दोन देश
जानेवारी 16, 2015शेतकरी राजा
मार्च 20, 2015स्त्रीमुक्ती
मार्च ८ – आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा. स्त्रीमुक्तीच्या बाबतीत आपल्या मध्यमवर्गीय पुरुषप्रधान समाजाने बरीच मजल मारली आहे. “मी माझ्या बायकोला मारत नाही” हे विधान “मला लिहिता वाचता येतं” ह्या विधानाइतकं कालबाह्य झालं आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिन पाळायची गरज वाटणार नाही तो खरा सुदिन . . .ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QwU7MvEPfMA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
तिने नोकरी केली तर ‘मला’ चालेल
तिने जीन्स घातली तर ‘मला’ चालेल
तिने गाडी चालवली तर ‘मला’ चालेल
कारण ‘मी’ आहे पुढारलेला
तिने केस कापले तर ‘मला’ चालेल
तिने नॉनवेज खाल्लं तर ‘मला’ चालेल
ती मैत्रिणींबरोबर सहलीला गेली तर ‘मला’ चालेल
कारण ‘मी’ आहे पुढारलेला
तिने कधी कधी मंगळसूत्र घातलं नाही तर ‘मला’ चालेल
तिने लग्नाआधीचं नाव बदललं नाही तर ‘मला’ चालेल
तिने मला एकेरीने हाक मारली तर ‘मला’ चालेल
कारण ‘मी’ आहे पुढारलेला
तिने सिगारेटी फुंकल्या तर ‘मला’ चालेल?
तिने ड्रिंक्स घेतली तर ‘मला’ चालेल?
ती पुरूषांबद्दल अचकट विचकट बोलली तर ‘मला’ चालेल?
खरंच आहे का मी पुढारलेला?
ती रात्री उशीरा घरी आली तर ‘मला’ चालेल?
तिचा एखादा जिवश्च मित्र असेल तर ‘मला’ चालेल?
ती घरी येऊन टीवी बघत बसली तर ‘मला’ चालेल?
खरंच आहे का मी पुढारलेला?
तिने लग्नाआधीचं आडनाव बदललं नाही तर ‘मला’ चालेल?
तिच्या सासरच्या समारंभांना ती आली नाही तर ‘मला’ चालेल?
सर्वांच्या देखत ती माझ्यावर ओरडली तर ‘मला’ चालेल?
खरंच आहे का मी पुढारलेला?
हा प्रश्न पुढारलेपणाचा नाहीच मुळी
प्रश्न आहे मोकळीकीचा
प्रश्न आहे निर्णय घेण्याची मुभा असण्याचा
प्रश्न आहे व्यक्तिस्वातंत्य्राचा!
तिचं अमुक वागणं चालेल हे ठरवणारा मी कोण?
तिचं तमुक वागणं चालणार नाही हे तरी ठरवणारा मी कोण?
मला आहे निदान तेवढं तरी स्वातंत्य्र तिला आहे का?
आपलं वागणं ठरवण्याचा अधिकार तिला आहे का?
माझी भूमिका एका मित्राची असावी
माझी भूमिका एका सल्लागाराची असावी
असा विचार करण्याची कुवत माझ्यात येर्इल
तेव्हाच स्त्रीमुक्तीची खरी सुरूवात होर्इल
प्रत्येक घरात