मे 15, 2020

जन्मठेप

आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनाच्या शुभेच्छा! कुटुंब ह्या संस्थेला ह्या टाळेबंदीच्या काळात एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे. इतका की अनेकांना (विशेषतः पुरुषांना) त्याचा कंटाळा येऊ लागला आहे. ‘कोई लौटा दे मेरे बीते हुवे दिन’ असं म्हणत संध्याकाळी खिडकीतून बाहेर बघत बसणारे पुरुष आता अनेक घरांत (घरांच्या खिडक्यांत) दिसून येत आहेत...

व्हरांड्यात उभा होतो न्याहाळत रात्रीचा देखावा तो रम्य
मनात उठलं होतं आठवणींचं काहूर अदम्य ॥

ढगांच्या मागून डोकावण्याचा चंद्राला लागला होता जणू छंद
शरीराला सुखावत होता शीतल वारा झुळझुळता मंद ॥

माझ्या शेजारी उभी राहून तीही डोळ्यांनीच पीत होती पौर्णिमेची ती रात
कसला विचार करतोयस एवढा मला म्हणाली घेऊन हातात माझा हात ॥

म्हटलं आठवतंय असाच उगवला होता त्याही दिवशी पौर्णिमेचा चांद
आणि भावना झाल्या होत्या अनावर भेदून मनाचे बांध ॥
मे 1, 2020

पाचावर धारण

बाळ श्रीकृष्णाचा उच्छाद कमी करण्याकरता यशोदा त्याला दगडी उखळीला बांधून ठेवत असे. सरकारने कोविड विषाणूमुळे टाळेबंदी जाहीर केली आणि प्रत्येक पालकाला आपल्या घरात ह्या उखळीची निकड भासू लागली. ह्या बाटलीतल्या राक्षसांचं काय करायचं असा यक्षप्रश्न घरोघरी पडला. मात्र घरोघरी ह्या प्रश्नांचं उत्तरही लवकरच मिळालं...

कोविड विषाणूशी लढायला सरकारने लॉकडाऊनची वेसण कसली
     आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥

शाळा, खेळ, सिनेमे, हॉटेलं बाहेरचं काहीच नाही हे जेव्हा कळलं
     तेव्हा आ वासून पालकांच्या तोंडाकडे बघू लागली ही त्यांचीच पिल्लं
रोज ह्यांची करमणूक कशी करायची बुद्धीचा लागू लागला कस
     प्रत्येक घरात कोंडले होते हे छोटे छोटे बाटलीतले राक्षस
त्यांच्याशी केलेली वाटाघाटींची बोलणी पार फसली
     आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥

कुणी महत्त्वाच्या कागदांची विमानं तर कुणी कपांचा केला चेंडू
     कुठे कुठे लक्ष पुरवायचं पालकांचा शिणू लागला मेंदू
त्याने मला मारलं, ती मला बोचकारते सुरु झाल्या आरोळ्या
     क्वालिटी फॅमिली टाईमचं श्रीखंड गायब, राहिल्या नुसत्याच चारोळ्या
कॅलेंडरची पानं तारखा सरकवायचं सोडून जणू रुसली
     आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/r1xJ7p22ZkE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 7, 2020

एकांतवास

आज जागतिक आरोग्य संस्थेचा (WHO) स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. भौतिक उन्नतीमागे भ्रमिष्टाप्रमाणे धावताना आपलं मानसिक आरोग्य हरवून बसलेल्या लोकांना कोरोना विषाणूच्या रुपात जणू आपल्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची एक शेवटची संधी मिळाली आहे – गर्दीतील एकांतवास संपवण्याची ...

