जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं

निवडणुका जवळ आल्या की समाजातील धृवीकरण वाढू लागतं. इतकं की समाजातील निरनिराळे घटक महामानवांनाही आपसात वाटून घेतात. मग आपल्या महामानवाचं उदात्तीकरण आणि समोरच्या महामानवाचं चारित्र्यहनन ह्याकरता शब्दांचे खेळ सुरु होतात. ते इतक्या टोकाला जातात की काही दिवसांनी ते शब्द उच्चारणाऱ्यांचा त्यावर ठाम विश्वास बसतो आणि समाजातील हे विष वाढतच जातं .. 

हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भूत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

आई वडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

माझी ‘चागलं तेवढं घ्यावं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dkSkCB_p5Jg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 3, 2022

विद्ध

सीताहरणाकरता स्वतःला जबाबदार ठरवून पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या लक्ष्मणाने प्रभू श्रीरामांकडे दयेची याचना केली. सीतेच्या विरहामुळे व्याकूळ झालेल्या श्रीरामांना लक्ष्मणाची त्यांच्याप्रती समर्पण भावना पुन्हा एकदा जाणवली. मात्र त्याहीपुढे जाऊन त्या हळव्या क्षणी इतके दिवस स्वतःचं दुःख बाजूला सारून लक्ष्मणाने दाखवलेली निष्ठा त्यांना समजून आली ..

चंदनापरी शीतल मनही दग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

भार्येचा विरह आज सहन मला होईना
वनवासी निजदिनी तू तेच दुःख सोसले
आत्ममग्न विस्मरलो दुःख तुझे नाही ना
जाणवता व्यथा तुझी मन हे ओशाळले

ऐकुनी ते वचन मनी सुरु युद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

माझी ‘विद्ध’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/LduVdOTIlxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..

तुमच्याही बाबतीत असं होत असेल ना? म्हणजे बघा सकाळी गजर वाजतो. आपण म्हणतो थोडं आणखीन झोपतो आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा एकदम अर्धा तास उलटून गेलेला असतो. किंवा एखादा आवडलेला पदार्थ भूक नसतानाही आपण थोडा आणखीन खातो आणि मग पोट बिघडतं. हे ‘थोडं आणखीन’ त्या काडीचं नाव आहे ज्यामुळे म्हणीतल्या उंटाची शेवटी पाठ मोडून जाते ..

आल्याचा मंद सुगंध
सुंदर दिसत होता रंग
म्हटलं थोडं आणखीन दुध घालू या
... आणि चहा दुधाळ झाला ॥

मैत्रीचं नातं असं घट्ट
संकटातही उभा राहायचा दत्त
म्हटलं थोडा आणखीन वाद घालू या
... आणि मित्र रुसून गेला ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/b1XLQIPp1-M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..

देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल ..

देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥

गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा
अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा
भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 14, 2021

बेडकांची शाळा

आज चाचा नेहरूंचा वाढदिवस. छोट्या आणि पोक्तपणाचा आव आणणाऱ्या मोठ्यांच्या मनात दडलेल्या अश्या दोन्ही बच्चाकंपनींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या दिवसाकरता हे खास बालकाव्य. तुम्हीही ऐका आणि छोट्यांनाही ऐकवा ... 

बेडकांची शाळा
     तिथे कावळा आला काळा
म्हणतो शिकवीन तुम्हाला
     तो एकच माझा चाळा

बेडूक म्हणती वाहव्वा खास
     घे भूगोलाचा तू तास
कावळा म्हणाला चालेल
     शिकवू लागला इतिहास

गणिताची आली वेळ
     कावळ्याचे न्यारे खेळ
बेरिज वजाबाकीची
     तो करतो सारी भेळ

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LA3sNV73wMI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 14, 2021

प्रतिज्ञा

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे ...’ आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा असल्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून एकत्र येण्याचा संदेश ही प्रतिज्ञा देते. आज पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयाने ही प्रतिज्ञा पुन्हा एकदा करण्याची वेळ आली आहे. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर त्यामागील अर्थ समजून घेऊन ...

