
इथेच
डिसेंबर 7, 2025
हवी तूच
फेब्रुवारी 14, 2026मला देव पावला

लहानपणी ऐकलेल्या अनेक गोष्टींमध्ये देवाला प्रसन्न करून वर मागून घेणं ह्या गोष्टीचं अत्यंत आकर्षण वाटत असे. तुम्हाला खरंच जर देव पावला तर तुम्ही काय वर मागाल ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय? थिल्लरपणे नाही, खोल, गंभीर विचार करून… एकदा प्रयत्न करून पाहा. वाटतं तितकं ते सोपं नाही..ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/emRYrEG4INo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मला देव पावला..
माझ्या पुढ्यात उभा ठाकला
गालातल्या गालात हसत म्हणाला, तुला एक वर देतो
माग काय हवंय ते..
पण.. फक्त स्वतःकरता
मी नास्तिक.. मीच का?? समजलं नाही..
काय गारुड घातलं कुणास ठाऊक पण..
मी विचार करू लागलो
देव लोकांचा ट्रॅक रेकॉर्ड मला ठाऊक होता
त्यात ते स्मितहास्य.. कुत्सित की छद्मी?
इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन मिळायचं..
त्या कुंभकर्णासारखं..
नाहीतर दिवस ना रात्र अश्या संध्याकाळी
घरात ना बाहेर अशा उंबरठ्यावर
धरती ना आकाश अश्या मांडीवर अधांतरी ठेवून
नर ना पशू असा नरसिंह
कोणत्याही शस्त्राविना आपल्या नखांनी
माझा हिरण्यकश्यपू करायचा!
म्हटलं सॉल्लिड विचार करायला हवा
नाही तर माझीच गेम होऊन जाईल
एखादी मर्सडीस.. नाही, बंगला, नको.. मग प्रायवेट जेट?
हट्, हे काय फडतूस मागायचं!
कॉलेजात होती ती .. ती? ती मागू का?
पण मग इथे आहे ही.. ही? हिचं काय करू?
अमाप संपत्ती मागू का?
पण मग आयुष्यच कमी असेल तर?
भरपूर आयुष्य मागू का?
पण मग भलते सलते रोग झाले तर?
ठणठणीत आरोग्य मागू का?
आणि मग माझ्याच जवळच्या लोकांची दुखणी-खुपणी, मृत्यू बघत जगत राहू?
समोरच्याच्या मनातले विचार ओळखायची कला?
बोलण्याचीच कटकट होते.. विचारही ऐकू येऊ लागले तर.. नकोच!
भविष्य पाहण्याची सिद्धी?
आणि अज्ञानातील सुख हिरावून घेऊ?
अदृश्य होण्याचा मंत्र?
जाऊ दे.. नसत्या भानगडीत सापडायचो!
मनाचं समाधान मागू का?
पण ते तर ठार वेड्या लोकांकडेही असू शकतं!
जितका जास्त विचार.. तितक्या शंका
देव घड्याळाकडे बघत म्हणाला वॉर्निंग बेल..
डोक्याची शाळा..
असंबद्ध विचार..
देव उभा.. ह्या पायावरचं वजन त्या पायावर करत..
शेवटी म्हणालो.. राहू दे देवा..
आहे तेच ठीक आहे
तो मंद हसला.. रामायण सिरियलमधल्या रामासारखा..
आणि गायब झाला!
मला देव पावला होता ..
माझ्या पुढ्यात उभा ठाकला होता
गालातल्या गालात हसत म्हणाला होता, मी तुला एक वर देतो
माग काय हवंय ते..
पण.. फक्त स्वतःकरता
मी नास्तिक.. मीच का?? आता नीट समजलंय ..



