कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

मे 6, 2011

आळस

१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो ... म्हणजेच काम करणाऱ्यांचा दिवस. त्यामुळे ह्या दिवशी माझ्यासारख्या आळशी माणसांना कुठे लपावं ते समजत नाही. माझे कामसूपणाबद्दलचे काही 'प्रांजळ' विचार 'आळस' ह्या कवितेद्वारे मांडत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते पटतील ह्यात मला शंका नाही. १ मे बद्दल लिहिलेली कविता इतक्या उशिरा का? कारण अर्थातच ... 'आळस'!

पुसती मला ते कामापासून
     दूर का तू पळशी
जग सारं काम करतं
     असा कसा तू आळशी

माझं म्हणणं काम मला जर
     समोर दिसलंच नाही
तर त्याच्यापासून दूर पळायचा
     प्रश्नच येत नाही

कामं करण्यासाठी लागते लोकांची का चुरस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस
एप्रिल 1, 2011

वर्ष २०००

भारताने क्रिकेट विश्वचषकात थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे आज १९८३च्या विश्वचषकाची आठवण येणं साहजिक आहे. त्या ऐतिहासिक गोष्टीला आता तब्बल २८ वर्ष होऊन गेली आहेत. मनात सहज एक विचार आला, काय करत होतो आपण २८ वर्षांपूर्वी? त्या विचारांनीच रूप घेतलं ह्या 'वर्ष २०००' कवितेचं. पाहा पटतेय का.

दोन हजार साली आपण गाठली असेल तिशी
गालांवरती दाढी असेल ओठांवरती मिशी
अभ्यास नाही शाळा नाही आभाळ सारं खुलं
पण लग्न झालं असेल आपलं आणि असतील मुलं
नुसत्या कल्पनांनीसुद्धा लाजून जायचो पार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार
फेब्रुवारी 12, 2011

क्रिकेट आणि युद्ध

क्रिकेटला जर धर्म मानला तर विश्वचषक स्पर्धेला कुंभमेळा किंवा हजची यात्रा म्हणायला हरकत नसावी. विशेषतः मराठी मनाला तर क्रिकेट म्हणजे अगदी कबड्डी किंवा खोखोइतका जवळचा खेळ. क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटबद्दलचे माझे विचार कवितेच्या रूपाने मांडायचा प्रयत्न करत आहे.

लारा, वॉर्न, मुरली पाहून चढतो आम्हा चेव
हिरो आमच्याकरता धोनी, सुनील, कपिल देव
क्रिकेटच्या प्रेमाला आमच्या नसते कुठली हद्द
क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन असतो देव

असा विचार करणाऱ्यांच्यात असतात आबालवृद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध
फेब्रुवारी 4, 2011

दोन बाजू

घोळक्यामध्ये चर्चा करताना आपण अगदी तावातावाने एखादी बाजू मांडत असतो. अमका गाढव आहे, तमका किती हुशार आहे, हे करणंच बरोबर आहे, तो असा वागूच कसा शकतो, वगैरे. आपली मतं बिनधास्तपणे मांडताना आपल्याला त्या विषयाची संपूर्ण माहिती आहे का हे तपासायची आपल्याला गरज वाटत नाही. आपण सोयीस्करपणे विसरतो की प्रत्येक गोष्टीला आपल्याला न समजलेली दुसरी बाजूही असू शकते ...

हा शेवटचा बाॅम्बस्फोट
     नागरिक आशावादी
तुमच्याच डब्यात बसला असेल
     पुढचा दहशतवादी

पन्नाास मेले, साठ मेले
     पडत नाही फरक
तुमच्या देशात धुमाकूळ घालतो
     आमचा क्रांतिकारक

दोन देशांच्या सीमेवर नो मॅन झोन असतात
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बाजू दोन असतात