फेब्रुवारी 14, 2023

प्रेमाचा पाढा

प्रेमोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रेमात पडल्यावर माणसाचं विशेषतः पुरुषाचं माकड होतं ह्यात काही वाद नाही. प्रेमात पडलेला राजा असो वा रंक, बलदंड असो वा पेदरट, कॉलेजकुमार असो वा ऑफिसमधला बॉस.. क्यायच्या क्याय वाटणं आणि क्यायच्या क्याय वागणं साहजिक असतं. आणि मग ते तसं वाटणं आणि तसं वागणं बोलण्यात दिसून येणं हे ओघानेच आलं..

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥

एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥

माझी ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/7bKCy8pf_Ek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2022

प्रेमात पडल्यावर काय होतं

आज पाश्चात्य देशांत प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर प्रेमाच्या उत्सवाला दिवस कशाला हवा? माणूस कधीही, कुठेही आणि कोणाच्याही प्रेमात ‘पडू’ शकतो. प्रेमात पडलेल्या माणसांची काही विशिष्ट लक्षणं असतात. पण इतरांमध्ये ही लक्षणं शोधण्यापूर्वी एकदा विचार करा. कदाचित इतरांना तुमच्यात ही लक्षणं दिसत नसतील ना?

प्रेमात पडल्यावर काय होतं ?
प्रेमात पडल्यावर माणसाचं होतं गाढव
कधी केस तर कधी दाढी वाढव
समजतच नाही मित्र काय बोलतायत ते
आणि समजलं तर सुरू होतं त्याचं अकांडतांडव ॥

प्रेमात पडल्यावर काय होतं ?
प्रेमात पडल्यावर माणूस होतो आंधळा
फडतुस चित्रपटांना रडतो काढून गळा
भिंतीकडे पाहात गाऊ लागतो गाणी
माझ्या पिरतीचं पाणी आणि तुझा ज्वानीचा मळा ॥

माझी ‘प्रेमात पडल्यावर काय होतं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tkph0SenzzY ह्या ठिकाणी ऐकता येईल. 
फेब्रुवारी 14, 2021

ती भेटली परंतु ..

आज प्रेमाचा उत्सवदिन आहे. त्या दिवशी गाडी चालवताना पाहिलं समोरच्या वाहनाच्या मागे लिहिलं होतं, ‘भेटली होती, पण नशिबात नव्हती’. इतक्या मोजक्या शब्दांत त्या वाहनाच्या मालकाने आपल्या मनातला एक ठसठसता कोपरा उघड केला होता. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की अशा अडथळ्यांमुळे थांबलो तर जगणंच अशक्य होऊन जाईल. तुमच्या बाबतीत आले होते का कधी असे अडथळे?

विसरू कसा मी माझ्या ताब्यात रात्र नव्हती
ती भेटली परंतु नशिबात मात्र नव्हती ॥

खिडकीत त्या समोरील माझ्या मनीचे भाव
दावेल ऐसी खिडकी माझ्या घरात नव्हती ॥

उतरली आलिशान गाडीतूनी तिच्यावर
खर्चेन इतुकी रक्कम माझ्या खिशात नव्हती ॥

स्थळ पाहण्यास गेलो मैत्रीण पण मुलीची
गोडी तिच्यात होती ती त्या स्थळात नव्हती ॥

ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/sLZcV2uqwKQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जून 27, 2020

चुटपुटती ती भेट

आपल्या रोजच्या ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात कधीतरी एखादी व्यक्ती अशी भेटते की तिच्या सांनिध्यात काही वेळाकरता का होईना आपण आपले सारे ताणतणाव विसरून जातो. इतकंच नव्हे तर ती व्यक्ती परत कधी भेटेल ह्याची शाश्वती नसेल तरीही त्या चुटपुटत्या भेटीची आठवण आपल्याला आयुष्यभर पुरते...

