कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

डिसेंबर 5, 2014

नकोशी तारीख

आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण असते . . . त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या तारखा आपण लक्षात ठेवतो . . . विशेषतः जन्मतारीख, लग्नाची तारीख, वगैरे . . . बाकी काही नसलं तरी ह्या तारखांना आपलं नातं घट्ट होत असतं . . . आणि एक दिवस अचानक समजतं . . . तो मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सोडून ह्या जगातून निघून गेले आहेत . . . आपल्याकरता मागे ठेवून एक तारीख . . . नकोशी!

मुलांनी विचारलं कोण होता तुमचा बेस्ट फ्रेंड - जिवलग मित्र
की डोळ्यांसमोर यायचं तुझंच चित्र

आणि . . . एक दिवस समजलं तू ह्या जगातून निघून गेलास
साधा निरोप घ्यायचा चान्सही नाही दिलास
सप्टेंबर 5, 2014

जिंकणाऱ्यांची दुनिया

शर्यतीत मागे पडलेले खेळाडू, सिनेमात हिरो-हिरोइनच्या मागे नाचणारे एक्स्ट्रा, ६०% गुण मिळवून पास होणारे विद्यार्थी ह्या सर्वांमध्ये एक समान दुवा असतो. जगाने ह्या साऱ्यांच्या माथी 'अयशस्वी' किंवा 'हरलेले' असा शिक्का मारलेला असतो. गम्मत म्हणजे अशा हरलेल्यांची संख्या जिंकलेल्यांपेक्षा कितीतरी अधिक असते आणि तरीही आपण ह्या जगात जगायला नालायक आहोत असा न्यूनगंड मनात जोपासत हे हरलेले जगत असतात. काहीतरी नक्की चुकतंय . . . 

दुसऱ्याला मारूनच येथे
     पोट भरत असेल तर
हिंस्र पशूंच्या जंगलामध्ये
     चरणाऱ्यांनी काय करावं

यश कसे मिळवावे हे तर
     असंख्य तोंडी ऐकत असतो
हलाहल अपयशाचे रोज
     पचवणाऱ्यांनी काय करावं

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/aQ_vMM8YQa4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 15, 2014

आरसा

समांतर ब्रह्मांडांची कल्पना प्रगत भौतिकशास्त्राच्या कक्षेत येते. मात्र आपल्या सानिध्यात, आपल्या घरातही एक समांतर ब्रम्हांड असतं ज्यात डोकावण्याच्या खिडक्यांचं काम करतात घरी दारी असणारे आरसे! त्या ब्रह्मांडातील व्यक्ती आपल्याकडे प्रतिबिंब म्हणून बघत असतील का? काही असलं तरी त्या ब्रह्मांडाची नाळ आपल्या ब्रह्मांडाशी कायमची जोडली गेलेली आहे एवढं नक्की!

आरशातल्या माझे असते खचितच न्यारे घर
पदर साडीचा पत्नी घेते उलट्या खांद्यावर
माझ्या तुलनेमध्ये त्याचा भांग उलट तो कसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेई मला आरसा
ऑगस्ट 1, 2014

क्षितीज

'अमुक एवढी' गोष्ट झाली की मी निवृत्त होणार' असं आपल्यातील प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्यक्षात मात्र कोणीही निवृत्त होताना दिसत नाही कारण ती 'अमुक एवढी' गोष्ट एखाद्या क्षितीजाप्रमाणे असते. आपण क्षितीज म्हणून ठरवलेल्या जागी पुढचं क्षितीज तयार असतं . . .  

प्रत्येक क्षितिजापुढती मजला लोक दिसत होते
गंमत म्हणजे तेही पुढे पुढे पळत होते
तरीही तेच लक्ष्य माझे विचार म्हणत होते

समोर दिसेल ते सारं मला काबीज हवं होतं
फार काही नाही
     मला फक्त ते क्षितीज हवं होतं
मे 16, 2014

मनाने चांगला

तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का? आपण एखाद्या (त्या ठिकाणी उपस्थित नसलेल्या) व्यक्तीबद्दल तक्रारीच्या सुरात बोलत असतो. समोरची व्यक्ती आपल्याशी सहमती दाखवत असताना सहज बोलून जाते, 'ते काहीही असलं तरी तो मनाने फार चांगला आहे'. मनाने वाईट असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का? विचार केलात तर तुम्ही अगदी कट्टर मानता ते शत्रूही 'मनाने चांगले'च वाटू लागतील . . .
 
. . .
 
आपलं विखुरलेलं एकत्र कुटुंब आठवून मनामध्ये झिजतोय
पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघतोय
माझं मत नाही बदलणार जरी त्याला फासावरती टांगला
बाकी कसाही असला, तरी तो मनाने फार आहे चांगला

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/PnUWAFXPWE4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 18, 2014

उडदामाजी काळे गोरे

जनतेशी निगडीत असा साऱ्या जगातील भव्यतम सोहोळा - भारतीय लोकसभेची निवडणूक! आणि ह्या सोहोळ्याचे उत्सवमूर्ती, निवडणुकीचे उमेदवार . . .  अहाहा, काय वर्णावी त्यांची महती! एकास झाकावे आणि दुसऱ्यास काढावे . . .

ह्याला सोड त्याला जोड ह्याला गिरव त्याला खोड
शत्रू होते क्षणापूर्वी जे आता नाते झाले गोड
भाऊ ठाकला भावासमोर लक्तरं काढी गावासमोर
शत्रू सुद्धा अवाक् होती नातलगांच्या डावासमोर
धर्म काढ जात काढ भाषा काढ प्रांत काढ
मतांकरता काही चालेल आवस वाढ बये आवस वाढ
जेथील बाभळी तेथील बोरे उडदामाजी काळे गोरे