सागरा प्राण तळमळला
फेब्रुवारी 26, 2018साबरमतीचा संत
ऑक्टोबर 2, 2018नसणार तू ….
“पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच”, हे बोलायला आणि ऐकायला किती सोपं वाटतं. पण आपलं रिकामं घर बघून ज्याचं मन जळतं त्यालाच कळतं…
त्याच भिंती त्याच खोल्या
त्याच जागा दिसती डोळ्यां
त्या कपाटामागुती शोधी मी जर लपलीस तू
पण तिथे नसणार तू || १ ||
त्याच खुर्च्या तेच टेबल
पुस्तकांवर तेच लेबल
आर्इही चिडणार नाही पसरल्या जर वस्तू तू
पण तिथे नसणार तू || २ ||
तेच पडवळ अन् रताळी
तीच आठी तुझ्या भाळी
गुळाचा तो खडा देता नक्की बघ हसशील तू
पण तिथे नसणार तू || ३ ||
तीच गादी तेच अंथरूण
तीच उशी अन् तेच पांघरूण
सांगण्या तुज ऊठ जार्इन अजून का निजलीस तू
पण तिथे नसणार तू || ४ ||
त्याच चिंता त्याच शंका
छतावरचा तोच पंखा
उशीर झाला म्हणू मैत्रिण जवळची राहिलीस तू
पण तिथे नसणार तू || ५ ||
तोच पाऊस तीच थंडी
लोकरीची तीच बंडी
सालबादाच्याप्रमाणे राहतील बदलत ऋतू
पण तिथे नसणार तू || ६ ||
तेच दसरा अन् दिवाळी
पाडवा तो तीच होळी
करूनी अर्चा वळूनी सांगीन तीर्थ दे सर्वांस तू
पण तिथे नसणार तू || ७ ||
तो दमा अन् तीच धाप
तीच सर्दी तोच ताप
कपाळावर थंड पट्ट्या ठेवण्या यावीस तू
पण तिथे नसणार तू || ८ ||
तीच ही अन् तोच मीही
नाही काही अन् कमीही
आठवणींनी नयन आमुचे सारखे जाती उतू
पण तिथे नसणार तू || ९ ||
तीच जागा तेच घरटे
आज ऐसे स्वल्प ठरते
पंखी बळ जोखुन भरारी गगनी मग घेशील तू
अन् इथे नसणार तू || १० ||
2 Comments
सुंदर कविता, उडणाऱ्या प्रत्येक पाखराच्या आई बाबांचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद !
मनःपूर्वक धन्यवाद, राजेश…