ओळख तुझी करून घेणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

कॉफीशॉपच्या टेबलपाशी एकटीच वाचत बसली होतीस
फ्लाईट लेट झालं म्हणून जगावर हिरमुसली होतीस
कुठे जाणार होतीस विचारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

भाळावरची एक बट गालावरती येत होती
गालावरच्या खळीपासून लक्ष विचलित करत होती
बट तुझी ती मागे सारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/ErJh-nU6XEk ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2020

प्रेमाचा पाढा

आज प्रेमाचा उत्सव! प्रेमात पडलं की जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच दिसू लागतं. लहानपणी शिक्षकांच्या, घरच्यांच्या धाकाने पाठ केल्यावर जसे सतत पाढेच डोक्यात फिरायला लागायचे, तसंच कोणाच्याही धाकाशिवाय हा प्रेमाचा पाढा अखंड डोक्यात घर करून बसतो ...

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥

एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥

पाच देव पूजतोय भेट व्हावी म्हणून पाहा
कॉलेजमध्ये वाट पाहातो तुझी तास सहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
झालंय काय काळजीत पडले माझे पिता माता ॥

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥
फेब्रुवारी 14, 2019

गुपित

वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. मात्र लग्न होऊन बरीच वर्षं झालेल्या अनेक जोडप्यांना – विशेषतः पुरुषांना - आजच्या दिवशी नक्की कसं वागावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. खरं तर प्रेमाला स्थल-कालाप्रमाणे वयाचंही बंधन नसतं. त्यामुळे बावरून जाऊ नका. प्रणयाच्या खेळात तुमची जुनीजाणती सहचारिणीही तुम्हाला चकित करू शकते...

नवतारूण्याचे दिन आपुले
     सरून गेले जरी असती
माझ्याकरता मदन आज तू
     तुझ्यासाठी मी आज रती

उधळू देत मनाला चौखूर
     आज मला सावरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
     विसरू नको रे विसरू नको ॥
जानेवारी 6, 2017

तू ने तो कभी पी ही नही

प्रत्येक मध्यमवर्गीय गृहस्थाच्या आयुष्यात एक मित्र असा असतो जो प्रेमात पडण्याच्या बाबतीत त्या गृहस्थाचा सुप्त आदर्श असतो. सुप्त अशाकरता की प्रत्यक्षात आयुष्यभर त्या गृहस्थाने तो मित्र कसा चुकीचा वागत आहे हे त्या मित्राला आणि स्वतःलाही पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो मित्र मात्र त्याचा सल्ला प्रत्येक वेळी धुडकावून त्याला एकच सांगत असतो ... हाय कम्बख़्त 'तू ने तो कभी पी ही नहीं' ...

लागली नोकरी संपलं शिक्षण
माझी प्रेमासाठी तुझी पैशांसाठी वणवण
म्हणायचास भविष्याचा विचार कर
ह्यावर किती भांडायचो आपण

तुला मोठे हुद्दे तर प्रेयसींची यादी माझ्या संग्रही
तुला कधीच नाही समजलं
तेव्हाही मी म्हणायचो हाय कम्बख़्त तू ने तो कभी पी ही नहीं
सप्टेंबर 18, 2015

आठव

'अतिपरिचयात अवज्ञा . . .' असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण 'आपलं माणूस' म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी...

कधी कानावर ये तान
     विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
     मज येई तुझा आठव

कुणी सारी केस बोटाने
     अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
     मज येई तुझा आठव
फेब्रुवारी 20, 2015

ओळख

नवरसांतील (खाजगीत) सर्वात जास्त आवडणारा रस म्हणजे शृंगार रस. आणि मराठी भाषेत शृंगार रस म्हटलं की लावणीला पर्याय नाही . . . 

तुम्हासाठी केला शिणगार
वाट बघत झाला अंधार
तुमच्या मनात तिचे विचार

मन धावे तिकडं जाया
     तुम्हा ओळखलंय मी राया

नाही सुटणार आता अबोला
     तुम्हा ओळखलंय मी राया
जरी केलीत लाडीगोडी
     जरी पडलात माझ्या पाया