कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

मार्च 8, 2020

स्त्री

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हा दिवस गेली एकशे दहा वर्षं साजरा केला जात आहे. एकशे दहा वर्षांत बरंच काही बदललं आहे... पण आपल्या पुरुषप्रधान संकृतीत – मुख्यतः समाजाच्या मानसिकतेत - आणखीन बरंच काही बदलण्याची गरज आहे. पुढल्या एकशे दहा वर्षांत तरी ते बदलेल का?! 

आदिमानव गुहेत होते केला होता जाळ
‘ती’ आणि 'तो' आणि सोबत होतं छोटं त्यांचं बाळ
गुहेबाहेर गुरगुर ऐकून दोघं झाले सावध
दबा धरूनिया बसलं होतं तेथे एक श्वापद

बघती दोघे एकमेकांस मनातूनी घाबरले
अपत्य बघता भीती गिळूनी सज्ज तरी ते झाले
उचलून घेई ती बाळाला कवटाळे उराशी
उचलून पलिता आगीचा तो झेपावे दाराशी

नव्हता तोही वरचढ आणि नव्हती तीही अबला
प्राक्तनामध्ये लिहिला होता प्रसंग त्यांच्या सगळा
त्याच दिवशी पण ठरून गेली सामाजिक वहिवाट
तो चालवितो बाह्यप्रपंच ती घराच्या आत

ममतेपायी सहन करत ती राहीली मानहानी
स्त्रीजन्माची सुरूच आहे अजून करूण कहाणी ॥
डिसेंबर 12, 2019

सल

सामाजिक माध्यमांनी (social media) लोकसंवादात क्रांती घडवून आणली आणि कधी नव्हे ते राजकारणाने मध्यमवर्गीयांच्या घरात प्रवेश केला. ह्या गोष्टीचा फायदा जरी झाला असला तरी मनामनांतील तेढ वाढवण्याकरता त्याचा वापर ज्याप्रकारे होत आहे त्याचा सल आता मनाला बोचू लागला आहे ...

अचानक पांगलेले सारे मित्र ह्या सोशल मिडियावर लागले भेटू
वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारा तो होता जणू एक सेतू ॥

सोशल मिडियावरील लिखाणामुळे समजू लागली त्यांची हालहवाल
आणि इथेच पहिल्यांदा चुकचुकली मनात शंकेची एक पाल ॥

कुणी धर्माबद्दल कुणी जातीबद्दल कुणी भाषेबद्दल होतं बोलत
आमच्या शाळेत आम्हाला हे कुणीच कधीच नव्हतं शिकवत ॥

असे कसे झाले होते ह्यांचे विचार एवढे कोते
वयाने वाढलेले माझे काही मित्र विचारांनी मात्र झाले होते छोटे ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QNgYIUgYAjw ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 5, 2019

समज

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! हल्लीच्या आण्विक कुटुंबसंस्थेत मुलं मनाने हळवी होत चालली आहेत. काही मुलं इतरांपेक्षा निराळी असतात. त्यांना सर्वसामान्य परिमाणं लावणं चुकीचं ठरू शकतं. अशा मुलांची मानसिक जडणघडण समजून घेऊन त्यांच्याशी संवेदनशीलने वागणं हे आजच्या पालकांप्रमाणेच शिक्षकांकरताही आव्हान ठरत आहे...

अक्षरे थोडी ऐसी / अक्षरे थोडी तैसी
कथतील भाव कैसी / नाही मला समजले ॥

एक आणि एक दोन / त्रिकोण पंचकोन
हे सर्व ठरवी कोण / नाही मला समजले ॥

चित्रांमध्येच हसतो / स्वप्नांमध्येच वसतो
अभ्यास काय असतो / नाही मला समजले ॥

शाळेत आणि घरचे / मज ताडती कधीचे
हसणे कसे चुकीचे / नाही मला समजले ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ipST9UKV9Ro ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 21, 2019

… गोष्टी काही काही

आज जागतिक सांस्कृतिक विविधता दिन आहे. सांस्कृतिक विविधता जशी भौगोलिक अंतराप्रमाणे वाढत जाते तशीच पिढ्यांमधील अंतरामुळेही वाढत जाते. एकाच समाजातील दोन पिढ्यांचा सांस्कृतिक बाज निराळा असू शकतो. तंत्रज्ञानामुळे भौगोलिक अंतरं कमी होत असताना निरनिराळ्या समाजांतील सांस्कृतिक विविधतेतही अनेक समान दुवे सापडत आहेत. त्याचप्रमाणे दोन पिढ्यांतील अंतर मिटवण्याकरताही अनेक समान दुवे सापडतील. कारण, जग कितीही बदललं तरी बदलत नाहीत... गोष्टी काही काही...

