत येऊन थडकले आहेत. त्या निष्कर्षांवर आधारित हे एक स्वल्पचिंतन.. मुंग्यांच्या वारुळासारखं पुरुषांचं प्रेम असतं जे प्रत्येक सावध-बेसावध सावजावर तुटून पडतं सावजाच्या रंग-रूप-आकाराचे त्याला विधिनिषेध नसतात कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥ बायकांचं प्रेम म्हणजे मात्र जणू बिबट्याची शिकार आधी पूर्णपणे हेरतात रंग-रूप आणि आकार सावजाचे सावज बनण्याकरता काही नियम असतात कारण पुरुष प्रेमात पडतात आणि बायका प्रेमात उतरतात ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/PW79oDdP2MU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2023
प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रेमात पडल्यावर माणसाचं विशेषतः पुरुषाचं माकड होतं ह्यात काही वाद नाही. प्रेमात पडलेला राजा असो वा रंक, बलदंड असो वा पेदरट, कॉलेजकुमार असो वा ऑफिसमधला बॉस.. क्यायच्या क्याय वाटणं आणि क्यायच्या क्याय वागणं साहजिक असतं. आणि मग ते तसं वाटणं आणि तसं वागणं बोलण्यात दिसून येणं हे ओघानेच आलं.. एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥ एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥ माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/7bKCy8pf_Ek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2022
आज पाश्चात्य देशांत प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर प्रेमाच्या उत्सवाला दिवस कशाला हवा? माणूस कधीही, कुठेही आणि कोणाच्याही प्रेमात ‘पडू’ शकतो. प्रेमात पडलेल्या माणसांची काही विशिष्ट लक्षणं असतात. पण इतरांमध्ये ही लक्षणं शोधण्यापूर्वी एकदा विचार करा. कदाचित इतरांना तुमच्यात ही लक्षणं दिसत नसतील ना? प्रेमात पडल्यावर काय होतं ? प्रेमात पडल्यावर माणसाचं होतं गाढव कधी केस तर कधी दाढी वाढव समजतच नाही मित्र काय बोलतायत ते आणि समजलं तर सुरू होतं त्याचं अकांडतांडव ॥ प्रेमात पडल्यावर काय होतं ? प्रेमात पडल्यावर माणूस होतो आंधळा फडतुस चित्रपटांना रडतो काढून गळा भिंतीकडे पाहात गाऊ लागतो गाणी माझ्या पिरतीचं पाणी आणि तुझा ज्वानीचा मळा ॥ माझी ‘प्रेमात पडल्यावर काय होतं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tkph0SenzzY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2021
आज प्रेमाचा उत्सवदिन आहे. त्या दिवशी गाडी चालवताना पाहिलं समोरच्या वाहनाच्या मागे लिहिलं होतं, ‘भेटली होती, पण नशिबात नव्हती’. इतक्या मोजक्या शब्दांत त्या वाहनाच्या मालकाने आपल्या मनातला एक ठसठसता कोपरा उघड केला होता. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की अशा अडथळ्यांमुळे थांबलो तर जगणंच अशक्य होऊन जाईल. तुमच्या बाबतीत आले होते का कधी असे अडथळे? विसरू कसा मी माझ्या ताब्यात रात्र नव्हती ती भेटली परंतु नशिबात मात्र नव्हती ॥ खिडकीत त्या समोरील माझ्या मनीचे भाव दावेल ऐसी खिडकी माझ्या घरात नव्हती ॥ उतरली आलिशान गाडीतूनी तिच्यावर खर्चेन इतुकी रक्कम माझ्या खिशात नव्हती ॥ स्थळ पाहण्यास गेलो मैत्रीण पण मुलीची गोडी तिच्यात होती ती त्या स्थळात नव्हती ॥ ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/sLZcV2uqwKQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.






