
बोला
जून 1, 2025
क्षणमित्र
ऑगस्ट 3, 2025बोथट

आपण हाताळत असलेलं हत्यार तीक्ष्ण असेल तर आपण सावध असतो. त्यामुळे बोथट हत्यारंच आपल्याला जास्त जखमा देऊन जातात. ह्या जखमा जीवघेण्या नसल्या तरी वेदनादायी नक्कीच असतात..माझी ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/v1GdBHH7738 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आता सुपारी ती काय! पण अडकित्त्याला जर धार नसेल तर नीट कातरल्या न गेलेल्या सुपारीमुळे काय होऊ शकतं ह्याची सुपारी न खाणारेही कल्पना करू शकतात..
कंठाशी प्राण येतो साध्या सुपारीनेही
जखमा कितीक दिल्या बोथट कट्यारीनेही ॥
एकदा एक बलाढ्य राजा दुसऱ्या राजाच्या भेटीला गेला असताना त्याला तुतारीची सलामी देण्यास तेथील सैन्य विसरलं. आता तुतारीची सलामी ह्यात एवढं काय आहे, पण..
अपमान होई म्हणुनी राजा समर पुकारे
जखमा कितीक दिल्या कर्कश तुतारीनेही ॥
दोन जीवश्च कंठश्च मैत्रिणी, खूप हुशार आणि अभ्यासू. निकाल लागला आणि त्यातली एक मुलगी केवळ एका गुणाने पहिली आली. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. एका गुणाची काय ती मातब्बरी पण शेवटी पहिली ती पहिली..
एका गुणामुळे त्या मैत्रीण आली दुसरी
जखमा कितीक दिल्या थोड्या हुशारीनेही ॥
एक प्रेयसी तिच्या प्रियकराकरता जान-ए-जाँ, जान-ए-मन, जान-ए-बहार होती. सहज बोलून गेली, अरे, तुझा तो मित्र तर तुझ्यापेक्षाही देखणा आहे. तिच्या प्रेमाबद्दल त्याला जराही शंका नव्हती, पण..
प्रेयसी करे तुलना प्रियकर असा दुखावे
जखमा कितीक दिल्या त्याच्या बहारीनेही ॥
नोकरीची मुलाखत देण्याची त्याची काही पहिली वेळ नव्हती. आपल्या विषयात तो तरबेज होता. पण कधी कधी अति-आत्मविश्वास घात करू शकतो..
नोकरी दुजा कुणाला प्रश्नोत्तरेच चुकली
जखमा कितीक दिल्या अपुऱ्या तयारीनेही ॥
वैयक्तिक हेव्यादाव्यातून कुणी कुणाची हत्या केली पण समाजकंटकांना दोन समूहांत बेबनाव निर्माण करण्याकरता तेवढं निमित्त पुरेसं होतं..
हत्या कुणाची होई समूहांत होई दंगा
जखमा कितीक दिल्या निधर्मी कुठारीनेही ॥
तुला ठाऊक आहे की तू बोलू लागलीस की एखाद्या मैफिलीत बसलेल्या रसिकासारखा तल्लीन होऊन ऐकण्याचा मला छंद आहे. इतका, की आता मला वाटतं तू मला गृहीत धरू लागली आहेस..
नकळत वदून गेलीस ते शब्द बोचरे तू
जखमा कितीक दिल्या मंजुळ सतारीनेही ॥
कंठाशी प्राण येतो साध्या सुपारीनेही
जखमा कितीक दिल्या बोथट कट्यारीनेही ॥



