ऑक्टोबर 17, 2023

सहावं महाभूत

आज आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मुलन दिन आहे. आदिमानव स्वतःचं अन्न स्वतःच गोळा करून किंवा शिकार करून मिळवत असे. मग शेतीचा शोध लागला. आता शेतीकरता मेहनत घेतल्यावर जमिनीवर मालकी हक्क येणारच. आणि इथेच सगळी गोची झाली. पुढे ह्या मालकी हक्काच्या भानगडीतूनच सहाव्या महाभुताचा जन्म झाला..

जल अग्नी वात धरणी आकाश निळे छान
जीवसृष्टीकरता होतं प्रत्येकच वरदान
मदत करणं जीवनाला त्यांचं मुख्य कार्य
शिक्षा करत त्यांचा कोणी केला जर अपमान ॥


जीवसृष्टी प्रगत झाली आली मानवजात
जीवसृष्टीच्या कारभारालाच घातला त्यांनी हात
धोकादायक ठरू लागले इतर जीवांकरता
एक एक करत महाभुतांवर केली त्यांनी मात ॥
सप्टेंबर 15, 2023

डीपी

Whatsapp, Facebook वगैरे सामाजिक माध्यमांमुळे आपण सर्व एकमेकांच्या जवळ आलो आहोत हे वादातीत आहे. मात्र ह्या माध्यमांचा एक दोष म्हणजे त्यात जे काही दिसतं त्यामुळे आपण एका आभासी जगात राहायला लागलो आहोत. वास्तव अनेकदा धक्कादायक असतं ज्याकरता पण तयार नसतो..

पण दोन दिवसांनी कळतं.. सारं काही संपलं! खेळ खलास!!
खलास?! असा कसा खलास?
आता तर भेटला होता.. कधी बरं.. जाम आठवत नाही
खरंच.. गेल्या दोन वेळेला तो आलाच नव्हता
पण इतका आजारी होता?
व्हॉट्सॲप, फेसबुकच्या मुलामा दिलेल्या विश्वात त्याचं आजारपण आपल्याला ठाऊकच नसतं ॥
जुलै 22, 2023

मुहूर्त

शुभकार्याकरता पंचांग पाहून मुहूर्त शोधणं जमलं नाही तर निदान साडेतीन मुहूर्तांपैकी एखादा मुहूर्त साधणं ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. हल्लीच्या काळातही व्यायाम, ऑफिसमधून घरी लवकर येणं, जिभेवर ताबा ठेवणं ह्याकरता नवीन वर्षाच्या मुहूर्ताची वाट पाहणारे काही अपवादात्मक नाहीत. ह्या कवितेकरताही मी एका चांगल्या मुहूर्ताच्या शोधात होतो. पण मग म्हटलं ..

मुहूर्त शोधत असशील चांगलं करण्याकरता काही
तर आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥

ऑफिसमध्ये उशीर व्हायला कारण काही नसतं
पत्नी मुलांना घेऊन जरा फिरायला जा मस्त
कुटुंबीयांच्यासोबत एकदा काढण्या वेळ असाही
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
जून 5, 2023

तुळस

सर्वांना पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा! विकासकामांसाठी शहरात झाडं तोडली तर प्रायश्चित्त म्हणून शेकडो किलोमीटर दूरच्या जंगलात दुप्पट संख्येने वृक्षारोपण करायचं ही मखलाशी मानवच करू जाणे. पण शहरांची भरभराट करायची म्हटलं की निसर्गाचा ऱ्हास आलाच, नाही का?!

जंगल? ते काय असतं?
शेतं गेली... जंगल कुठलं राहायला!
मोठा रस्ता... वर्दळ
दुकानं...
एक गॅरेज.. एक खाटिक.. एक कबाडी.. एक सार्वजनिक शौचालय.. एका नेत्याचं ऑफिस..
रस्त्याच्या आश्रयाला एक कुटुंब.. अनेक कुटुबं.. आडोसे.. कच्च्या झोपड्या.. पक्क्या झोपड्या..
झोपड्याच झोपड्या!

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/l10HAP2v4g0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 26, 2023

मोकळा वेळ

उतारावरून वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे माणसं बेबंद आयुष्यं जगत होती. मध्येच महामारीचा धोंडा पडला आणि पाणी काही काळाकरता शांत झालं. काही काळाने विज्ञानाच्या मदतीने हा धोंडा दूर झाला आणि मोकळा वेळ म्हणजे काय हे भान आलेली माणसं पुन्हा एकदा बेभानपणे धावू लागली. हाती असलेला वेळ अमर्याद असल्याप्रमाणे ..

तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का?

अंहं … रात्री झोपण्यापूर्वी मोजून मापून फोन आणि टीवी बघायला मिळणारा नव्हे
शनिवार रविवारी घरच्या कामाकरता मिळणारा नव्हे
वर्षातून एकदा सुट्टी घेऊन
पहाटे पाच वाजता उठायला लावणाऱ्या कण्डक्टेड टूर्समध्ये मिळणारा … तोही नव्हे

मोकळा म्हणजे खरोखर मोकळा
लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा … तसा
शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत
वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा … तसा
कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा … तसा

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/x6GTEyX2AxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 13, 2023

प्राक्तन

प्राक्तन, नियती, नशीब, भाग्य, दैव, ललाटीचा लेख, विधिलिखित, भोग... भविष्यात काय वाढून ठेवलंय ह्याकरता आपण किती शब्दांचा वापर करतो. उद्याची तजवीज करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्या मनात असते आणि तसे आपण सरळ रेषेत वागत असतो. मात्र उद्या येणाऱ्या एखाद्या अनपेक्षित वळणाकरता आपल्याला कधीच तजवीज करता येत नाही.

गरुडराज नभी विहरत होते बोल मधुर ते पडले कानी
पोपट पृथ्वीवरती होता मधुर जयाची होती वाणी
गुणी अशा पोपटास भेटून गरुडराजही झाले अंकित
गरुड शुकाची मैत्री पाहून तिन्ही लोक ते होती अचंबित
काहीच नव्हते समान तरीही एकमेकांस स्वभाव गमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥

माझी ‘प्राक्तन’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/okTJP32oNBo ह्या ठिकाणी ऐकता येईल.

मनोगत


सन २०११ सालच्या जानेवारी महिन्यात माझं नवनिर्मिती.इन हे संकेतस्थळ सुरु झालं. ह्या संकेतस्थळाच्या नावामागील कार्यकारण पुढे सविस्तर लिहिलं आहे. मात्र मी जे काही लिहितो ते तुम्हा वाचकांपर्यंत तुमच्या सोयीनुसार पोहोचावं हादेखील ह्या संकेतस्थळामागील एक हेतू होता आणि अजूनही आहे. गेल्या सात वर्षांच्या साहित्य प्रवासात एक व्यक्ती म्हणून मी जसा घडत गेलो त्यानुसार संकेतस्थळातही सुधारणा करण्याची आवश्यकता भासू लागली. सन २०१८च्या जानेवारी महिन्यात हे नवीन रूपातील तेच संकेतस्थळ तुमच्यापुढे सादर करत आहे. ते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.