इतिहासाने घालून दिलेली पृथ्वीवरील वेस आहे
श्वासाइतकं सत्य आहे भारत माझा देश आहे ॥

लहानपणी आपण प्रत्येकाने ही प्रतिज्ञा म्हटली होती
आता मात्र शब्दांबरोबर त्यातील भावनाही नामशेष आहे ॥

माझे धर्म भाषा प्रांत त्याचे धर्म भाषा प्रांत
माझ्या देशातील बांधवांमध्येही आता सख्खे सावत्र अशी रेष आहे ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/VAVE5ntF3FM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 1, 2021

जेवण

गेल्या काही महिन्यांत मध्यमवर्गीय पुरुषांना घरातील स्त्रीचं महत्त्व काही प्रमाणात समजू लागलं आहे. अनेक पुरुष घरातील स्त्रीला चक्क घरकामात मदत करू लागले आहेत. त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेताना ते अजिबात दमत नाहीत. मात्र संसारात बुडून गेलेल्या ह्या स्त्रीच्या आयुष्यातील काही अगदी साध्या साध्या अपेक्षा समजून घेऊन पूर्ण करण्यात आपण पुरुष खरच यशस्वी झालो आहोत का?!

त्याच्या कमाईतच त्यांचं सुख होतं तिला सतत होती जाण
मग ती आपल्या दोन मुलांच्या विश्वातच झाली रममाण

त्याला मिळाला कुटुंबप्रमुख, अनभिषिक्त राजाचा मान
तिने स्वीकारलं कुटुंबातील तिचं दुय्यम स्थान

कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा म्हणून आपण राहावं
तिची एकच अपेक्षा होती, रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/YAvi8iAzEjM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 17, 2021

लाट

आपल्या मनात एक शांत डोह असतो. रोजच्या धावपळीत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. मात्र कधीतरी... एखाद्या कातर संध्याकाळी... जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो तेव्हा आपण त्या डोहाच्या किनाऱ्यावर जाऊन उभे राहतो. कसे कुणास ठाऊक अचानक त्या डोहात तरंग उठू लागतात. किनाऱ्यावर उभं असलेल्या आपल्यापर्यंत त्या लाटा पोहोचतात. आठवणींच्या लाटा! सुरुवातीला अगदी हळूवार... आणि मग...

शांत एका संध्याकाळी आठवणींची लाट उठली
आणि मनाच्या किनाऱ्यावर अलगद येऊन फुटली ||

वाऱ्याची एक झुळूक आली अंगावर आला काटा
डोळ्यांसमोर दिसू लागल्या मागे पडलेल्या वाटा ||

नक्की समजत नव्हतं पण वाटू लागलं उदास
जणू कसलीशी पूर्वसूचना मिळत होती मनास ||

बघता बघता काळे ढग मन भरून आलं दाट
मग आठवणींची धडकू लागली लाटेमागून लाट ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ekAFpxpSmHE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 30, 2021

रोप

कोरोनाच्या संकटामुळे सारं जग हवालदिल झालं आहे. ह्या संकटात काही जणांनी आपले प्रियजन गमावले आहेत. इतरांना आपल्यावर तर अशी वेळ येणार नाही ना अशी धास्ती वाटते आहे. आपण ह्या संकटाला फार लवकर शरण जात आहोत असं तर नाही ना? हे संकट नैसर्गिक आहे – बहुतेक. पण मग निसर्गाकडूनच आपल्याला काही शिकता येईल का? ह्या काव्यकथेतील स्वामींनी आपल्या शिष्याला दिलेली शिकवण, पाहा तुम्हालाही पटतेय का ते ...

