चतुर कुत्रा
फेब्रुवारी 4, 2011प्रश्न
ऑक्टोबर 7, 2011अजब जंगल
मे महिन्याची सुट्टी सुरु आहे आणि घरातल्या बाळगोपाळांना पाहून तुम्हालाही नक्कीच हेवा वाटत असेल. मुलांची मात्र धमाल सुरु आहे. खास तुमच्या घरातील बच्चे कंपनीकरता एक बालगीत सादर करत आहे, ‘अजब जंगल’. त्यांना जरूर वाचून दाखवा … पाहा आवडतंय का ते!ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1YgZacK0PAM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जंगलामधून जात होतो दिसत नव्हती वाट
निळ्या गुलाबी पानांची ती झाडी होती दाट
झाडावरती बसून मासे करत होते कलकल
पक्षी होते पाण्यात मोठं अजब होतं जंगल || १ ||
काळ्या फुलावरती एका बसला होता हत्ती
फुंकर मारता उडून गेला करू लागला मस्ती
मगरी उडत होत्या गगनी चालत नव्हती अक्कल
वाघ खाती गवत मोठं अजब होतं जंगल || २ ||
भरधाव पळे कासव मागे लागली गोगलगाय
बिळात पळाला जिराफ माझा पडणार होता पाय
झाडावरच्या घरट्यात अंडी उबवत होतं अस्वल
चार पायांचा साप मोठं अजब होतं जंगल || ३ ||
ऐकली मी डरकाळी आणि बसला माझा घसा
बघत होता मला एक अक्राळविक्राळ ससा
खातो तुला म्हणाला आता होर्इल माझी चंगळ
आला डुलत डुलत मोठं अजब होतं जंगल || ४ ||
एवढ्यात आला तिथून एक डोंगराएवढा उंदीर
म्हणे सशाला निघ इथून चल मागे फिर
ससा चिडला ऐकून दोघांत जुंपली मोठी दंगल
शंभर झाडं पडली मोठं अजब होतं जंगल || ५ ||
खाली लाल गवत आणि वरती हिरवे मेघ
धुम ठोकली तिथून कमी नाही केला वेग
घरी कुणाला सांगितलं तर करतात माझी टिंगल
पण खरंच पाहिलंय मी मोठं अजब असं ते जंगल || ६ ||