हा नाही अहंकार
सप्टेंबर 28, 2019सल
डिसेंबर 12, 2019शिल्पकार
आज राष्ट्रीय बालकदिन आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक गुणवत्ता दिन म्हणून पाळला जातो. पाठांतरावर जोर देणाऱ्या आपल्या शिक्षणपद्धतीत बालकांची गुणवत्ता ही केवळ मिळालेल्या मार्कांनी मोजली जाते. मात्र गुणवत्तेची व्याख्या फार वेगळी आहे. ती जितकी व्यापक आहे तितकीच वैयक्तिकही आहे. पाहा पटतंय का…
नदीकाठी मंदीराचं काम सुरू होतं
कुणी करतो छोटं कुणी काम करतो मोठं
वाटसरू एक आला बघत बसला घटका चार
पाहत होता काम करत होता शिल्पकार ॥ १ ॥
काय घडवतो आहेस सांग विचारतो तो जेव्हा
गरूड आहे घडवत सांगे शिल्पकार तो तेव्हा
शेजारी एक गरूड होता हुबेहूब आकार
तसाच गरूड तल्लीनतेने बनवी शिल्पकार ॥ २ ॥
किती गरूड लागतील वाटसरू तो विचारी
उत्तर आले एकच गरूड माझी कला सारी
बसणार आहे मंदीराच्या कळसावरती पार
एवढे बोलून काम करू लागला शिल्पकार ॥ ३ ॥
आश्चर्याने वाटसरू मग विचारतो तयाला
कारण काय दुसरा गरूड घेशी घडवायाला
चुकला होता त्या गरूडाच्या चोचीचा आकार
कोरीव काम करत म्हणाला त्याला शिल्पकार ॥ ४ ॥
वाटसरू मग हसून विचारी शब्दी त्याच्या खोच
इतक्या उंचावरची कोणा दिसेल कैसी चोच
मेहनत सारी तुझ्या अंगीची वाया बघ जाणार
काम थांबवून त्यास न्याहाळे तेव्हा शिल्पकार ॥ ५ ॥
कुणास दिसली कुणास नाही मजला त्याचे काय
मला मात्र ती दिसे वाकडी ह्याला काय उपाय
निष्ठा माझी फक्त कलेशी तोच एक आधार
इतुके बोलून पुन्हा कामास लागे शिल्पकार ॥ ६ ॥
आपुले काम पाहूनी व्हावे आपुले समाधान
कोण काय म्हणे ह्याला मग नसते तेथे स्थान
आपुल्या संतोषाला आपुल्या निकषांचा आधार
कुशल बने तो तेव्हा आयुष्याचा शिल्पकार ॥ ७ ॥