कविता
व्यक्तिवाचक
आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात ज्यापैकी ‘व्यक्ती’ म्हणता येतील अशी फार थोडी – जी आपल्या मनावर एक अमिट ठसा उमटवून जातात. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या व्यक्तींचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अशाच काही व्यक्तींवर आधारित ह्या कविता.
एप्रिल 17, 2015
शाळेत असताना वार्षिक परीक्षा नावाचं दिव्य पार पाडण्याकरता परीक्षेनंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी हे कारण पुरेसं असायचं. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या पण हा सुट्टीचा आनंद काही बदललेला नाही. अशीच एक सुट्टी उपभोगणाऱ्या बच्चा कंपनीकरता ही एक कविता, आपल्या सभोवतालच्या बाळगोपाळांना अवश्य वाचून दाखवा . . .
डोंगरावरती स्वच्छ होता पाण्याचा एक झरा
ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा
खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक
खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा
चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे
डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे
ऑक्टोबर 17, 2014
राखीपौर्णिमेला जाहिरातबाजी कितीही झाली तरी महाराष्ट्रात भाऊ-बहीण नात्याला खरा उजाळा मिळतो तो भाऊबिजेला! प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपल्याला आधार देणारा एक भाऊ असावा असं नक्की वाटतं. पुढल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊबिजेच्या निमित्ताने एका बहिणीच्या भावना अधोरेखित करणारी ही कविता . . .
सतत खोड्या काढल्या तरी
पाठवणीची वेळ येताच
कोपऱ्यात बसून आपले डोळे
पुसणारा एक भाऊ असावा
अरेतुरेची सलगी साऱ्या
मोठ्यांकरता चालत नाही
मुलांकडून मामा म्हणवून
घेणारा एक भाऊ असावा
आपलं सुख आपलं मानून
घेणारा एक भाऊ असावा
आपल्या दुःखात ठाम उभा
राहणारा एक भाऊ असावा
मार्च 7, 2014
आपल्यापैकी किती पुरुष नोकरी सोडून घर सांभाळू शकतील? हसण्यावारी नेऊ नका, नुसत्या विचारानेही घाम फुटेल. अनेक कमावते पुरुष घरची आघाडी भक्कम ठेवणाऱ्या गृहिणीला सोयीस्करपणे कमी लेखतात. आठ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' संपन्न होत आहे. त्यानिमित्त ह्या 'गृहिणी'चं केलेलं हे थोडंसं कौतुक . . .
बाहेरचे अन् घरचे सारे काम पाडिते पार
सुट्टी नाही त्या कामाला ना सण ना रविवार
स्वागत करते आगंतुकाचे तरी प्रसन्न हसुनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी
पदोन्नतीची आशा नाही पदक नाही ना चषक
गृहीतच धरती सारे तिजला राबे तरीही अथक
कौतुक सारे तिचे करूया निदान ह्या स्त्रीदिनी
राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी
नोव्हेंबर 25, 2013
सचिनबद्दल मी तुम्हाला काय सांगावे? सव्वीस वर्षांपूर्वी सुनील गावस्कर निवृत्त झाला (अति प्रेमापोटी सचिन आणि सुनीलचा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस करत आहे) तेव्हा एवढंच वाईट वाटल्याचं आठवतंय. गेली चोवीस वर्षं आपल्या धकाधकीच्या जगण्यात आनंदाचे असंख्य क्षण दिल्याबद्दल सचिनला धन्यवाद देण्याचा हा छोटासा प्रयत्न . . . चोवीस वर्षे आपल्या मनात ज्या व्यक्तीने केलंय घर नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर विक्रम अळवावरचे पाणी मोडीत निघती नित्यनवे अनंतकाळी अभेद्य टिकतील विचार हे असती फसवे गर्वाचे घर वर ना येते आदर मिळतो राहुनी लीन कीर्ती पचवुनी शांत राहावे उदाहरण ते दावी सचिन धावांपेक्षा रचले ज्याने हर्षोल्हासाचे डोंगर नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर
मे 3, 2013
फेसबुक आणि इंटरनेट सोडा, साधे फोनही दुर्मिळ असलेल्या आपल्या बालपणीच्या काळात मित्र किंवा मैत्रीण हरवून जाणं हे काही अपवादात्मक नव्हतं. तुमचे आहेत का हो असे मित्र किंवा मैत्रीण जे आजही आठवण आली की मनाला हुरहूर लावून जातात?
आठवत नाही आता
आयुष्य सरकत जाता
कशा आणखी कोठे
भिन्न जाहल्या वाटा
वाढे जगविस्तार
असंख्य मनी विचार
नवलाईच्या डोही
हरवून गेलीस पार
जानेवारी 18, 2013
बारा जानेवारी रोजी नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषाची शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी झाली. स्वामी विवेकानंदांसारख्या विराट व्यक्तिमत्वाला शब्दांमध्ये बंदिस्त करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही माझ्या वतीने हा आदरांजलीचा लहानसा प्रयत्न ... वस्तुस्थिती घेण्यास जाणुनी फिरला साऱ्या देशी प्रगल्भ करण्या विचार लांघे धर्मांच्याही वेशी पाच वर्षं देशाटन केले चार धाम अन् काशी पाहुनी द्रवला देशाच्या पिडीत मनीचा आक्रंद तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद






