कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

सप्टेंबर 6, 2013

मिच्छामी दुक्कडम

माझे काही जैन मित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांना भेटून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणतात. ह्याचा अर्थ गेल्या वर्षभरात माझ्या हातून घडलेल्या प्रमादांमुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजपासून आपल्या नात्यामध्ये फक्त सौहार्दाच्या आठवणी असू द्यात. पद्धत आवडली आणि म्हणून माझ्या सर्व आप्त-मित्र-सहकाऱ्यांना गणेश चतुर्थीचा योग साधून म्हणतो …

आयुष्यात मिळाले मजला मित्र जीवाभावाचे
     संगतीमध्ये ज्यांच्या विरले क्लेशही तणावाचे
चुकून कधी जर झाली असली त्यांच्या मना जखम
     मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम

क्षमा करावी सर्व चुकांची विसरुनिया अहम्
     मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uH_R9uY_rEU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 2, 2013

जबाबदारी

स्वातंत्र्यदिन साजरा करणं हा आता केवळ एक उपचार राहिला आहे. सिग्नलला गाडी थांबवून झेंडा विकत घेणं म्हणजे स्वातंत्र्यदिन . . . महत्प्रयासाने मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवण्याकरता आपली काही जबाबदारी आहे हेच आपण विसरत चाललो आहोत.

मंदिराच्या रांगेमध्ये मित्र उभे होते चार
गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या विषय होता भ्रष्टाचार
पुजाऱ्याला पाहून एक हळूच म्हणाला दुसऱ्याला
पैसे देऊन आधी दर्शन मिळेल का ते जरा विचार

लाच देणारे घेणारे दोघे असतात तितकेच ठग
नियम असतात सर्वांकरता त्याचं पालन करून बघ

काम करायला घे आधी तू विचार करत बस मग
देशाची ह्या जबाबदारी थोडी तरी घेऊन बघ
जुलै 19, 2013

टोणगा

'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ही म्हण कुणीतरी खास मध्यमवर्गीयांकरता लिहून ठेवलेली असावी. आपण मनाशी काही ठरवून मनोरथांचे इमले बांधावेत आणि व्हावं काहीतरी भलतंच ह्या गोष्टीची प्रयत्न करूनही सवय होत नाही. असेच काही टोणगे ...

रोज पहायची मला
     बसस्टॉपवर ती बाला
आज विचारू उद्या
     म्हणता उशीर झाला

मला मामा म्हणणारा तिला पोरगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला

विचार करता समजून आला जो दगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला
एप्रिल 5, 2013

मन

एक वेळ धूर मुठीत धरून ठेवणं जमेल, पाणी झारा वापरून भरणं जमेल, वाळू ओंजळीतून नेणं जमेल ... पण मन ताब्यात कसं ठेवावं? काही जण मनन चिंतन करतात, काही जण साधू-बाबांचा आसरा घेतात. कुणी योग तर कुणी व्यायाम करतात. तुम्हा कोणाला जमलंय का ह्या मनाला वेसण घालणं?

दिवसभर असा
     सोडला नाही वसा
संध्याकाळ झाली
     खाल्लाच सामोसा

डॉक्टर सांगतात मला
     कमी करा वजन
यत्न केले पण
     ताब्यात नाही मन
फेब्रुवारी 15, 2013

परकी मावशी

दर वर्षी येणारा फेब्रुवारी २१ हा दिवस राष्ट्रकुल संघाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे. हा दिवस जरी पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील (सध्याच्या बांग्लादेशातील) बंगाली भाषिकांच्या लढ्याशी संबंधित असला तरी भारतासारख्या देशात जिथे इंग्रजी नावाच्या परक्या मावशीने आपल्या मराठी मातेची गळचेपी चालवली आहे, तिथे विशेष महत्वाचा आहे. आपल्या घरात ठाण मांडून बसलेल्या ह्या परक्या मावशीला मारलेली ही एक कोपरखळी ...

माध्यम घेतलं इंग्रजी तर कच्चा राही पाया
शिक्षण घेतलं मराठीमध्ये सारंच जाई वाया
साधे साधे शब्द मराठी कळत आता नाहीत
daddy झाले बाबा आणि mummy झाल्या आया

आपली भाषा विसरून जाती पडले सारे फशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी
जानेवारी 4, 2013

डोरेमॉन

तुमच्या घरी किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर डोरेमॉन म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही. नोबिता हा एक ८-१० वर्षांचा धांदरट मुलगा. तो कधीही संकटात सापडला की बाविसाव्या शतकातून आलेलं डोरेमॉन हे यंत्रमांजर त्याला एखादं जादुई उपकरण (गॅजेट - gadget) देऊन त्याची सुटका करण्यास मदत करतं. एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणाऱ्या आपल्या देशाला पाहून अशाच एखाद्या डोरेमॉनची निकड फार प्रकर्षाने जाणवू लागली आहे ...

इथे आम्हाला देव दिसतो जमिनीवर उगवणाऱ्या साध्या दर्भात
पण देवीसारख्या मुलींना आम्ही मारून टाकतो गर्भात
स्त्री पुरुषांचं समाजातील स्थान समान करण्याकरता
     डोरेमॉन मला एक गॅजेट देशील काय?