नोकरी करायला लागलो तेव्हा डोक्यावर प्रगतीचं भूत होतं स्वार
     दिवस नाही रात्र नाही कष्ट केले अपार
सगळे उपाय वापरले साम दाम दंड भेद
     थांबलो नाही कोणाकरता नाही केला कधी खेद
चढलो वर इतरांच्या खांद्यांवर डोक्यांवर देत पाय
     पदोन्नतीच्या शक्यतेला होऊ दिला नाही अपाय
दमछाक झाली पण थांबलो नाही गाठलं पार शिखर
     बाकी सारे राहिले होते मागे दूरवर
पण ओसरल्यावर विजयाचा उन्माद वाटू लागलं उदास
     उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥
मार्च 8, 2020

स्त्री

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हा दिवस गेली एकशे दहा वर्षं साजरा केला जात आहे. एकशे दहा वर्षांत बरंच काही बदललं आहे... पण आपल्या पुरुषप्रधान संकृतीत – मुख्यतः समाजाच्या मानसिकतेत - आणखीन बरंच काही बदलण्याची गरज आहे. पुढल्या एकशे दहा वर्षांत तरी ते बदलेल का?! 

आदिमानव गुहेत होते केला होता जाळ
‘ती’ आणि 'तो' आणि सोबत होतं छोटं त्यांचं बाळ
गुहेबाहेर गुरगुर ऐकून दोघं झाले सावध
दबा धरूनिया बसलं होतं तेथे एक श्वापद

बघती दोघे एकमेकांस मनातूनी घाबरले
अपत्य बघता भीती गिळूनी सज्ज तरी ते झाले
उचलून घेई ती बाळाला कवटाळे उराशी
उचलून पलिता आगीचा तो झेपावे दाराशी

नव्हता तोही वरचढ आणि नव्हती तीही अबला
प्राक्तनामध्ये लिहिला होता प्रसंग त्यांच्या सगळा
त्याच दिवशी पण ठरून गेली सामाजिक वहिवाट
तो चालवितो बाह्यप्रपंच ती घराच्या आत

ममतेपायी सहन करत ती राहीली मानहानी
स्त्रीजन्माची सुरूच आहे अजून करूण कहाणी ॥
फेब्रुवारी 14, 2020

प्रेमाचा पाढा

आज प्रेमाचा उत्सव! प्रेमात पडलं की जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच दिसू लागतं. लहानपणी शिक्षकांच्या, घरच्यांच्या धाकाने पाठ केल्यावर जसे सतत पाढेच डोक्यात फिरायला लागायचे, तसंच कोणाच्याही धाकाशिवाय हा प्रेमाचा पाढा अखंड डोक्यात घर करून बसतो ...

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥

एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥

पाच देव पूजतोय भेट व्हावी म्हणून पाहा
कॉलेजमध्ये वाट पाहातो तुझी तास सहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
झालंय काय काळजीत पडले माझे पिता माता ॥

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥
डिसेंबर 12, 2019

सल

सामाजिक माध्यमांनी (social media) लोकसंवादात क्रांती घडवून आणली आणि कधी नव्हे ते राजकारणाने मध्यमवर्गीयांच्या घरात प्रवेश केला. ह्या गोष्टीचा फायदा जरी झाला असला तरी मनामनांतील तेढ वाढवण्याकरता त्याचा वापर ज्याप्रकारे होत आहे त्याचा सल आता मनाला बोचू लागला आहे ...

अचानक पांगलेले सारे मित्र ह्या सोशल मिडियावर लागले भेटू
वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारा तो होता जणू एक सेतू ॥

सोशल मिडियावरील लिखाणामुळे समजू लागली त्यांची हालहवाल
आणि इथेच पहिल्यांदा चुकचुकली मनात शंकेची एक पाल ॥

कुणी धर्माबद्दल कुणी जातीबद्दल कुणी भाषेबद्दल होतं बोलत
आमच्या शाळेत आम्हाला हे कुणीच कधीच नव्हतं शिकवत ॥

असे कसे झाले होते ह्यांचे विचार एवढे कोते
वयाने वाढलेले माझे काही मित्र विचारांनी मात्र झाले होते छोटे ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QNgYIUgYAjw ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 14, 2019

शिल्पकार

आज राष्ट्रीय बालकदिन आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक गुणवत्ता दिन म्हणून पाळला जातो. पाठांतरावर जोर देणाऱ्या आपल्या शिक्षणपद्धतीत बालकांची गुणवत्ता ही केवळ मिळालेल्या मार्कांनी मोजली जाते. मात्र गुणवत्तेची व्याख्या फार वेगळी आहे. ती जितकी व्यापक आहे तितकीच वैयक्तिकही आहे. पाहा पटतंय का...

