कविता
विचार
'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.
डिसेंबर 7, 2025
अब्जावधी शुक्राणूंपैकी एकाचा बीजांडाशी संकर होऊन तुमचा जन्म होतो ही तुमच्या अस्तित्वाकरता अशक्यकोटीतील घटना आहे. ह्या ब्रह्मांडाचा अनुभव घेण्याची संधी मिळालेले आपण सारे नशीबवान आहोत हे वादातीत. मृत्यू अवचित आणि अटळ आहे. त्यामुळे आनंद उपभोगण्याकरता हाच तो जन्म, हीच ती वेळ, हाच तो क्षण! इथेच जगायचंय इथेच मरायचंय जे काही करायचंय इथेच करायचंय ॥ सात जन्म सोड तार मनाची जोड नातं कर गोड इथेच नांदायचंय ॥ किती धडपडशील किती झगडशील जे काही कमावशील इथेच ठेवायचंय ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/okDsufc8ex0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 5, 2025
आपण हाताळत असलेलं हत्यार तीक्ष्ण असेल तर आपण सावध असतो. त्यामुळे बोथट हत्यारंच आपल्याला जास्त जखमा देऊन जातात. ह्या जखमा जीवघेण्या नसल्या तरी वेदनादायी नक्कीच असतात.. आता सुपारी ती काय! पण अडकित्त्याला जर धार नसेल तर नीट कातरल्या न गेलेल्या सुपारीमुळे काय होऊ शकतं ह्याची सुपारी न खाणारेही कल्पना करू शकतात.. कंठाशी प्राण येतो साध्या सुपारीनेही जखमा कितीक दिल्या बोथट कट्यारीनेही ॥ माझी ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/v1GdBHH7738 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 4, 2025
सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा?
चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो
चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥
{अशी एक भाषा आहे तिला नाही तोड
ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥}
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/DqFtusxacyU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 4, 2024
शहरांच्या पसरण्याला एक सीमा असते. ही सीमा गाठली की मग शहरं उंचीने वाढू लागतात. दहा, तीस, सत्तर मजली इमारती. आणि मग अश्या इमारतीतील घराच्या खिडकीतून दिसतात त्या फक्त इतर खिडक्या. भावनाविरहीत, व्यक्तीनिरपेक्ष, भौमितीय खिडक्या.. नवी भव्य ती इमारत कित्येक लोक वसले आयुष्य मात्र त्यांचे खिडकीत नाही दिसले ॥ आयुष्यभर शिदोरी जमवून घर मिळाले ते कष्ट दो जीवांचे खिडकीत नाही दिसले ॥ परदेशी पुत्र आपुल्या मातापित्यास विसरी कारुण्य जोडप्याचे खिडकीत नाही दिसले ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/DqFtusxacyU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 1, 2024
मराठी माध्यमाच्या शाळेतून इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयात गेल्यावर कानावर पडण्याऱ्या भाषांच्या कक्षा वाढल्या. नोकरी लागल्यावर काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय भाषांची त्यात भर पडली. ह्या भाषांची समाज जरी मर्यादित असली तरी एका बाबतीत माझं मत ठाम होत चाललं आहे. ‘बावळट’सारखा अपमानजनक शब्द दुसऱ्या कोणत्याही भाषेत नसावा.. वाच्य-अर्वाच्य शिव्यांचा मराठीत तुटवडा नाही पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥ हायवेवर माझ्या पुढे जाणारा म्हणतो बावळट रात्री पोहोचेल हायवेवर माझ्याहून हळू जाणारा म्हणतो बावळट नक्कीच मरेल आठदहा मिनिटांच्या फरकाने जो तो पुण्यास जाई पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/OlPerJvvux4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 22, 2023
शुभकार्याकरता पंचांग पाहून मुहूर्त शोधणं जमलं नाही तर निदान साडेतीन मुहूर्तांपैकी एखादा मुहूर्त साधणं ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. हल्लीच्या काळातही व्यायाम, ऑफिसमधून घरी लवकर येणं, जिभेवर ताबा ठेवणं ह्याकरता नवीन वर्षाच्या मुहूर्ताची वाट पाहणारे काही अपवादात्मक नाहीत. ह्या कवितेकरताही मी एका चांगल्या मुहूर्ताच्या शोधात होतो. पण मग म्हटलं .. मुहूर्त शोधत असशील चांगलं करण्याकरता काही तर आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥ ऑफिसमध्ये उशीर व्हायला कारण काही नसतं पत्नी मुलांना घेऊन जरा फिरायला जा मस्त कुटुंबीयांच्यासोबत एकदा काढण्या वेळ असाही आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥






