राग
नोव्हेंबर 6, 2015सागरा प्राण तळमळला
फेब्रुवारी 26, 2018गुलज़ारजी
काल गुलज़ारजींचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी त्यांचा कवितासंग्रह वाचायचा योग आला. त्यांच्या कविता वाचून माझ्या मनात आलेले हे काही विचार . . .
गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं
त्रयस्थाने बघावं तसं दिसू लागलं … आयुष्य
काही खोलवर पुरलेल्या भावना … बोचू लागल्या
आरशांसारखी लख्ख झाली … काही नाती
काही निसर्गाची तर काही निसर्गाचंच अंग असलेल्या माणसांची
आसपासच्या रोजच्या वस्तूंचे बदलले संदर्भ
कैक वेळा पाहिलेल्या वास्तूंना प्राप्त झाला नवा अर्थ
त्याच जागा पण निराळ्याच भासू लागल्या
मनातला गुंता सुटत गेला
मनाला पडलेला पीळ उलगडत गेला
मन मोकळं झालं दावणीला बांधलेलं वासरू मोकळ्या माळरानावर
कडक उन्हाचे चटके अवचित आलेल्या सरी … जणू श्रावण आला
ओठांच्या कडांना हसू डोळ्यांच्या कडांना पाणी … एकाच वेळी
अतिभव्य ब्रह्मांडाएवढं सामावणारं एका सूक्ष्म कणात
शब्दांना एवढं वजन असतं … ठाऊक नव्हतं
शब्दांना रंग आकार स्पर्श असतो … ठाऊक नव्हतं
शब्दांत भावना व्यक्त करता येतात, ठीक आहे
शब्द श्वास घेतात … ठाऊक नव्हतं
गुलज़ारजी हे तुम्ही बरं नाही केलंत
कालपर्यंत मी स्वत:ला कवी समजत होतो …