कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

जानेवारी 1, 2026

मला देव पावला

लहानपणी ऐकलेल्या अनेक गोष्टींमध्ये देवाला प्रसन्न करून वर मागून घेणं ह्या गोष्टीचं अत्यंत आकर्षण वाटत असे. तुम्हाला खरंच जर देव पावला तर तुम्ही काय वर मागाल ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय? थिल्लरपणे नाही, खोल, गंभीर विचार करून... एकदा प्रयत्न करून पाहा. वाटतं तितकं ते सोपं नाही..

मला देव पावला.. 
माझ्या पुढ्यात उभा ठाकला 
गालातल्या गालात हसत म्हणाला, तुला एक वर देतो 
माग काय हवंय ते..
पण.. फक्त स्वतःकरता 
मी नास्तिक.. मीच का?? समजलं नाही..  
काय गारुड घातलं कुणास ठाऊक पण.. 
मी विचार करू लागलो

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/emRYrEG4INo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जून 1, 2025

बोला

काही वेळा लहान मुलांकरता लिहिलेल्या गोष्टी मोठ्यांना समज देण्याकरताही वापरता येतात. मध्यंतरी अभिनेते प्रकाश राज ह्याच्या एका मुलाखतीत ह्याचं उत्तम उदाहरण ऐकायला मिळालं. पंचतंत्रातील एका गोष्टीचं त्यांनी केलेलं रुपांतर काव्यरुपात मांडण्याचा हा एक नम्र प्रयत्न..

अचानक एक कासव भेटलं, ओळखीचं वाटलं, डोळ्यांवर विश्वास बसंना
म्हटलं, अरे तू तर तोच पंचतंत्राच्या गोष्टीतील कासव ना?
हसून आलं माझ्या पुढ्यात चेहरा करून भोळा
म्हणालं, होय मीच तो काय कसं काय, बोला.. ॥

अरे पण बगळ्यांसोबत उडताना तुझ्या बोलण्याच्या सवयीने केला होता ना घात
बोलण्याचे तोटे, तुझ्या मरणाची गोष्ट सांगून अजून शाळेत शिकवतात
अहो, अर्धीच गोष्ट ठाऊक तुम्हाला, मला म्हणालं मारत डोळा
पडलो तरी रक्षण करणारी आहे माझी कणखर पाठ, आता बोला! ॥


माझी ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/xkTjH8LLTCU ह्या ठिकाणी ऐकता येईल.,
एप्रिल 7, 2025

न वटलेला चेक

जागतिक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा! शारीरिक आरोग्याइतकंच, किंबहुना थोडं जास्तच महत्त्वाचं मानसिक आरोग्य असतं. स्वतःच्या आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना जेव्हा संकटं घेरतात तेव्हा मनाला उभारी देण्याकरता कुणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणंही पुरेसं असतं..

बागेमध्ये बसला होता चुरगळलेला वेश
चेहरा होता उदास होते अस्ताव्यस्त केस
तरूण होता मनात त्याच्या विचार होते घोळत
स्वत:शीच बोलत होता हात होता चोळत
वृद्ध पाहात बसला होता जवळच बाकावर
जाऊन त्यास म्हणाला तरूणा स्वत:ला सावर
शून्यात नजर लावून तरूण म्हणे सावरू कसा
नोकरी गेली माझी त्याचा दाटून आला घसा
खिशामधून चुरगळलेला कागद काढला एक
आज मिळाला फुल अॅण्ड फायनल सेटलमेंटचा चेक ॥


माझी ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/SfSx8KZqNUw ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 21, 2024

एकमत

‘जात नाही ती जात’ हे साचेबंद वाक्य कितीही घासून गुळगुळीत झालं तरी ते कालबाह्य होणार नाही काळजी आपण निगुतीने घेतो. नवीन शेजारी असो, नवीन सहकर्मचारी असो किंवा अगदी स्वतःचं फक्त पहिलं नाव लावणारी एखादी अभिनेत्री असो.. त्यांचं आडनाव समजेपर्यंत आपल्याला अगदी चैन पडत नाही. त्यामुळे मग लग्नाच्या बाबतीत तर विचारायलाच नको. उपहासपूर्ण लेखनाकरता प्रसिद्ध हिंदी लेखक हरीशंकर परसाई ह्यांच्या एका कथेवर आधारित ही कविता..

रामरावांचा मुलगा होता शामरावांची मुलगी 
पडले प्रेमात एकमेकांशिवाय नव्हतं करमत 
दोघांच्याही पित्यांना ही पटणार नव्हती सलगी 
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥

असल्या गोष्टी लपत नसतात कळलंच एका रात्री 
रामराव आणि शामरावांवर कोसळला जणू पर्वत 
आपलीच जात श्रेष्ठ होती दोघांनाही खात्री
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/K01l3OjdMwA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 5, 2024

नग्न सत्य

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एका युरोपीय दंतकथेनुसार एकदा सत्य आणि असत्याची भेट झाली. त्या भेटीवर आधारित चित्रकार जाँ लिआँ जेरोमने काढलेलं ‘Naked Truth’ नावाचं चित्रही जगप्रसिद्ध आहे. सध्या आपल्या देशात जो वाचाळ धुरळा उडवला जातोय त्या पार्श्वभूमीवर ही दंतकथा तुम्हाला सत्यकथा वाटली तर त्यात नवल नाही..

सत्याच्या भेटीस एकदा आले पाहा असत्य
रीतीनुसार सत्यही करी असत्याचे अतिथ्य
जुनी गोष्ट आहे तरीही ऐकुनी एकदा पाहा
सत्यामध्ये ह्या गोष्टीच्या लपले मोठे तथ्य ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/sqoiHiaXEtY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 17, 2023

सहावं महाभूत

आज आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मुलन दिन आहे. आदिमानव स्वतःचं अन्न स्वतःच गोळा करून किंवा शिकार करून मिळवत असे. मग शेतीचा शोध लागला. आता शेतीकरता मेहनत घेतल्यावर जमिनीवर मालकी हक्क येणारच. आणि इथेच सगळी गोची झाली. पुढे ह्या मालकी हक्काच्या भानगडीतूनच सहाव्या महाभुताचा जन्म झाला..

जल अग्नी वात धरणी आकाश निळे छान
जीवसृष्टीकरता होतं प्रत्येकच वरदान
मदत करणं जीवनाला त्यांचं मुख्य कार्य
शिक्षा करत त्यांचा कोणी केला जर अपमान ॥


जीवसृष्टी प्रगत झाली आली मानवजात
जीवसृष्टीच्या कारभारालाच घातला त्यांनी हात
धोकादायक ठरू लागले इतर जीवांकरता
एक एक करत महाभुतांवर केली त्यांनी मात ॥