कविता
प्रेमकाव्य
कथा-कादंबऱ्या आणि चित्रपट-नाटकांमध्ये दाखवतात तेवढं अवास्तव नसलं तरी प्रेमाचं आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असतं एवढं नक्की. स्थळ, काळ, वय, ऐपत वगैरे कोणतीही बंधनं न पाळणारी ही भावना व्यक्त करण्याकरता शब्द अपुरे पडतात आणि मग काव्याचा आधार घ्यावा लागतो.
जून 27, 2020
आपल्या रोजच्या ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात कधीतरी एखादी व्यक्ती अशी भेटते की तिच्या सांनिध्यात काही वेळाकरता का होईना आपण आपले सारे ताणतणाव विसरून जातो. इतकंच नव्हे तर ती व्यक्ती परत कधी भेटेल ह्याची शाश्वती नसेल तरीही त्या चुटपुटत्या भेटीची आठवण आपल्याला आयुष्यभर पुरते... ओळख तुझी करून घेणं अर्धंच राहून गेलं बघ चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥ कॉफीशॉपच्या टेबलपाशी एकटीच वाचत बसली होतीस फ्लाईट लेट झालं म्हणून जगावर हिरमुसली होतीस कुठे जाणार होतीस विचारणं अर्धंच राहून गेलं बघ चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥ भाळावरची एक बट गालावरती येत होती गालावरच्या खळीपासून लक्ष विचलित करत होती बट तुझी ती मागे सारणं अर्धंच राहून गेलं बघ चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥ ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/ErJh-nU6XEk ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 14, 2020
आज प्रेमाचा उत्सव! प्रेमात पडलं की जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच दिसू लागतं. लहानपणी शिक्षकांच्या, घरच्यांच्या धाकाने पाठ केल्यावर जसे सतत पाढेच डोक्यात फिरायला लागायचे, तसंच कोणाच्याही धाकाशिवाय हा प्रेमाचा पाढा अखंड डोक्यात घर करून बसतो ... एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥ एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥ पाच देव पूजतोय भेट व्हावी म्हणून पाहा कॉलेजमध्ये वाट पाहातो तुझी तास सहा एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता झालंय काय काळजीत पडले माझे पिता माता ॥ एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥
फेब्रुवारी 14, 2019
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. मात्र लग्न होऊन बरीच वर्षं झालेल्या अनेक जोडप्यांना – विशेषतः पुरुषांना - आजच्या दिवशी नक्की कसं वागावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. खरं तर प्रेमाला स्थल-कालाप्रमाणे वयाचंही बंधन नसतं. त्यामुळे बावरून जाऊ नका. प्रणयाच्या खेळात तुमची जुनीजाणती सहचारिणीही तुम्हाला चकित करू शकते...
नवतारूण्याचे दिन आपुले
सरून गेले जरी असती
माझ्याकरता मदन आज तू
तुझ्यासाठी मी आज रती
उधळू देत मनाला चौखूर
आज मला सावरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
विसरू नको रे विसरू नको ॥
जानेवारी 6, 2017
प्रत्येक मध्यमवर्गीय गृहस्थाच्या आयुष्यात एक मित्र असा असतो जो प्रेमात पडण्याच्या बाबतीत त्या गृहस्थाचा सुप्त आदर्श असतो. सुप्त अशाकरता की प्रत्यक्षात आयुष्यभर त्या गृहस्थाने तो मित्र कसा चुकीचा वागत आहे हे त्या मित्राला आणि स्वतःलाही पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो मित्र मात्र त्याचा सल्ला प्रत्येक वेळी धुडकावून त्याला एकच सांगत असतो ... हाय कम्बख़्त 'तू ने तो कभी पी ही नहीं' ... लागली नोकरी संपलं शिक्षण माझी प्रेमासाठी तुझी पैशांसाठी वणवण म्हणायचास भविष्याचा विचार कर ह्यावर किती भांडायचो आपण तुला मोठे हुद्दे तर प्रेयसींची यादी माझ्या संग्रही तुला कधीच नाही समजलं तेव्हाही मी म्हणायचो हाय कम्बख़्त तू ने तो कभी पी ही नहीं
सप्टेंबर 18, 2015
'अतिपरिचयात अवज्ञा . . .' असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण 'आपलं माणूस' म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी...
कधी कानावर ये तान
विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
मज येई तुझा आठव
कुणी सारी केस बोटाने
अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
मज येई तुझा आठव
फेब्रुवारी 20, 2015
नवरसांतील (खाजगीत) सर्वात जास्त आवडणारा रस म्हणजे शृंगार रस. आणि मराठी भाषेत शृंगार रस म्हटलं की लावणीला पर्याय नाही . . .
तुम्हासाठी केला शिणगार
वाट बघत झाला अंधार
तुमच्या मनात तिचे विचार
मन धावे तिकडं जाया
तुम्हा ओळखलंय मी राया
नाही सुटणार आता अबोला
तुम्हा ओळखलंय मी राया
जरी केलीत लाडीगोडी
जरी पडलात माझ्या पाया