वाटसरू मग हसून विचारी शब्दी त्याच्या खोच
     इतक्या उंचावरची कोणा दिसेल कैसी चोच
मेहनत सारी तुझ्या अंगीची वाया बघ जाणार
     काम थांबवून त्यास न्याहाळे तेव्हा शिल्पकार ॥

कुणास दिसली कुणास नाही मजला त्याचे काय
     मला मात्र ती दिसे वाकडी ह्याला काय उपाय
निष्ठा माझी फक्त कलेशी तोच एक आधार
     इतुके बोलून पुन्हा कामास लागे शिल्पकार ॥
सप्टेंबर 28, 2019

हा नाही अहंकार

आज शहीद भगत सिंग जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम. साँडर्स हत्या प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु होता. दोन दिवसांनी काय निकाल लागणार आहे हे सांगण्याकरता कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती. बाबा रणधीर सिंगांनी त्यांना ईश्वराला शरण जाण्याचा सल्ला दिला. भगत सिंगांचा नकार बाबांना दर्पोक्तीपूर्ण वाटला. भगत सिंगांच्या मनात विचारमंथन सुरु झालं ज्यातून जन्माला आला एक निबंध ‘मी नास्तिक का आहे’. त्या गद्यरुपी कवितेचा काव्यरूपी संक्षेप करण्याचा हा नम्र प्रयत्न...

नास्तिक माझे बोल ऐकुनी बाबा मजला वदले
देवाच्या चरणी अर्पण कर दिन शेवटचे उरले
अहंकार हा तुझ्या मनीचा आड येई भक्तीच्या
तेच खरे पुण्यात्मे ज्यांनी त्या शक्तीला स्मरले

प्रामाणिक माझी नास्तिकता ठाम मनात विचार
	हा नाही अहंकार ॥

पतितांचा उद्धार जपावी मानवतेची नाती
प्रयत्न करणे केवळ असते तुमच्या आमच्या हाती
यशही मिळेल तुम्हां मिळाली जर नशिबाची साथ
देव कशाला हवा मारण्या अपयश त्याच्या माथी

जबाबदारी झटकून टाकी हा कैसा आजार
	हा नाही अहंकार ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/jhvmLiuBCi0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 5, 2019

समज

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! हल्लीच्या आण्विक कुटुंबसंस्थेत मुलं मनाने हळवी होत चालली आहेत. काही मुलं इतरांपेक्षा निराळी असतात. त्यांना सर्वसामान्य परिमाणं लावणं चुकीचं ठरू शकतं. अशा मुलांची मानसिक जडणघडण समजून घेऊन त्यांच्याशी संवेदनशीलने वागणं हे आजच्या पालकांप्रमाणेच शिक्षकांकरताही आव्हान ठरत आहे...

अक्षरे थोडी ऐसी / अक्षरे थोडी तैसी
कथतील भाव कैसी / नाही मला समजले ॥

एक आणि एक दोन / त्रिकोण पंचकोन
हे सर्व ठरवी कोण / नाही मला समजले ॥

चित्रांमध्येच हसतो / स्वप्नांमध्येच वसतो
अभ्यास काय असतो / नाही मला समजले ॥

शाळेत आणि घरचे / मज ताडती कधीचे
हसणे कसे चुकीचे / नाही मला समजले ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ipST9UKV9Ro ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 13, 2019

दान

आज राष्ट्रीय इंद्रिय-दान दिवस आहे. आपल्यातील प्रत्येकाचं स्वतःवर प्रेम असतं. पण स्वतः म्हणजे नक्की कोण? थोडं समजण्याचं वय झालं की आपल्याला सांगितलं जातं आरशासमोर उभं राहिलं की समोर जे दिसतं तो किंवा ती तू स्वतः आहेस. मग मी म्हणजे माझं शरीर ह्या विचाराची घट्ट वीण आपल्या मनात बसते. स्वतःवर प्रेम करण्याला काही सीमा नाहीत. आपलं प्रेम इतक्या थराला जातं की माझं स्वतःचं अस्तित्व नष्ट झालं तरी माझं शरीर कोणाला द्यावं हा विचार मनाला पटत नाही. खरं आहे ना?!

