कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

नोव्हेंबर 2, 2012

बाथरूममधला मी

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्वतःकरता एकांताचा क्षण मिळणं दुर्लभ झालं आहे. आपण दिवसभर सतत कोणत्या ना कोणत्या व्यक्तीबरोबर 'वागत' असतो. समोरच्या व्यक्तीनुसार आपले मुखवटे बदलत असतो. म्हणूनच आपण खरे कसे आहोत हे समजून घ्यायचं असेल तर एका जागेला पर्याय नाही ... बाथरूम!

लिफ्टमध्ये जेव्हा शिरते शेजारीण ती छान
     पोट आत छाती बाहेर माझा सुपरमॅन
घरी दरी एरवी असतो चेहरा गोरामोरा
     पण लिफ्टमन अन् चौकीदारासमोर मोठा तोरा
गाडी अशी चालवतो की मर्कट मद्य प्याला
     एसीमध्ये बसून शिव्या देतो ज्याला त्याला
रूपं माझी असंख्य ती दाखवी समाजाला मी
     बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/a7-x3p8r2Os ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 5, 2012

इन द लाँग रन…

लहान सहान गोष्टींवरून तक्रारी, थोड्या मनाविरुद्ध बोललं गेलेल्या शब्दांवरून भांडणं, एवढ्याशा कारणावरून रुसवे फुगवे... हे सारं करताना आपण जणू अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्याप्रमाणे वागतो. आणि रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या क्षणांमधील आनंद हरपताना एक त्रिकालाबाधित सत्य विसरतो की 'इन द लाँग रन...'

त्याच्या पापाचा घडा आधी भरला पाहिजे
मी जिंकलो नाही तरी चालेल पण तो हरला पाहिजे
हेवे दावे द्वेष मत्सर ह्यांनी जीवन भरलंय
वैर नंगा नाच करतंय प्रेम मात्र हरलंय

आयुष्यात सारं जिंकाल...
     मरणाला जिंकाल काय
अरे सोड...
     इन द लाँग रन एवरिवन इज गोइंग टू डाय!
सप्टेंबर 21, 2012

बातम्या

काल सकाळी नेहमीच्या सवयीने मी वर्तमानपत्र वाचायला घेतलं. बराच वेळ वाचल्यानंतर कधीतरी माझ्या लक्षात आलं की ते तीन दिवसांपूर्वीचं वर्तमानपत्र होतं. आपल्यापैकी कित्येकांना वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस सुरु झाला आहे असं वाटत नाही पण मला आता संशय येऊ लागला आहे की आपण तारीख बदलून रोज एकच वर्तमानपत्र तर वाचत नाही ना! वानगीदाखल ह्या 'बातम्या' वाचा...

वादावादी अहा / खाल्ल्या खाणी दहा
नैतिकतेचे वक्ते / सारे पक्ष पाहा

पाहा काय तो खेळ / खेळाडूंची भेळ
रोजच्या रोज पाहायला / असतो कोणा वेळ

वेळ काय हो आली / मुलगी मुलीस म्हणाली
तुझ्याच नावाचे मी / कुंकू लावीन भाळी
जुलै 20, 2012

निवडक दृष्टी

मी आणि माझा एक भारतभेटीस आलेला परदेशस्थित मित्र गप्पा मारत उभे होतो. काही वेळाने त्याचा अस्वस्थपणा माझ्या लक्षात आला. आमच्या शेजारीच एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा आशाळभूतपणे भिक मागत उभा होता. खरं तर तो आम्हा दोघांपासून सारख्याच अंतरावर उभा होता पण मला तो दिसलाच नव्हता. म्हणजे दिसला होता ... पण त्याचं असणं मला जाणवलंच नव्हतं. भारतातील आणि विशेषतः मुंबईसारख्या महानगरातील इतरही मध्यमवर्गीय नागरिकांना माझ्यासारखीच निवडक दृष्टीची दैवी देणगी प्राप्त झाली आहे का?

हॉटेलाची सारखी वारी
     कपडेलत्तेसुद्धा माझे भारी
समोरचा जर्जर भिकारी
     मला कधीच दिसला नाही

निवडक आहे माझी दृष्टी
     दिसतात फक्त छान गोष्टी
दृष्टीआडची कुरूप ती सृष्टी
     मला कधीच दिसली नाही
नोव्हेंबर 4, 2011

तारीख

११.११.११ ही तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशा काही सुरस आणि चमत्कारिक बातम्या ऐकायला मिळत आहेत. जन्माची संभाव्य तारीख अगोदरची असेल तर जोडपी डॉक्टरांना प्रसूती पुढे ढकलण्याचे उपाय विचारात आहेत. नंतरची असेल तर त्या दिवशी सिझेरिअन करायला सांगत आहेत. समारंभांच्या कार्यालयांचे त्या दिवसाचे दर दुप्पट तिप्पट झाले आहेत. आपल्या आयुष्यात तारखेचं महत्व खरच किती आहे नाही!

पटवून देण्या खरच तुमचा जन्म आहे झाला
जन्माच्या त्या दाखल्यावरती आधी तारीख घाला
वाढदिवसाची तारीख घालते आनंदाशी सांगड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड
जुलै 16, 2011

षंढ

"तुमच्या घरी सगळे सुखरूप आहेत ना? ... बरं झालं ... आम्हीही सगळे घरीच आहोत." झालं ... आपण मोकळे ... टीवीवर दाखवली जाणारी रक्तरंजित दृश्य पाहायला ... हतबल, मुर्दाड, ‘षंढ’!

आतंकाचा वणवा करतो स्फोटामागून स्फोट
किती उमलत्या आयुष्यांना पाजी विषाचे घोट
शरीरांचे विच्छिन्न भाग ते पाहून मनात रडसी
हात बांधून घेसी आणिक शिवून टाकसी ओठ

करतील कुणीतरी काहीतरी अन देश राहील अखंड
स्वतःचीच फसगत करीशी तू असा कसा रे षंढ