मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
नटवतेस का शॄंगाराने तुझं अंगप्रत्यांग || धॄ ||
नट्टापट्टा करणं म्हणजे काम नव्हे वरवरचं
शक्ती पैसा वेळ सारं कितीक होतं खर्च
ठाऊक आहे तुलाही सारं करणार नाहीस कबूल
पाहतो मी जेव्हा तुजला ते होतं सारं वसूल
मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
माझ्या ह्मा उपकारांचे तू कसे फेडशील पांग || १ ||
मी वाटेने चालत असता येशी तू सामोरी
नजर तुझ्यावर रेंगाळे मज कशास वाटे चोरी
दिधले मज देवाने चक्षु मूर्ती तुझी मी पाही
डोळे मिटून घ्यावे माझे इतुकी कुरूप नाही
मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
निघता घरून तुला टाळण्या पाहू का पंचांग || २ ||
निसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा
निसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा
मीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया
तूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया
मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
नरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग || ३ ||