स्टेशनवर बसलो होतो, बराच वेळ होता अजून गाडी यायला
     शांतपणे बॅगेतून माझं पुस्तक काढून लागलो मी वाचायला ॥

पुस्तकातील विनोद वाचून माझ्या नकळत मला हसू एकदम आलं
     माझ्या शेजारी बसलेला एक लहान मुलगा मला म्हणाला, काका काय झालं? ॥

तोपर्यंत माझ्या शेजारी कुणी बसलंय ह्याचा मला जराही नव्हता गंध
     नीट पाहिलं तेव्हा कळलं, तो लहानगा होता दोन्ही डोळ्यांनी अंध ॥
जुलै 1, 2019

गुर

सर्व डॉक्टर आणि त्यांच्या पेशंटांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा! बदलत्या जीवनशैलीबरोबर जीवनातील डॉक्टरांचं महत्त्व वाढत चाललं आहे. रक्तदाब, कर्करोग, मानसिक तणाव अशा आदिमानवांना ठाऊकही नसलेल्या रोगांनी आपण ग्रासत चाललो आहोत. माणूस बनून जगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला त्रास कमी होऊ शकेल पण आपल्यातील ‘गुरा’ला माणूस माणसाळवू शकेल का?

एक होतं शहर तिथे डॉक्टर एक होता
     पेशंट आला तिथे शोधत शोधत त्याचा पत्ता
म्हणतो फार लांबून आलो इलाज माझा करा
     मागाल तेवढे पैसे देतो काढून तुम्हा आत्ता

डॉक्टर म्हणतो समोर आहे डॉक्टर तो माणसांचा
     भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥

ऐकून तरी घ्या डॉक्टर माझी तुम्ही कथा
     आपसुक कळून चुकेल तुम्हा काय माझी व्यथा
उठतो जणु मधमाशी मी जातो कामावरती
     लोकलमध्ये शिरतो जसा मेंढ्यांचा तो जथा

सांगू नकोस मजला तुझा प्रपंच पण दिवसांचा
     भल्या माणसा मी तर आहे डॉक्टर बघ गुरांचा ॥
मे 21, 2019

… गोष्टी काही काही

आज जागतिक सांस्कृतिक विविधता दिन आहे. सांस्कृतिक विविधता जशी भौगोलिक अंतराप्रमाणे वाढत जाते तशीच पिढ्यांमधील अंतरामुळेही वाढत जाते. एकाच समाजातील दोन पिढ्यांचा सांस्कृतिक बाज निराळा असू शकतो. तंत्रज्ञानामुळे भौगोलिक अंतरं कमी होत असताना निरनिराळ्या समाजांतील सांस्कृतिक विविधतेतही अनेक समान दुवे सापडत आहेत. त्याचप्रमाणे दोन पिढ्यांतील अंतर मिटवण्याकरताही अनेक समान दुवे सापडतील. कारण, जग कितीही बदललं तरी बदलत नाहीत... गोष्टी काही काही...

जगामध्ये सतत दिसते नव्याची नवलाई
     पण बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ धृ ॥

पूर्वी मुलांनी शिक्षणात चमकावं म्हणून अभ्यासाचा धोशा लागायचा रोज
हल्ली पालक म्हणतात मुलांनी जिंकावेत रियालिटी शोज
मात्र अपत्याचं यश पाहून अजूनही देवापुढे साखर ठेवते त्याची आई
     बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