
क्षणमित्र
ऑगस्ट 3, 2025
इथेच
डिसेंबर 7, 2025मी अभियंता

राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर मोक्षगुंडम विश्वेशवरय्या ह्या विलक्षण भारतीय अभियंत्याच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या सामाजिक माध्यमं, दूरचित्रवाणी, बँका, सरकारं वगैरेंनी प्रक्षेपित केलेल्या आभासी जगात, आपण ह्या साऱ्याचा पाया असलेल्या भौतिक जगाला कमी लेखू लागलो आहोत. मात्र ह्या पायाचं महत्त्व एक अभियंता खचितच जाणून असतो..
वस्तू असो वा वास्तू थांबे तेव्हा मी ती बनता
मी तर अभियंता ॥
वाया जाता काही
मजला आवडत नाही
सृजनाचा आदर
वसतो माझ्या ठायी
संसाधने वापरीन पुरवून दुष्ट अपव्यय टळता
मी तर अभियंता ॥
कामगार किसान
कारकून जवान
मी केलेल्या वस्तूंचे
सर्वांच्या हाती स्थान
नांगर, बंदूक, बोरू, हातोडा वापर करते जनता
मी तर अभियंता ॥
भ्रमणध्वनी हातात
विमान आकाशात
क्रांती संगणकाची
आणली मी झोकात
अडवू शकत नाही मजला ती विषयाची कठीणता
मी तर अभियंता ॥
अंतराळातील यानी
आणि रक्तवाहिनी
मी तेथे पोहोचतो
बंधन नाही मनी
रोखण्यास मजला निष्प्रभ तो विरळपणा वा घनता
मी तर अभियंता ॥
वापरूनी विज्ञान
घडवीन तंत्रज्ञान
मानवजातीकरता
सुखाचे जीवनमान
अडचण कुठली येता सोडा माझ्या हाती चिंता
मी तर अभियंता ॥
दूर सारते भ्रांती
औद्योगिक ती क्रांती
माझ्यामुळेच युद्ध जरी
तरी माझ्यामुळेच शांती
मी केवळ साहित्य बनवतो नाही कुणाशी तंटा
मी तर अभियंता ॥
मी आहे विचारी
ना भावनांच्या आहारी
औषध द्यावे आधी पडता
व्यक्ती कुणी आजारी
चिंतन माझे स्पष्ट टाळुनी भावुकतेचा गुंता
मी तर अभियंता ॥
सडेतोड स्वभाव
अंधश्रद्धा अभाव
चमत्कारा नकार
दिसे कार्यकारणभाव
प्रयोगाअंती सिद्ध घटनेस मी देई मान्यता
मी तर अभियंता ॥
वस्तू असो वा वास्तू थांबे तेव्हा मी ती बनता
मी तर अभियंता ॥



