कविता
व्यक्तिवाचक
आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात ज्यापैकी ‘व्यक्ती’ म्हणता येतील अशी फार थोडी – जी आपल्या मनावर एक अमिट ठसा उमटवून जातात. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या व्यक्तींचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अशाच काही व्यक्तींवर आधारित ह्या कविता.
सप्टेंबर 28, 2019
आज शहीद भगत सिंग जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम. साँडर्स हत्या प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु होता. दोन दिवसांनी काय निकाल लागणार आहे हे सांगण्याकरता कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती. बाबा रणधीर सिंगांनी त्यांना ईश्वराला शरण जाण्याचा सल्ला दिला. भगत सिंगांचा नकार बाबांना दर्पोक्तीपूर्ण वाटला. भगत सिंगांच्या मनात विचारमंथन सुरु झालं ज्यातून जन्माला आला एक निबंध ‘मी नास्तिक का आहे’. त्या गद्यरुपी कवितेचा काव्यरूपी संक्षेप करण्याचा हा नम्र प्रयत्न... नास्तिक माझे बोल ऐकुनी बाबा मजला वदले देवाच्या चरणी अर्पण कर दिन शेवटचे उरले अहंकार हा तुझ्या मनीचा आड येई भक्तीच्या तेच खरे पुण्यात्मे ज्यांनी त्या शक्तीला स्मरले प्रामाणिक माझी नास्तिकता ठाम मनात विचार हा नाही अहंकार ॥ पतितांचा उद्धार जपावी मानवतेची नाती प्रयत्न करणे केवळ असते तुमच्या आमच्या हाती यशही मिळेल तुम्हां मिळाली जर नशिबाची साथ देव कशाला हवा मारण्या अपयश त्याच्या माथी जबाबदारी झटकून टाकी हा कैसा आजार हा नाही अहंकार ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/jhvmLiuBCi0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 2, 2018
अल्बर्ट आईन्स्टाईनच्या अमेरिकेतील घरात तीन व्यक्तींच्या तसबिरी लावलेल्या आहेत असं म्हणतात. त्यापैकी दोन आहेत मायकल फॅरेडे आणि जेम्स मॅक्सवेल ह्या शास्त्रज्ञांच्या तर तिसरी आहे महात्मा गांधींची. अशा ह्या जगन्मान्य महात्म्याचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आजपासून सुरु होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली...
कष्ट हरण्या जनतेचे साहिले जाच अनंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥
सौम्य भाव वदनी वसती अन् शरीरयष्टी किरकोळ
भारदस्त जरी आवाज नव्हता कणखर तरीही बोल
बटुमूर्ती ती पाहून हसती इंग्रज हिणवून त्याला
किंमत लागे मोजावी सत्तेचे देऊन मोल
अखंड चळवळ चाले नाही देत काही उसंत
लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥
जून 2, 2018
“पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच”, हे बोलायला आणि ऐकायला किती सोपं वाटतं. पण आपलं रिकामं घर बघून ज्याचं मन जळतं त्यालाच कळतं...
त्याच भिंती त्याच खोल्या
त्याच जागा दिसती डोळ्यां
त्या कपाटामागुती शोधी मी जर लपलीस तू
पण तिथे नसणार तू ||
त्याच खुर्च्या तेच टेबल
पुस्तकांवर तेच लेबल
आर्इही चिडणार नाही पसरल्या जर वस्तू तू
पण तिथे नसणार तू ||
फेब्रुवारी 26, 2018
भारतमातेची परकीय जोखडातून मुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून विकास ह्या दोन ध्येयांकरता वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. ‘न धरी शस्त्र करी मी’ अशा ह्या वीराचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की त्यांना पार अंदमानात पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानातही वीर सावरकर अमानुष अत्याचार सहन करत अथक कार्यरत होते. मात्र मातृभूमीपासून दूर ठेवणाऱ्या सागराला पाहिलं की मनात एकच विचार येत होता.... केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला ||
ऑगस्ट 19, 2016
काल गुलज़ारजींचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी त्यांचा कवितासंग्रह वाचायचा योग आला. त्यांच्या कविता वाचून माझ्या मनात आलेले हे काही विचार ... गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं कडक उन्हाचे चटके अवचित आलेल्या सरी ... जणू श्रावण आला ओठांच्या कडांना हसू डोळ्यांच्या कडांना पाणी ... एकाच वेळी अतिभव्य ब्रह्माण्डाएवढं सामावणारं एका सूक्ष्म कणात शब्दांना एवढं वजन असतं ... ठाऊक नव्हतं शब्दांना रंग आकार स्पर्श असतो ... ठाऊक नव्हतं शब्दांत भावना व्यक्त करता येतात, ठीक आहे शब्द श्वास घेतात ... ठाऊक नव्हतं
नोव्हेंबर 6, 2015
आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं ...
तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ?
तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ
माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का?
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ZEpH1FsUp0o ह्या ठिकाणी ऐकता येईल.






