डिसेंबर 15, 2011
(ही कविता २०१२ साली 'पुढचं पाऊल' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे. ) बांगलादेशच्या युद्धाला चाळीस वर्षं झाली. भारताच्या दृष्टीने ती 'मदत' होती; पाकिस्तानकरता ती 'घुसखोरी' होती; तर बांगलादेशकरता तो 'स्वातंत्र्यलढा' होता. पण ह्या युद्धाचं चर्वितचर्वण करताना त्यात तिन्ही देशांच्या मिळून मृत्युमुखी पडलेल्या ४०,००० सैनिकांचा विचार कोणी करतंय का? मनात माजे काहूर तुझिया आठवणींचे लाख विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक तरुण पत्नी तुझ्या विचारी बसली झुरत असेल अंध आईच्या घशामधुनी घासही सरत नसेल उभे पिक ते कापणीविना झाले असेल खाक विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/y3_iUpzX8hA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 2, 2011
ही कविता २०११ साली सकाळ प्रकाशनाच्या 'शब्ददीप' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.
ग्रामीण भागातील समस्यांचा रामबाण उपाय म्हणून शहरांकडे बघितलं जातं. आणि मग गावातून शहरात येणारे लोंढे वाढतच जातात. आपल्या आई-वडिलांनी बहुतेक तेच केलं. पण सुव्यवस्था कोलमडलेल्या ह्या नगरांमध्ये गावातून येणारा माणूस खरच सुखी होतो का?
दहा बाय बाराची लहानशी खोली
म्हातारीचा बिछाना बाळाची झोळी
मुलांचा अभ्यास बायकोचा स्वयंपाक
तिथेच झोपतो करून अंगाची मोळी
झोपलो तरी असतो निदान पसरून पाय
गाव सोडून मी मिळवलं काय?
नोव्हेंबर 18, 2011
आपण बोलताना बरेचदा 'क्यायच्या क्याय!' विधानं करून बसतो आणि मग त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं ते आपल्याला समजत नाही. असे फाटलेले संवाद रफू करून देणारा एखादा शिंपी मिळाला तर त्याला कामाचा कधीही तुटवडा पडणार नाही. एका राजाला असा शिंपी मिळाला आणि त्याने त्या राजाची कशी मदत केली ते वाचा 'रफू' ह्या काव्यकथेत ...
राजाच्या दरबारी आला कलाकार तो करी सलाम
शिवणकलेचे घेईन दाम रफू करीन ते माझे काम
राजा म्हणतो त्याला
असती मम दरबारी
शिंपी निपुण प्रभारी
शिवणकला ती सारी
मला सांग मी तुजला
कशास ठेवू जवळ
शिवणकला ती सकल
त्यात काय ते नवल
शिंपी म्हणतो कपडे नाही रफू करीन मी बोल तमाम
शिवणकलेचे घेईन दाम रफू करीन ते माझे काम
नोव्हेंबर 4, 2011
११.११.११ ही तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशा काही सुरस आणि चमत्कारिक बातम्या ऐकायला मिळत आहेत. जन्माची संभाव्य तारीख अगोदरची असेल तर जोडपी डॉक्टरांना प्रसूती पुढे ढकलण्याचे उपाय विचारात आहेत. नंतरची असेल तर त्या दिवशी सिझेरिअन करायला सांगत आहेत. समारंभांच्या कार्यालयांचे त्या दिवसाचे दर दुप्पट तिप्पट झाले आहेत. आपल्या आयुष्यात तारखेचं महत्व खरच किती आहे नाही! पटवून देण्या खरच तुमचा जन्म आहे झाला जन्माच्या त्या दाखल्यावरती आधी तारीख घाला वाढदिवसाची तारीख घालते आनंदाशी सांगड तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड
ऑक्टोबर 21, 2011
आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या हातून घडलेल्या घोडचुकीचे परिणाम जर त्या व्यक्तीला भोगावे लागले तर आपण 'करावे तसे भरावे' असं म्हणून मोकळे होतो. पण त्याच चुकीचे परिणाम जर इतरांना भोगावे लागले तर त्याला काय म्हणावं ...? घरी जाऊनी मला म्हणाला बाळा ही बघ आई मला पाहुनी मान फिरवली शब्दही वदली नाही चेहरा तिचा पाहुनी मनी ह्या प्रकाश पडला लक्ख केवळ योगायोगे त्याने मला निवडले नाही जन्माला घातले मला पण आठवण आली आज मला बनविले अनाथ तेव्हा कसला होता माज आज स्वतःला मुल नसे तर उरावरी पत्नीच्या मला बसवितानाही त्याला वाटत नव्हती लाज सोडून दिधले मला जगाच्या अमानवी रानात दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ
ऑक्टोबर 7, 2011
सणासुदीचे दिवस म्हणजे घरी देव-देवतांचा उल्लेख होणं ओघानेच आलं. अशा वेळी मोठ्या माणसांना न पडणारे प्रश्न लहान मुलांना साहजिकपणे पडतात. त्यात सुट्ट्या सुरु झाल्या की मग तर प्रश्नांना ऊत येतो. पहा ह्या प्रश्नांची उत्तरं देणं जमतंय का ...
आंघोळ सूर्यदेवाला आहे का हो माफ?
पाणी घेतलं अंगावर तर नुसतीच होईल वाफ
शंकराला नाद लागला वाचन करण्याचा
कसा मिळेल चष्मा त्याला तीन डोळ्यांचा?
ऑगस्ट 19, 2011
एकदा एका तळ्यातील बेडकांना साक्षात्कार झाला की आपल्यातील एखाद्या बेडकालाच जर राजा नेमलं तर तो आपल्या तळ्याचं भलं करेल. त्यानंतर ह्या तळ्यात आलेल्या बेडूकशाहीमुळे त्या बेडकांना काय काय भोगावं लागलं त्याची ही कथा. आपलं बरं आहे, आपण बेडूक नाही ... लोक आहोत ...!
