जानेवारी 4, 2025

चविताक

सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा?

चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो 
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥

{अशी एक भाषा आहे तिला नाही तोड 
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥}
डिसेंबर 4, 2024

खिडकी

शहरांच्या पसरण्याला एक सीमा असते. ही सीमा गाठली की मग शहरं उंचीने वाढू लागतात. दहा, तीस, सत्तर मजली इमारती. आणि मग अश्या इमारतीतील घराच्या खिडकीतून दिसतात त्या फक्त इतर खिडक्या. भावनाविरहीत, व्यक्तीनिरपेक्ष, भौमितीय खिडक्या..

नवी भव्य ती इमारत कित्येक लोक वसले
आयुष्य मात्र त्यांचे खिडकीत नाही दिसले ॥

आयुष्यभर शिदोरी जमवून घर मिळाले
ते कष्ट दो जीवांचे खिडकीत नाही दिसले ॥

परदेशी पुत्र आपुल्या मातापित्यास विसरी
कारुण्य जोडप्याचे खिडकीत नाही दिसले ॥
नोव्हेंबर 1, 2024

बावळट

मराठी माध्यमाच्या शाळेतून इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयात गेल्यावर कानावर पडण्याऱ्या भाषांच्या कक्षा वाढल्या. नोकरी लागल्यावर काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय भाषांची त्यात भर पडली. ह्या भाषांची समाज जरी मर्यादित असली तरी एका बाबतीत माझं मत ठाम होत चाललं आहे. ‘बावळट’सारखा अपमानजनक शब्द दुसऱ्या कोणत्याही भाषेत नसावा..

वाच्य-अर्वाच्य शिव्यांचा मराठीत तुटवडा नाही 
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥

हायवेवर माझ्या पुढे जाणारा म्हणतो बावळट रात्री पोहोचेल 
हायवेवर माझ्याहून हळू जाणारा म्हणतो बावळट नक्कीच मरेल 
आठदहा मिनिटांच्या फरकाने जो तो पुण्यास जाई 
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/OlPerJvvux4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 21, 2024

एकमत

‘जात नाही ती जात’ हे साचेबंद वाक्य कितीही घासून गुळगुळीत झालं तरी ते कालबाह्य होणार नाही काळजी आपण निगुतीने घेतो. नवीन शेजारी असो, नवीन सहकर्मचारी असो किंवा अगदी स्वतःचं फक्त पहिलं नाव लावणारी एखादी अभिनेत्री असो.. त्यांचं आडनाव समजेपर्यंत आपल्याला अगदी चैन पडत नाही. त्यामुळे मग लग्नाच्या बाबतीत तर विचारायलाच नको. उपहासपूर्ण लेखनाकरता प्रसिद्ध हिंदी लेखक हरीशंकर परसाई ह्यांच्या एका कथेवर आधारित ही कविता..

रामरावांचा मुलगा होता शामरावांची मुलगी 
पडले प्रेमात एकमेकांशिवाय नव्हतं करमत 
दोघांच्याही पित्यांना ही पटणार नव्हती सलगी 
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥

असल्या गोष्टी लपत नसतात कळलंच एका रात्री 
रामराव आणि शामरावांवर कोसळला जणू पर्वत 
आपलीच जात श्रेष्ठ होती दोघांनाही खात्री
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/K01l3OjdMwA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 5, 2024

नग्न सत्य

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एका युरोपीय दंतकथेनुसार एकदा सत्य आणि असत्याची भेट झाली. त्या भेटीवर आधारित चित्रकार जाँ लिआँ जेरोमने काढलेलं ‘Naked Truth’ नावाचं चित्रही जगप्रसिद्ध आहे. सध्या आपल्या देशात जो वाचाळ धुरळा उडवला जातोय त्या पार्श्वभूमीवर ही दंतकथा तुम्हाला सत्यकथा वाटली तर त्यात नवल नाही..

सत्याच्या भेटीस एकदा आले पाहा असत्य
रीतीनुसार सत्यही करी असत्याचे अतिथ्य
जुनी गोष्ट आहे तरीही ऐकुनी एकदा पाहा
सत्यामध्ये ह्या गोष्टीच्या लपले मोठे तथ्य ॥
ऑक्टोबर 17, 2023

सहावं महाभूत

आज आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मुलन दिन आहे. आदिमानव स्वतःचं अन्न स्वतःच गोळा करून किंवा शिकार करून मिळवत असे. मग शेतीचा शोध लागला. आता शेतीकरता मेहनत घेतल्यावर जमिनीवर मालकी हक्क येणारच. आणि इथेच सगळी गोची झाली. पुढे ह्या मालकी हक्काच्या भानगडीतूनच सहाव्या महाभुताचा जन्म झाला..

जल अग्नी वात धरणी आकाश निळे छान
जीवसृष्टीकरता होतं प्रत्येकच वरदान
मदत करणं जीवनाला त्यांचं मुख्य कार्य
शिक्षा करत त्यांचा कोणी केला जर अपमान ॥


जीवसृष्टी प्रगत झाली आली मानवजात
जीवसृष्टीच्या कारभारालाच घातला त्यांनी हात
धोकादायक ठरू लागले इतर जीवांकरता
एक एक करत महाभुतांवर केली त्यांनी मात ॥

मनोगत


सन २०११ सालच्या जानेवारी महिन्यात माझं नवनिर्मिती.इन हे संकेतस्थळ सुरु झालं. ह्या संकेतस्थळाच्या नावामागील कार्यकारण पुढे सविस्तर लिहिलं आहे. मात्र मी जे काही लिहितो ते तुम्हा वाचकांपर्यंत तुमच्या सोयीनुसार पोहोचावं हादेखील ह्या संकेतस्थळामागील एक हेतू होता आणि अजूनही आहे. गेल्या सात वर्षांच्या साहित्य प्रवासात एक व्यक्ती म्हणून मी जसा घडत गेलो त्यानुसार संकेतस्थळातही सुधारणा करण्याची आवश्यकता भासू लागली. सन २०१८च्या जानेवारी महिन्यात हे नवीन रूपातील तेच संकेतस्थळ तुमच्यापुढे सादर करत आहे. ते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.