एक दिशी तो शिष्य पाहतो आक्रीत काही घडले
शिष्याचे ते रोप त्या तिथे मोडून होते पडले ॥

आकांडतांडव करुनी शिष्य आश्रम घेई डोक्यावर
स्वामी मात्र टाळती काहीही बोलायाचे त्यावर ॥

गळली पाने रोपाची पण शिष्य करी दुर्लक्ष
स्वामी मात्र जल घालती त्याला रोज राहुनी दक्ष ॥

एक दिशी शिष्यास स्वामींनी रोपापाशी नेले
काडीवरती शुष्क एक ते पान दिसे इवलाले ॥ 

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/ZAgyTFrPPhY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 21, 2021

कवीराज

आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे. बरेचदा असं होतं की मित्र-मैत्रिणींचा एक छान समूह असतो. सगळं अगदी मजेत चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस त्या समूहावर संकटाचा डोंगर कोसळतो. त्या समूहातील एका व्यक्तीला कविता होते. म्हणजे अगदी एखाद्याला सर्दी होते किंवा कावीळ होते ना, तशी कविता होते. दुर्दैवाने त्या असाध्य रोगाच्या परिणामांची जराही कल्पना त्या रोगी व्यक्तीला नसते. भोगतात ते बिचारे त्या समूहातील इतर जण ...

कवीराज ते आले आले झाली पळापळ
आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥

काही लपले खुर्चीखाली टेबलखाली काही
बाथरूममध्ये गेला जो तो बाहेर आला नाही
कवीराज ते आले आले झाली पळापळ
खिडकीतूनच सूर मारती होते जे चपळ ॥

उरले होते त्यांना वाटे रडू या काढून गळे
तरीही कवीला पाहून हसती सारेच बळेबळे
कवीराज ते आले आले झाली पळापळ
केविलवाणे भाव जैसी शिक्षा आता अटळ ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Pp-ZLpZqC9k ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..

आज प्रेमाचा उत्सवदिन आहे. त्या दिवशी गाडी चालवताना पाहिलं समोरच्या वाहनाच्या मागे लिहिलं होतं, ‘भेटली होती, पण नशिबात नव्हती’. इतक्या मोजक्या शब्दांत त्या वाहनाच्या मालकाने आपल्या मनातला एक ठसठसता कोपरा उघड केला होता. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की अशा अडथळ्यांमुळे थांबलो तर जगणंच अशक्य होऊन जाईल. तुमच्या बाबतीत आले होते का कधी असे अडथळे?

विसरू कसा मी माझ्या ताब्यात रात्र नव्हती
ती भेटली परंतु नशिबात मात्र नव्हती ॥

खिडकीत त्या समोरील माझ्या मनीचे भाव
दावेल ऐसी खिडकी माझ्या घरात नव्हती ॥

उतरली आलिशान गाडीतूनी तिच्यावर
खर्चेन इतुकी रक्कम माझ्या खिशात नव्हती ॥

स्थळ पाहण्यास गेलो मैत्रीण पण मुलीची
गोडी तिच्यात होती ती त्या स्थळात नव्हती ॥

ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/sLZcV2uqwKQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 7, 2021

कूस

लहान असण्याचे दोन फायदे असतात. एक म्हणजे लहानपणी भावना व्यक्त करायला कोणतीही आडकाठी नसते – आनंद झाला हसा, दुःख झालं रडा. दुसरं म्हणजे दिवसाच्या शेवटी आपल्या साऱ्या भावना बाजूला ठेवून अगदी सुरक्षित वाटेल अशी त्यांची एक हक्काची जागा असते. आईची कूस! दुर्दैवाने मोठ्यांचं तसं नसतं  ..

गाडी थांबवून एके ठिकाणी मी खुणेनेच बोलावलं खाली करून काच
फुटपाथवर एक कुटुंब राहत होतं ज्यात मुलं होती पाच ॥

गाडीतून काढलेल्या पिशव्यांभोवती जमली ती मुलं आणि त्यांची माउली
पिशव्यांमध्ये स्वच्छ कपडे, काही खाण्याचे पदार्थ आणि होती ती एक बाहुली ॥

पिशव्या घेऊन पटापट ती मुलं झाली पसार
वेळच नाही मिळाला करायला तिच्या मनाचा विचार ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/Ofdfzk4rh7w ह्या ठिकाणी ऐकता येईल.