कविता

विचार

'Cogito ergo sum' अर्थात 'माझं अस्तित्व माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे' हे रेने देकार्त ह्या थोर फ्रेंच तत्ववेत्त्याचं विधान पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा पाया मानलं जातं. आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता कवितेएवढं दुसरं प्रभावी साधन नसेल. त्यामुळे माझ्या काही कविता माझ्या विचारांवर आधारित आहेत.

मार्च 20, 2015

शेतकरी राजा

'अन्नदाता सुखी भवं' असं सुभाषित आहे. मात्र आपल्या देशातील अन्नदात्या शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्या सारख्या अ-शेतकरी समाजाला खरंच आहे का? आपल्या बायका-मुलांना वाऱ्यावर सोडून आर्थिक कारणाकरता जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, तेव्हा त्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीने सहन केलेल्या दडपणाची आपण कल्पना करू शकतो. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात ह्या 'शेतकरी राजा'ची परिस्थिती कधी सुधारेल का?

मोठे मोठे हुद्दे आणि मोठं मोठं वेतन
     जगण्यासाठी प्रत्येकाला लागे मात्र जेवण
प्रत्येक जण म्हणतो आहे मोठं माझंच काम
     दिसत नाही कोणालाही शेतकऱ्याचा घाम

जिंकत गेले सारे शेतकरी भोगतो सजा
     बाकी सारे तृप्त उपाशी शेतकरी राजा
मार्च 3, 2015

स्त्रीमुक्ती

मार्च ८ - आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा. स्त्रीमुक्तीच्या बाबतीत आपल्या मध्यमवर्गीय पुरुषप्रधान समाजाने बरीच मजल मारली आहे. "मी माझ्या बायकोला मारत नाही" हे विधान "मला लिहिता वाचता येतं" ह्या विधानाइतकं कालबाह्य झालं आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिन पाळायची गरज वाटणार नाही तो खरा सुदिन . . . 

तिचं अमुक वागणं चालेल हे ठरवणारा मी कोण?
तिचं तमुक वागणं चालणार नाही हे तरी ठरवणारा मी कोण?
मला आहे निदान तेवढं तरी स्वातंत्र्य तिला आहे का?
आपलं वागणं ठरवण्याचा अधिकार तिला आहे का?

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QwU7MvEPfMA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 16, 2015

दोन देश

भारत हा विरोधाभासांचा देश आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपली लोकसंख्याच एवढी आहे की विरोधी विचारसरणीच्या लोकांची टक्केवारी जरी कमी असली तरी त्यांचा आकडा मोठा असू शकतो. ह्या विरोधाभासांकडे कधी नाईलाजाने, कधी सोयीस्करपणे तर कधी निर्ढावल्याप्रमाणे दुर्लक्ष करायला आपण शिकलो आहोत . . . 

परदेशाची स्वच्छता
     डोळे दिपविते पाहता
लाज नाही पण थुंकता
     हे दोन्ही देश माझे

गातो एकतेचे गुण सारे
     पण धर्म जातही प्यारे
भिंती बांधून अडवू वारे
     हे दोन्ही देश माझे

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dvRP__5wF9U ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 2, 2015

लक्ष कुठे

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आधीच वेळ कमी मिळतो, त्यात एकविसाव्या शतकातील आधुनिक उपकरणांनी आपल्या उरलेल्या वेळेचाही ताबा घेतलेला आहे. आपण बोलत असताना एखाद्याचं आपल्याकडे लक्ष नसणं किंवा एखादी गोष्ट तू मला सांगितलीच नाहीस असं एखाद्याने सांगणं हे प्रकार आता वारंवार घडू लागले आहेत. साध्या साध्या गोष्टीतही 'कहीं पे निगाहें कहीं पे निशाना' म्हणावं लागत आहे . . . 

आजकालचा माणूस हरपे मेंदूवरती चढती पुटे
     नजर कुठे अन् लक्ष कुठे

शाळेमधली गंमत सांगत मुलगी थुईथुई नाचे
महाशयांची नजर मात्र संदेश फोनवर वाचे

हिरमुसलेल्या कन्येचे त्या काही क्षणांतच हृदय तुटे
     नजर कुठे अन् लक्ष कुठे
डिसेंबर 19, 2014

आता केस पिकले

केस पिकण्यामागे जैवरासायनिक कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की की त्या वयात मनुष्य आयुष्याचं सिंहावलोकन करायला शिकतो. आयुष्यात अनुभवलेले हेवे-दावे, भांडणं, सुख-दुःखाचे प्रसंग . . . एकूण आयुष्यापुढे कोते वाटू लागतात. तुम्हाला आलाय का असा अनुभव?

आयुष्य असते फारच छोटे मजला कळून चुकले
     आता केस पिकले

नकार मिळता तिच्या मुखातून पचला नव्हता धक्का
भीष्मासम ब्रह्मचर्य पाळीन विचार केला पक्का
गृहस्थ पुरता आता शंका नाही एकही टक्का

प्यार मुहोब्बत असली गाणी ऐकून कान किटले
     आता केस पिकले
डिसेंबर 5, 2014

नकोशी तारीख

आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण असते . . . त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या तारखा आपण लक्षात ठेवतो . . . विशेषतः जन्मतारीख, लग्नाची तारीख, वगैरे . . . बाकी काही नसलं तरी ह्या तारखांना आपलं नातं घट्ट होत असतं . . . आणि एक दिवस अचानक समजतं . . . तो मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सोडून ह्या जगातून निघून गेले आहेत . . . आपल्याकरता मागे ठेवून एक तारीख . . . नकोशी!

मुलांनी विचारलं कोण होता तुमचा बेस्ट फ्रेंड - जिवलग मित्र
की डोळ्यांसमोर यायचं तुझंच चित्र

आणि . . . एक दिवस समजलं तू ह्या जगातून निघून गेलास
साधा निरोप घ्यायचा चान्सही नाही दिलास