उपरा
सप्टेंबर 20, 2013परतफेड
नोव्हेंबर 1, 2013मॉर्निंग वॉक
सकाळचा फेरफटका, अर्थात morning walk ही आरोग्याकरता अत्यंत चांगली गोष्ट आहे . . . आणि ‘आरोग्याकरता अत्यंत चांगल्या’ अशा इतर गोष्टींप्रमाणेच बोलायला सोपी पण करायला कठीण गोष्ट आहे. आपल्यातील किती जणांनी किती वेळा morning walkचा ‘दृढ संकल्प’ केला असेल ह्याचा हिशेब ठेवायला संगणकाची गरज लागेल . . .
माझा विचार आहे पक्का
आरोग्याचा हुकमी एक्का
त्यावर बसणार आहे शिक्का
पाचाचा लावूनी गजर
उद्या उठणार मी लवकर || १ ||
सगळे म्हणती दाखवून बोट
तुझं सुटलं आहे पोट
त्यांच्या बोलण्यात नाही खोट
चालीन चांगला मी भरभर
उद्या उठणार मी लवकर || २ ||
माझा रिपोर्ट काढला आहे
रक्तदाब वाढला आहे
त्यावर उपाय ताडला आहे
चक्रावून जातील डॉक्टर
उद्या उठणार मी लवकर || ३ ||
विझतसे एक एक तारा
सकाळीचा गार गार वारा
प्रदूषणास नाही थारा
जार्इन तेव्हा मी दूरवर
उद्या उठणार मी लवकर || ४ ||
गोष्ट चांगली नाही वाद
देर्इ शरीराला अल्हाद
जागे मनातही उन्माद
चालण्याचा चढे मला ज्वर
उद्या उठणार मी लवकर || ५ ||
पत्नी म्हणे भारी कल्पना
रोज रोज तुझ्या वल्गना
नको सांगू गप्पा जना
तिला दाखवीन खरोखर
उद्या उठणार मी लवकर || ६ ||
कालसुद्धा होतो उठणार
गजरही लावले होते चार
म्हटलं झोपू थोडंफार
परंतु झोपलो तासभर
उद्या उठणार मी लवकर || ७ ||
आज थंडी होती भारी
स्वप्नात नाचतसे शृंगारी
गजराच्या तालावर नारी
पाहता उलटून जार्इ प्रहर
उद्या उठणार मी लवकर || ८ ||
कुणी निंदा किंवा वंदा
बारीक होणार मी तर यंदा
आहे निश्चय माझा खंदा
येवो प्रलयही बेहत्तर
उद्या उठणार मी लवकर || ९ ||
नाही वायफळ माझा टॉक
जरी बसे कुणाला शॉक
घेणार आहे मॉर्निंग वॉक
तुम्हा वाटेल मग मत्सर
उद्या उठणार मी लवकर || १० ||