जानेवारी 3, 2014
एखाद्या दुर्बल व्यक्तीवर अत्याचार करताना मनुष्य आपलं सामर्थ्य अबाधित राहील असं गृहीत धरतो. ही अहंगंडाची भावना इतकी प्रबळ असते की मग तो मनुष्य त्या व्यक्तीच्या मनात उद्भवणाऱ्या सुडाच्या भावनेलाही गौण समजतो. अशी चूक जीवघेणी ठरू शकते . . . एके दिवशी घेऊन गेला मजला तो शहरात गर्दीमध्ये नेऊन दिधला सोडून माझा हात अशिक्षित निर्धन अन् दुःखी अबला मी असहाय निर्दयतेने केला त्याने माझ्यावर अन्याय तेव्हापासून अधोगतीला माझ्या ना अवरोध जगत राहिले मन सांगे मम घे त्याचा प्रतिशोध
डिसेंबर 20, 2013
अंधश्रद्धांच्या भंपक कल्पना आपल्या मनात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की संकटाच्या वेळी आपली कशावर किंवा कुणावर अंधश्रद्धा नाही ह्या गोष्टीची भीती वाटू लागते. वाटतं की आपल्या हेकेखोरपणामुळे कुणाचं नुकसान तर होणार नाही ना . . .
चार दिवस घेतला तिने देवाचाच ध्यास
माझा मात्र विज्ञानावर अढळ असा विश्वास
तिच्या त्या वागण्याला होतो अंधश्रद्धा म्हणत
माझं असं वागणं मात्र तिला नव्हतं पटत
तिच्या मते तर संकटसमयी कामी येते श्रद्धा
मला म्हणाली विज्ञानावर तुझी अंधश्रद्धा
चार दिवस लागली होती दोघांची कसोटी
माझा विश्वास कमकुवत की तिची श्रद्धा खोटी
ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/o8vnBTlA_3Q ह्या ठिकाणी ऐकता येईल.डिसेंबर 6, 2013
कोणत्याही स्पर्धेत उतरणारा प्रत्येक स्पर्धक पहिला क्रमांक मिळवण्याकरता तयारी करत असतो. मात्र पहिला क्रमांक येणार हे नक्की असताना जर कोणी दुसऱ्या क्रमांकावर येण्याकरता धडपडत असेल तर? कधीतरी माझ्या वाचनात आलेल्या कथेवर आधारित ही माझी काव्यकथा . . .
पाहता पाहता वाट उजाडला
शर्यतीचा दिवस
माझ्या विजयासाठी ताई
बोलली होती नवस
शर्यत सुरु झाली माझा
सोडला नव्हता हेका
पुढे धावणाऱ्यास म्हणालो
जिंक शर्यत लेका
नोव्हेंबर 25, 2013
सचिनबद्दल मी तुम्हाला काय सांगावे? सव्वीस वर्षांपूर्वी सुनील गावस्कर निवृत्त झाला (अति प्रेमापोटी सचिन आणि सुनीलचा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस करत आहे) तेव्हा एवढंच वाईट वाटल्याचं आठवतंय. गेली चोवीस वर्षं आपल्या धकाधकीच्या जगण्यात आनंदाचे असंख्य क्षण दिल्याबद्दल सचिनला धन्यवाद देण्याचा हा छोटासा प्रयत्न . . . चोवीस वर्षे आपल्या मनात ज्या व्यक्तीने केलंय घर नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर विक्रम अळवावरचे पाणी मोडीत निघती नित्यनवे अनंतकाळी अभेद्य टिकतील विचार हे असती फसवे गर्वाचे घर वर ना येते आदर मिळतो राहुनी लीन कीर्ती पचवुनी शांत राहावे उदाहरण ते दावी सचिन धावांपेक्षा रचले ज्याने हर्षोल्हासाचे डोंगर नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर
नोव्हेंबर 1, 2013
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये छेड काढण्याचा मक्ता पुरुषांनी घेतला आहे. मात्र हे असं कुठपर्यंत चालणार? दिवसेदिवस सबल होणाऱ्या महिलांना पूर्वापार चालत आलेल्या ह्या फाजीलपणाची परतफेड करावीशी वाटत नाही का?
एकटा घरी जात असावा तो पावसाळी रात्री
त्याच्याकडे नाही पण माझ्याकडे असावी छत्री
चिंब त्याची काया धुंद माझ्या गात्री
असं मुलींना कधीच वाटत नाही का?
खुरट्या दाढीने भरलेले त्याचे गाल
मस्त मर्दानी त्याची रुबाबदार चाल
काय साला मस्त आहे माल
असं मुलींना कधीच वाटत नाही का?
ऑक्टोबर 18, 2013
१७ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रसंघाने 'जागतिक गरिबी निर्मुलन' दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने भारतात बऱ्याच जणांना अचानक गरीब दिसू लागले आहेत आणि गरिबीची जाणीव होऊ लागली आहे. गरिबी हेच जगातील दुःखाचं मुख्य कारण आहे. पराकोटीला पोहोचलं की शेवटी ह्या दुःखाचाच अभिमान मग मनात उरतो . . .