राजाने त्या जाहीर केला नवा लगोलग कर
मलाच देऊन जावा नसतील कष्ट करायचे तर
बघता बघता सारे भरती राजाचे त्या दाम
विकल्प असता कोण करतसे आपुले आपण काम
तळे राहिले गलिच्छ राजा महालात पण राही
अशा प्रकारे पसरू लागली तेथे बेडूकशाही
ऑगस्ट 5, 2011
लवकरच आपण स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करू. आपली पिढी स्वातंत्र्य गृहीत धरते आणि त्यात काही वावगं नाही, पण त्याचवेळी हे स्वातंत्र्य मिळवताना आपल्याला काय किंमत मोजावी लागली हे विसरून चालणार नाही. फाळणीच्या होमात होरपळलेल्या शहिदांना ही श्रद्धांजली!
दीड कोटी जन होऊनी गेले घरामध्ये बेघर
पाच लक्ष चढले मृत्युच्या अघोर वेदीवर
सौहार्दाच्या अमृतावरी हलाहल कसे पडले
कोण शत्रू अन कोण मित्र अन कसला हा संगर
वस्त्र विविधरंगी विणलेले उरले नाही तलम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम
जुलै 16, 2011
"तुमच्या घरी सगळे सुखरूप आहेत ना? ... बरं झालं ... आम्हीही सगळे घरीच आहोत." झालं ... आपण मोकळे ... टीवीवर दाखवली जाणारी रक्तरंजित दृश्य पाहायला ... हतबल, मुर्दाड, ‘षंढ’! आतंकाचा वणवा करतो स्फोटामागून स्फोट किती उमलत्या आयुष्यांना पाजी विषाचे घोट शरीरांचे विच्छिन्न भाग ते पाहून मनात रडसी हात बांधून घेसी आणिक शिवून टाकसी ओठ करतील कुणीतरी काहीतरी अन देश राहील अखंड स्वतःचीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ
जुलै 1, 2011
आपल्या देशाचा बट्ट्याबोळ करायला ब्रिटिशांना दोन शतकं लागली. मग त्या मानाने स्वातंत्र्य मिळून झालेली चौसष्ठ वर्षं कमीच नाहीत का? म्हणूनच आपला देश प्रगत देशांच्या पंगतीत बसवण्याकरता अधीर झालेल्या काही मंडळींना सांगावसं वाटतं की बाबा रे, धीर धर, 'थोडा धीर धर'! जन्मदिन असे ब्रह्मांडाचा एक जानेवारी आणि पुढील घडामोड समजा वर्षात झाली सारी पहिले आठ महिने सूर्यच अस्तित्वात नव्हता ऑगस्ट वीस दिवशी आली सूर्याची मग स्वारी एकतीस डिसेंबर रात्री वाजून गेले दहा पृथ्वीवरती मनुष्याचा पत्ता नाही पाहा पावणेअकरा वाजता आले मनुष्यांचे पूर्वज अकरा बावन्न वाजले शेवटी आपण आलो अहा
जून 17, 2011
काही दिवसांपूर्वी मला लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी सोहोळ्याला उपस्थित राहण्याची एकदा नाही तर दोनदा संधी मिळाली. लग्नाला पन्नास वर्षं होणं म्हणजे समजुतदारपणा आणि आरोग्य ह्यांचा दुर्मिळ संगम. पन्नास वर्षांपूर्वी जग कसं होतं ह्याचा विचार केला तर पन्नास वर्षं म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे ते लक्षात येईल. सादर आहे ह्याच विचारांवर बनलेली एक कविता 'तिची आणि माझी भेट'.
नरी कॉन्ट्रॅक्टर होता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
पुलंची अपूर्वाई आणि गणगोत ही पुस्तकं लोकप्रिय झाली होती फार
मुघल-ए-आझमच्या भव्यतेने लोक वेडे झाले होते पार
लताचं अल्ला तेरो नाम रेडिओवर वाजत आणि गाजत होतं सातही वार
जेव्हा दिलीप वेंगसरकरचं वय होतं फक्त चार
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
पन्नास वर्षांपूर्वी
जून 3, 2011
जून ४ हा दिवस राष्ट्रसंघाने क्रौर्यामुळे बळी जाणाऱ्या बालकांचा दिवस म्हणून जाहीर केला आहे. ह्या क्रौर्याचा संबंध जरी युद्धकाळाशी असला तरी आपल्या समाजातही ह्या दिवसाचा संदर्भ महत्वाचा आहे. लहान मुलांवर हात उगारणं म्हणजे स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या व्यक्तीवर केलेला भ्याड अत्याचार. मुलांना सुधारण्याकरता त्यांना मारण्याआधी पालकांनी स्वतःला आरशात पाहावं. आपण ऑफिसला न जाण्याकरता खोटं कारण द्यायचं आणि मुलांनी खोटं बोललं की त्यांना मारायचं ह्यातील दांभिकता मुलांना लगेच समजते. माझी 'अघोरी' ही काव्यकथा लिहिताना मला बराच त्रास झाला. ती वाचताना कदाचित तुम्हालाही त्रास झाला तर ती सर्वस्वी माझी चूक असेल. पण कधी कधी एखादा मुद्दा जोरकसपणे मांडण्याकरता काहीतरी धक्कादायक लिहिणं भाग असतं ... विचार करण्यापलीकडे मी गेलो होतो पार मिळेल त्याने हातावरती केले चार प्रहार ... आजही चिंटू माझ्यावरती तितकंच प्रेम करतो पण हाताकडे पाहत आपल्या नेहमी प्रश्न पुसतो ...












