
बोथट
जुलै 5, 2025
मी अभियंता
सप्टेंबर 15, 2025क्षणमित्र

मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्या दिवशी एका रिक्षाच्या मागे एकच शब्द लिहिलेला पाहिला. क्षणमित्र. किती सुंदर शब्द आहे नाही! ऐन गरजेच्या वेळी – मग ती गरज कितीही साधी असो – उभा ठाकतो तो खरा मित्र. टोपलीला हात लावणारे, हेडलाईट्स चालू आहेत असं सांगणारे, आपल्याकरता लिफ्टचं दार धरून ठेवणारे, असे कित्येक क्षणमित्र आणि मैत्रिणी आपल्यात वावरत असतात. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, त्यांच्यासारखं बनलं पाहिजे..माझी ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/fx2o9f8M3HY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
अडचण लहान, नाही संकट जया म्हणावे
मदतीस येई कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
रिक्षातुनी उतरलो भाडे कमीच होते
देईल सुटे कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
प्लॅटफॉर्म उंच होता गाडीही येत होती
देईल हात कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
वृद्ध उभा तो एक रहदारी होती भारी
नेई पल्याड कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
बसमध्ये गर्दी होती गर्भार नारी चढली
आसनी उठे कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
स्टेशनी ट्रेन येता खच्चून भरली होती
देई शिरुनि कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
कोसळे अथक पाऊस वैतागलेले सगळे
स्मितहास्य देई कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
त्या क्षणी मदत होते जरी असे तो निनावी
भेटेल असा कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
रोजची असे चिडचिड रोजची असे कुरकुर
सुसह्य करे कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥
अनुभवातून शिकूनी जागव स्वतःत मैत्र
त्रासला असे कोणी क्षणमित्र तू बनावे ॥
अडचण लहान, नाही संकट जया म्हणावे
मदतीस येई कोणी क्षणमित्र त्यां म्हणावे ॥



