कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

फेब्रुवारी 21, 2014

प्रेमाचा धंदा

कोणत्याही धंद्यात यशस्वी होण्यापूर्वी नुकसान सहन करण्याची तयारी आणि ताकद ठेवावी लागते. अगदी प्रेमाचा धंदाही ह्याकरता अपवाद नाही . . .

इतकं प्रेम तयार केलं मोठा झाला साठा
     विकण्यासाठी मोकळ्या होत्या मला चारी वाटा
ग्राहक कुठून येईल ह्याचा नव्हता काही नेम
     किंमत माझ्या प्रेमाचीही होती फक्त प्रेम
जिथे तिथे ग्राहक होते एक नाही सतरा
     वस्तू विकण्यासाठी सुरु झाल्या माझ्या चकरा
महिना नाही पाहिला नाही तारीख नाही वार
     प्रेमाच्या ह्या धंद्यामध्ये नुकसानच फार
फेब्रुवारी 7, 2014

जीवाचं मोल

'गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला' किंवा 'सरळ फासावर चढवा' असे शब्द आपल्या तोंडून किती सहजपणे निघून जातात. जगाच्या अति लोकसंख्येमुळे मृत्यूबद्दल आपल्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत का?

चर्चा करू या असं म्हणून आपला देश शत्रूपुढे वाकतो
धडधड बॉम्ब टाकून शत्रूचा देश करा बेचिराख तो
किती सहज निघतात आपल्या तोंडून असे विखारी बोल
विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल
जानेवारी 17, 2014

प्रमोशन

जानेवारी महिना आला की बहुतेक सर्व संस्थांमध्ये appraisalचे वारे वाहू लागतात. ह्या वेळी प्रमोशनच्या यादीत माझं नाव असेल का? हा प्रश्न सर्व नोकरपेशांना छळू लागतो. जितकी वरची जागा तितकी प्रमोशनची शक्यता कमी. मग वर्षभर केलेल्या अट्टाहासाचा आढावा घेतला जातो . . .
 
गाणं होतं डोंगराला आग लागली पळा रे पळा
     तयार होतो कापायला एकमेकांचा केसाने गळा

सभोवती उभे राहून बायको मुलं टाळ्या पिटत होती
     दमून थांबलो तर त्यांचं काय होईल ह्याची काळजी होती मोठी

गाणं बंद झाल्यावर बेभानपणे घातला एकच धुमाकूळ
     मला खुर्ची मिळाली आहे हे समजेपर्यंत बसली होती आजूबाजूची धूळ
नोव्हेंबर 1, 2013

परतफेड

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये छेड काढण्याचा मक्ता पुरुषांनी घेतला आहे. मात्र हे असं कुठपर्यंत चालणार? दिवसेदिवस सबल होणाऱ्या महिलांना पूर्वापार चालत आलेल्या ह्या फाजीलपणाची परतफेड करावीशी वाटत नाही का?

एकटा घरी जात असावा तो पावसाळी रात्री
त्याच्याकडे नाही पण माझ्याकडे असावी छत्री
चिंब त्याची काया धुंद माझ्या गात्री
     असं मुलींना कधीच वाटत नाही का?

खुरट्या दाढीने भरलेले त्याचे गाल
मस्त मर्दानी त्याची रुबाबदार चाल
काय साला मस्त आहे माल
     असं मुलींना कधीच वाटत नाही का?
ऑक्टोबर 4, 2013

मॉर्निंग वॉक

सकाळचा फेरफटका, अर्थात morning walk ही आरोग्याकरता अत्यंत चांगली गोष्ट आहे . . . आणि 'आरोग्याकरता अत्यंत चांगल्या' अशा इतर गोष्टींप्रमाणेच बोलायला सोपी पण करायला कठीण गोष्ट आहे. आपल्यातील किती जणांनी किती वेळा morning walkचा 'दृढ संकल्प' केला असेल ह्याचा हिशेब ठेवायला संगणकाची गरज लागेल . . . 

सगळे म्हणती दाखवून बोट
तुझं सुटलं आहे पोट
त्यांच्या बोलण्यात नाही खोट

चालीन चांगला मी भरभर
     उद्या उठणार मी लवकर
सप्टेंबर 20, 2013

उपरा

लोकशाही म्हणजे बहुमताचा मान . . . पण मग बहुमताने अराजक माजलं तर त्याचाही मान ठेवायचा का? माझ्या सभोवती बहुतांश लोक जर मग्रुरी, लबाडी, अस्वच्छता, असहिष्णुता, भ्रष्टाचार ह्या गोष्टींचा पुरस्कार करत असतील तर मीसुद्धा त्यांच्यासारखं बनावं का? आणि नाही बनलो तर मी ह्या देशात राहायला नालायक ठरतो का?

रस्त्यांमध्ये मांडव
     दिवसरात्रीचे तांडव
रांगा लावून दर्शन घेती पंचक्रोशीतील बांधव

माझा सोडून प्रत्येकाचा चेहरा आहे हसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा