
एका मैत्रीचं थडगं
मे 1, 2025
बोथट
जुलै 5, 2025बोला

काही वेळा लहान मुलांकरता लिहिलेल्या गोष्टी मोठ्यांना समज देण्याकरताही वापरता येतात. मध्यंतरी अभिनेते प्रकाश राज ह्याच्या एका मुलाखतीत ह्याचं उत्तम उदाहरण ऐकायला मिळालं. पंचतंत्रातील एका गोष्टीचं त्यांनी केलेलं रुपांतर काव्यरुपात मांडण्याचा हा एक नम्र प्रयत्न..माझी ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/xkTjH8LLTCU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
अचानक एक कासव भेटलं, ओळखीचं वाटलं, डोळ्यांवर विश्वास बसंना
म्हटलं, अरे तू तर तोच पंचतंत्राच्या गोष्टीतील कासव ना?
हसून आलं माझ्या पुढ्यात चेहरा करून भोळा
म्हणालं, होय मीच तो काय कसं काय, बोला.. ॥
अरे पण बगळ्यांसोबत उडताना तुझ्या बोलण्याच्या सवयीने केला होता ना घात
बोलण्याचे तोटे, तुझ्या मरणाची गोष्ट सांगून अजून शाळेत शिकवतात
अहो, अर्धीच गोष्ट ठाऊक तुम्हाला, मला म्हणालं मारत डोळा
पडलो तरी रक्षण करणारी आहे माझी कणखर पाठ, आता बोला! ॥
फक्त गोष्टच नाही मुलांना शिकवणही तुम्ही चुकीची देताय
अन्यायापुढे हतबल करणाऱ्या अवस्थेत त्यांना नेताय
असल्या चुकीच्या शिकवणीमुळेच तुमचा स्वाभिमान झाला आहे चोळामोळा
खोटं बोलतोय का मी, आता तुम्हीच बोला.. ॥
माणसामुळे पर्यावरणाचं सगळं गणितच चुकलं होतं
जंगलतोडीमुळे पाऊस थांबून माझं ते तळं सुकलं होतं
मासे, बेडूक, खेकडे सर्वांच्याच पोटात उठला होता गोळा
मला म्हणाले तुम्ही वयस्कर, निदान तुम्ही तरी बोला.. ॥
माणसाने मग बगळ्यांबरोबर कपट रचून मला तिथून केलं रवाना
मीच मरणार होतो तिघांपैकी कोणीही बोललं असतं उडताना
माझं बोलणं बोचत होतं, बगळे म्हणत होते हो माणसाच्या होला
माझं काही चुकत होतं का, आता तुम्हीच बोला.. ॥
मरणाच्या दारात मी पोहोचलो पण त्याला कारण नव्हतं माझं बोलणं
त्याला कारणीभूत होतं माणसाचं अत्याचारी वागणं
त्याच्या अनिर्बंध वागण्यामुळे माझं तळं मरत होतं तोळा तोळा
माझं बोलणं चुकीचं होतं का, आता तुम्हीच बोला.. ॥
ह्या पुनर्जन्मातही माझं बोलणं अजूनही आहे जारी
कधी समाजसेवक, कधी पत्रकार, कधी न्यायाधीश तर कधी प्रामाणिक अधिकारी
मान खाली घालून, तोंडाला कुलूप लावून मिळमिळीत आयुष्य तुम्हीच जगताय
वर बोलणंच कसं चुकीचं आहे ते माझी गोष्ट सांगून पटवताय
जेव्हा धनवान आणि बलवान, जमीनदार आणि सरकार फिरवू पाहतील न्यायावर बोळा
तेव्हा गप्प बसू नका, निदान एक नागरिक म्हणून ॥



