मार्च 4, 2016
आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण 'सोयीस्कर'पणे विसरत तर नाही ना?
त्या देशद्रोह्यांविरुद्ध सात्त्विक संताप अनावर झाला
व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला
प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट
देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत
देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील
उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
फेब्रुवारी 5, 2016
सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं...
देवदुताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले
शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले
दीनदुःखीतांना लुटले हा मनुष्य ऐसा पापी
पैशांकरता केले ह्याने धंदे कसले कसले
पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक
हा तर आहे नरक
जानेवारी 15, 2016
घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते. कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
जानेवारी 1, 2016
खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला ...
प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी
स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी
चूक कुणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद
तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद
अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान
शूर स्वतःला समजतोस तर हे माझे आव्हान
डिसेंबर 18, 2015
माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा...
पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात
खोलीमध्ये शिडी एक
उभी होती केली
हुशार एका माकडाची
नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
शिडीवर तू चढ
माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात
डिसेंबर 4, 2015
"परत मुलगीच झाली . . . अरेरे!" हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं! स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का? होती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती कारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक दुसऱ्या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक तिसऱ्या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी आमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 20, 2015
भाषा ही शेवटी भावना व्यक्त करण्याचं केवळ एक साधन आहे. आपण बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांतून मनाला जो संदेश मिळतो तो शब्दांपलीकडला असतो. कालांतराने शब्द विसरले जातात पण त्या संदेशाचा ठसा आठवणीच्या रूपाने मनावर कायम उमटलेला राहतो. शब्दांवर शब्दांचा उतारा असू शकतो पण ह्या आठवणींवर उतारा नसतो ...
मोठा झालो कमवू लागलो
रंगलो माझ्या रंगी
वाटू लागले सर्व जगाची
बुद्धी माझ्या अंगी
विचार करण्या फुरसत नव्हती
असा जीवनी वेग
शब्दांचे पण तीर लागले
दगडावर जणू रेघ
उशिरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
आठवणी राहून जातात
नोव्हेंबर 6, 2015
आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं ...
तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ?
तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ
माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का?
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ZEpH1FsUp0o ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 16, 2015
काही लोकांच्या घरची टापटीप बघितली की मला कमीपणा वाटत असे. सगळं कसं आखीव रेखीव . . . प्रत्येक वस्तू जागच्या जागी . . . स्वच्छता तर इतकी की जमीन पाहून भांग पाडावा . . . पण अशा घरांमध्ये मला अवघडून गेल्यासारखं का वाटतं? आपल्या हातून कोचावर चहा सांडेल, काचेची फुलदाणी फुटेल, चमचा हातातून पडेल अशी भीती सारखी का वाटत राहते? मग मी माझं घर नीट निरखून पाहिलं . . . आणि हळूहळू मला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली...
कोपऱ्यात एक जळमट
खुर्चीवर डाग कळकट
भिंत थोडीशी तेलकट
पण इथल्या प्रत्येक वस्तूवर मायेचा थर आहे
ही शोरूम नाही घर आहे
थोडे कपडे अस्ताव्यस्त
पलंगावर चादरी स्वस्त
पुस्तकं इतस्ततः मस्त
पण इथे हवी ती वस्तू हव्या त्या जागेवर आहे
हे हॉटेल नाही घर आहे
ऑक्टोबर 2, 2015
थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यात काही वावगं नाही. मात्र ते करताना त्यांच्या केवळ त्रुटी दाखवून देऊन आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं ह्यात काही अर्थ नाही. थोर व्यक्तींना थोरपण ज्या गुणांमुळे लाभतं तेवढे गुण घावेत, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि बाकी सारं सोडून द्यावं...
हाताला बोचले की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भुत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं
दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं
सप्टेंबर 18, 2015
'अतिपरिचयात अवज्ञा . . .' असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण 'आपलं माणूस' म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी...
कधी कानावर ये तान
विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
मज येई तुझा आठव
कुणी सारी केस बोटाने
अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
मज येई तुझा आठव
ऑगस्ट 21, 2015
'घर की मुर्गी दाल बराबर' ही उक्ती लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला लागू पडत असावी असा समज WhatsAppवर येणाऱ्या 'बायको' ह्या विषयावरील संदेशांच्या वर्दळीमुळे होणं साहजिक आहे. त्यामुळे 'बाहर की दाल मुर्गी बराबर' वाटणंही ओघानेच आलं. मात्र मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यात येणारी बाहरवाली कुणाचीतरी बायको असते हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं. दुपारनंतर कुणास ठाऊक किती झाले चहा आणि कूर्मगतीने वेळ सरकत वाजले एकदाचे सहा थोडा वेळ चोळले कपाळावरचे आणि मानेचे स्नायू मग हळूच लिहिलं लॅपटॉपवरील चॅटवर 'हॅलो, हाऊ आर यू' 'गिव मी टू मिनिट्स' असा मेसेज माझ्या स्क्रीनवर चढला वाट पाहणारा माझा जीव भांड्यात पडला रोज संध्याकाळचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आता रंगतील चांगल्या तास दीड तास गप्पा