हेलावून मी गेलो पाहून दुःखाचे ते माप
डोळ्यांमध्ये आणि दाटला माझ्या मग संताप
मागेपुढे नाही पाहिले धावून त्यावर गेलो
अनावर मी झालो होतो मारले त्यास अमाप
ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/XykWLdJfMEM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 4, 2013
सकाळचा फेरफटका, अर्थात morning walk ही आरोग्याकरता अत्यंत चांगली गोष्ट आहे . . . आणि 'आरोग्याकरता अत्यंत चांगल्या' अशा इतर गोष्टींप्रमाणेच बोलायला सोपी पण करायला कठीण गोष्ट आहे. आपल्यातील किती जणांनी किती वेळा morning walkचा 'दृढ संकल्प' केला असेल ह्याचा हिशेब ठेवायला संगणकाची गरज लागेल . . .
सगळे म्हणती दाखवून बोट
तुझं सुटलं आहे पोट
त्यांच्या बोलण्यात नाही खोट
चालीन चांगला मी भरभर
उद्या उठणार मी लवकर
सप्टेंबर 20, 2013
लोकशाही म्हणजे बहुमताचा मान . . . पण मग बहुमताने अराजक माजलं तर त्याचाही मान ठेवायचा का? माझ्या सभोवती बहुतांश लोक जर मग्रुरी, लबाडी, अस्वच्छता, असहिष्णुता, भ्रष्टाचार ह्या गोष्टींचा पुरस्कार करत असतील तर मीसुद्धा त्यांच्यासारखं बनावं का? आणि नाही बनलो तर मी ह्या देशात राहायला नालायक ठरतो का?
रस्त्यांमध्ये मांडव
दिवसरात्रीचे तांडव
रांगा लावून दर्शन घेती पंचक्रोशीतील बांधव
माझा सोडून प्रत्येकाचा चेहरा आहे हसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा
सप्टेंबर 6, 2013
माझे काही जैन मित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांना भेटून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणतात. ह्याचा अर्थ गेल्या वर्षभरात माझ्या हातून घडलेल्या प्रमादांमुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजपासून आपल्या नात्यामध्ये फक्त सौहार्दाच्या आठवणी असू द्यात. पद्धत आवडली आणि म्हणून माझ्या सर्व आप्त-मित्र-सहकाऱ्यांना गणेश चतुर्थीचा योग साधून म्हणतो …
आयुष्यात मिळाले मजला मित्र जीवाभावाचे
संगतीमध्ये ज्यांच्या विरले क्लेशही तणावाचे
चुकून कधी जर झाली असली त्यांच्या मना जखम
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम
क्षमा करावी सर्व चुकांची विसरुनिया अहम्
मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uH_R9uY_rEU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 2, 2013
स्वातंत्र्यदिन साजरा करणं हा आता केवळ एक उपचार राहिला आहे. सिग्नलला गाडी थांबवून झेंडा विकत घेणं म्हणजे स्वातंत्र्यदिन . . . महत्प्रयासाने मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवण्याकरता आपली काही जबाबदारी आहे हेच आपण विसरत चाललो आहोत. मंदिराच्या रांगेमध्ये मित्र उभे होते चार गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या विषय होता भ्रष्टाचार पुजाऱ्याला पाहून एक हळूच म्हणाला दुसऱ्याला पैसे देऊन आधी दर्शन मिळेल का ते जरा विचार लाच देणारे घेणारे दोघे असतात तितकेच ठग नियम असतात सर्वांकरता त्याचं पालन करून बघ काम करायला घे आधी तू विचार करत बस मग देशाची ह्या जबाबदारी थोडी तरी घेऊन बघ
जुलै 19, 2013
'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ही म्हण कुणीतरी खास मध्यमवर्गीयांकरता लिहून ठेवलेली असावी. आपण मनाशी काही ठरवून मनोरथांचे इमले बांधावेत आणि व्हावं काहीतरी भलतंच ह्या गोष्टीची प्रयत्न करूनही सवय होत नाही. असेच काही टोणगे ...
रोज पहायची मला
बसस्टॉपवर ती बाला
आज विचारू उद्या
म्हणता उशीर झाला
मला मामा म्हणणारा तिला पोरगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला
विचार करता समजून आला जो दगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला
जुलै 5, 2013
निसर्गाची हेळसांड केल्याचे काय परिणाम भोगावे लागतात ते उत्तराखंडातील घटनांवरून चांगलंच लक्षात आलं आहे. निसर्गावर कुरघोडी करताना आपणही निसर्गाचं एक अविभाज्य अंग आहोत हेच मुळी आपण विसरून बसलो आहोत.
वाढत गेली वेल परंतु अशी काही वाढली
बुंध्यासंगे फांद्यांवरही दूर पसरू लागली
झाडावरच्या फुलपानांचा आटोपू लागे खेळ
ओक्याबोक्या झाडावर मग उरली केवळ वेल












