देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
नेते असे मातले त्यांची भरतच नाही झोळी
कार्यकर्त्यांच्या सरपणावर भाजतात आपली पोळी
त्याची दक्षिणाही म्हणतात ह्यांच्याच घशात जाई
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
भाऊ-दादा नावे गुंड कुणालाही धरतात
पोलीस असे साधे लोक त्यांनाही घाबरतात
त्याचीच बहीण न्यायदेवता तिला नाही घाई
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
गरिबांची होत नाहीत साधी साधी कार्य
प्रत्येक झारीत सरकारच्या बसले शुक्राचार्य
पगार मिळाला तरी कचेरीत जो तो पैसा खाई
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥
गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा
अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा
भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