जगामध्ये सतत दिसते नव्याची नवलाई
     पण बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥ धृ ॥

पूर्वी मुलांनी शिक्षणात चमकावं म्हणून अभ्यासाचा धोशा लागायचा रोज
हल्ली पालक म्हणतात मुलांनी जिंकावेत रियालिटी शोज
मात्र अपत्याचं यश पाहून अजूनही देवापुढे साखर ठेवते त्याची आई
     बदलत नाहीत पिढ्यान् पिढ्या गोष्टी काही काही ॥
एप्रिल 10, 2019

आली निवडणूक

उद्यापासून मतदानाला सुरुवात होईल. दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिक्स किंवा विश्वचषक स्पर्धांप्रमाणे दर पाच वर्षांनी निवडणुका येतात. त्या स्पर्धांप्रमाणेच निवडणुकांचाही मनोरंजन गुणांक (entertainment quotient) फार मोठा असतो. त्या स्पर्धांप्रमाणेच निवडणुकीतील विजेते सारं काही घेऊन जातात. आणि त्या स्पर्धांप्रमाणेच मधल्या काळात नक्की काय होतं ह्याचं आपल्याला सोयरसुतक नसतं...

गळ्यात सोनं बोटांत अंगठ्या अंगात मात्र खादी
फोर्ड स्कॉर्पिओ ऑडी आणखीन मर्सिडीज एखादी
अशी माणसं दारी आली ओळखावं अचूक
     आली निवडणूक ॥

आरोपांच्या चिखलफेकीचा माजला गदारोळ
चव्हाट्यावरी लक्तरं धुती भिडती जैसे पोळ
प्रत्येकाची लफडी बाकी साऱ्यांना ठाऊक
     आली निवडणूक ॥

सामाजिक माध्यमांत होई प्रचाराचा भडिमार
प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडू नका तुम्ही फार
मित्र कोणता तुमचा धरील तुमच्यावरती डूख
     आली निवडणूक ॥
जानेवारी 9, 2019

सुखाचा प्रवास

अनिवासी भारतीय बांधवांची आठवण ठेवून आज ‘प्रवासी भारतीय दिवस’ साजरा केला जातो. अनिवासी भारतीयांत मराठी मंडळी बरीच आहेत. आणि अनिवासी भारतीयांचा प्रवास म्हटलं की विमानप्रवासही आलाच. तर अशाच एका विमान कंपनीने एका मराठी कवीला अध्यक्षपदावर नेमलं. मग काय! नवीन राजाच्या राज्यात विमानातील उद्घोषणाही मराठी कवितेतून करण्याची टूम निघाली...

विमान आपुले तयार आहे करण्याला उड्डाण
     दीड तासभर समय संपता येई गंतव्य स्थान
मेज समोरील बंद करावे बांधा ह्याची गाठ
     पाठ आसनाचीही करावी लगेच तुम्ही ताठ
वरच्या कप्प्यामध्येच ठेवा जिन्नस तुमचे सारे
     पट्टा आवळूनी घट्ट आसनी नंतर शांत बसा रे
तुमच्या खिडकीवरील आवरण आता खुलेच ठेवा
     फोन आणखी संगणकाला थोडा आराम द्यावा
धुम्रपान मद्यपानबंदीस कायद्याचा आधार
     नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥

विमानात तुम्ही आमुच्या येता हर्ष होई अपार
     नमस्कार हो प्रवासी बांधव सप्रेम नमस्कार ॥ धृ ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/K0pNGJZrcOk ह्या ठिकाणी ऐकता येईल.