
मी अभियंता
सप्टेंबर 15, 2025
मला देव पावला
जानेवारी 1, 2026इथेच

अब्जावधी शुक्राणूंपैकी एकाचा बीजांडाशी संकर होऊन तुमचा जन्म होतो ही तुमच्या अस्तित्वाकरता अशक्यकोटीतील घटना आहे. ह्या ब्रह्मांडाचा अनुभव घेण्याची संधी मिळालेले आपण सारे नशीबवान आहोत हे वादातीत. मृत्यू अवचित आणि अटळ आहे. त्यामुळे आनंद उपभोगण्याकरता हाच तो जन्म, हीच ती वेळ, हाच तो क्षण!ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/okDsufc8ex0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
इथेच जगायचंय इथेच मरायचंय
जे काही करायचंय इथेच करायचंय ॥
मैत्रीचं ते खातं तुझ्यासंगे राहातं
प्रत्येकाशी नातं इथेच जपायचंय ॥
सात जन्म सोड तार मनाची जोड
नातं कर गोड इथेच नांदायचंय ॥
आनंदाचं भान प्रत्येक कामात जाण
नशिबाचं जे दान इथेच पडायचंय ॥
आहेस नशीबवान क्षणिक तुझं स्थान
जन्माचं हे वाण इथेच लुटायचंय ॥
कुणास नको त्रास मदतही केल्यास
स्वार्थ हाच ध्यास इथेच निवडायचंय ॥
किती धडपडशील किती झगडशील
जे काही कमावशील इथेच ठेवायचंय ॥
काही करण्यात धर्म काहीत अधर्म
करशील जे कर्म इथेच भोगायचंय ॥
पापाचा घडा फुटला गंगेमध्ये धुतला
जन्म नाही पुढला इथेच संपायचंय ॥
वस्तू आणि पैसा किती जोडशील ऐसा
प्राण जाईल जैसा इथेच सोडायचंय ॥
इथेच जगायचंय इथेच मरायचंय
जे काही करायचंय इथेच करायचंय ॥



