कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

जुलै 17, 2021

लाट

आपल्या मनात एक शांत डोह असतो. रोजच्या धावपळीत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. मात्र कधीतरी... एखाद्या कातर संध्याकाळी... जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो तेव्हा आपण त्या डोहाच्या किनाऱ्यावर जाऊन उभे राहतो. कसे कुणास ठाऊक अचानक त्या डोहात तरंग उठू लागतात. किनाऱ्यावर उभं असलेल्या आपल्यापर्यंत त्या लाटा पोहोचतात. आठवणींच्या लाटा! सुरुवातीला अगदी हळूवार... आणि मग...

शांत एका संध्याकाळी आठवणींची लाट उठली
आणि मनाच्या किनाऱ्यावर अलगद येऊन फुटली ||

वाऱ्याची एक झुळूक आली अंगावर आला काटा
डोळ्यांसमोर दिसू लागल्या मागे पडलेल्या वाटा ||

नक्की समजत नव्हतं पण वाटू लागलं उदास
जणू कसलीशी पूर्वसूचना मिळत होती मनास ||

बघता बघता काळे ढग मन भरून आलं दाट
मग आठवणींची धडकू लागली लाटेमागून लाट ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ekAFpxpSmHE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 18, 2020

अनादी अनंत लढा

युगानुयुगं चाललेल्या ह्या लढ्याला सणासुदीच्या दिवसांत विशेषतः दिवाळीमध्ये एखाद्या महायुद्धाचं रूप प्राप्त होतं. समोर चिवडा शेवेचं अकरा अक्षौहिणी सैन्य उभं ठाकलेलं असतं ज्याचं नेतृत्व लाडू, चकली, करंजी, अनरसा अशा आपल्या प्रियजनांच्या हाती असतं. मनातील श्रीहरी आपल्याला ‘युद्ध्य च’ करण्यास प्रवृत्त करत असतो, आणि आपण मात्र गाण्डीवाचा त्याग करून हतवीर्य होऊन त्या शत्रूला शरण जातो ...

तुडवून झाल्या किती वाटा
उसंत नाही श्रमी आता
सलत राहिला तरी काटा
     किती मोठा आकडा
अनादी अनंत लढा ॥

‘दीक्षित’ झालो समरसूनी
‘दिवे करां’नी उजळवूनी
तम न जाई काही करुनी
     जाई निश्चयी तडा
अनादी अनंत लढा ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NnkekN9OgGo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 8, 2020

विसात नव्वद शोधू नको

‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला हे असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते ...

कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको
     विसात नव्वद शोधू नको ॥

जुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे
तुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे
काळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको
     विसात नव्वद शोधू नको ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 10, 2020

रडू

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. ‘शीः रडतोयस काय मुलींसारखा’ ह्या लहानपणी ऐकलेल्या वाक्यापासून पुरुषांचा एक कोरडा प्रवास सुरु होतो. आपल्याकरता बावळट, भेकड अशी शेलकी विशेषणं वापरली जातील ह्या सामाजिक भीतीपोटी पुरुष रडणं आधी दडपतात आणि मग विसरूनच जातात. पुरुषांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण जास्त असण्यामागे ही भीती तर नसेल ...

लहान होता मुलगा माझा झाली होती कावीळ
बायकोचंही काळीज तुटत होतं तीळतीळ
रडून चालत नाही कितीही बाका आला वख्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥

माझ्या नकळत मोठी झाली होती काल लहान
मनातले कढ मनात रिचवून केलं कन्यादान
अश्रूंचा आधार आईला मी तर बापच फक्त
आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/hzXP-T5AFp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 15, 2020

वाळवी

आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आहे. पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण एक महत्त्वाचे घटक आहोत ह्याचा मला आनंद वाटतो. लोकशाहीबद्दल, विशेषतः आपल्या देशातील लोकशाहीबद्दल अनेक स्तरांवर टीका होत असते. अशी टीका आपण व्यक्त करू शकतो हाच कदाचित आपल्या लोकशाहीचा सर्वात मौल्यवान पैलू असावा  ...

विश्वाचे आकर्षण ऐसा महाल आहे एक
मानवतेच्या परिमाणांचा जेथ होर्इ आरंभ
सुबक भव्य रेखीव देखणा सर्वच पैलू सुरेख
भक्कम करती महालास त्या चार अनोखे स्तंभ

परंतु सौख्यामध्ये तेथ जणू विष कुणी कालवी
कळली नाही कशी लागली महालास वाळवी ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/wkfNzT0UTeE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 7, 2020

एकांतवास

आज जागतिक आरोग्य संस्थेचा (WHO) स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. भौतिक उन्नतीमागे भ्रमिष्टाप्रमाणे धावताना आपलं मानसिक आरोग्य हरवून बसलेल्या लोकांना कोरोना विषाणूच्या रुपात जणू आपल्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची एक शेवटची संधी मिळाली आहे – गर्दीतील एकांतवास संपवण्याची ...

नोकरी करायला लागलो तेव्हा डोक्यावर प्रगतीचं भूत होतं स्वार
     दिवस नाही रात्र नाही कष्ट केले अपार
सगळे उपाय वापरले साम दाम दंड भेद
     थांबलो नाही कोणाकरता नाही केला कधी खेद
चढलो वर इतरांच्या खांद्यांवर डोक्यांवर देत पाय
     पदोन्नतीच्या शक्यतेला होऊ दिला नाही अपाय
दमछाक झाली पण थांबलो नाही गाठलं पार शिखर
     बाकी सारे राहिले होते मागे दूरवर
पण ओसरल्यावर विजयाचा उन्माद वाटू लागलं उदास
     उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