उडदामाजी काळे गोरे
एप्रिल 18, 2014क्षितीज
ऑगस्ट 1, 2014मनाने चांगला
तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का? आपण एखाद्या (त्या ठिकाणी उपस्थित नसलेल्या) व्यक्तीबद्दल तक्रारीच्या सुरात बोलत असतो. समोरची व्यक्ती आपल्याशी सहमती दाखवत असताना सहज बोलून जाते, ‘ते काहीही असलं तरी तो मनाने फार चांगला आहे’. मनाने वाईट असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का? विचार केलात तर तुम्ही अगदी कट्टर मानता ते शत्रूही ‘मनाने चांगले’च वाटू लागतील . . .ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/PnUWAFXPWE4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आमच्या शाळेत होता मुलगा एक धटिंगण
त्याने कधीच पाळलं नाही कुठल्या नियमांचं रिंगण
हैराण करी सर्वांना काढून खोड्या नित्य नव्या
कोणी बोलायला गेलं तर देत असे ऐकवणार नाहीत अशा शेलक्या शिव्या
नवल वाटलं जेव्हा एका बार्इने त्याचं कौतुक ऐकवलं
नदीत पडलेल्या माझ्या मुलाला गेल्या वर्षी ह्मानेच वाचवलं
सोनूला बुडताना पाहून पाण्यात उडी मारण्यापूर्वी तो जराही नाही थांबला
बाकी कसाही असला‚
तरी तो मनाने फार आहे चांगला || १ ||
ऑफिसमधला माझा बॉस‚ साला एक नंबरचा होता खत्रुड
छळायचा नवीन रूजू झालेल्या मुलांना ज्यांना फुटली नव्हती साधी मिसरूड
आमच्या कामातील त्रुटी काढण्यात त्याला यायचा फार मजा
पाच मिनिटं उशीर झाला तरी कापायचा अर्ध्या दिवसाची रजा
जेव्हा एक जुना सहकारी म्हणाला‚ आपला साहेब म्हणजे देवमाणूस आहे खरा
तेव्हा मी दचकून पाहतच राहिलो त्याचा चेहरा
म्हणाला अरे स्वत:ला मूल नाही पण मुलांसाठी त्याने अनाथाश्रम बांधला
बाकी कसाही असला‚
तरी तो मनाने फार आहे चांगला || २ ||
माझा जेलर मित्र मला म्हणाला पेपरातील फोटो दाखवून
हाच तो कुप्रसिद्ध गुन्हेगार ज्याने पचवले आहेत तीन खून
इस्टेटीच्या भांडणात पिचला होता पुरता
त्याच्या कुर्हाडीला बळी गेले त्याचे चुलत भाऊ आणि चुलता
आपलं विखुरलेलं एकत्र कुटुंब आठवून मनामध्ये झिजतोय
पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघतोय
माझं मत नाही बदलणार जरी त्याला फासावरती टांगला
बाकी कसाही असला‚
तरी तो मनाने फार आहे चांगला || ३ ||
सिनेमापेक्षा निराळं असतं वास्तवातील जीवन
इथे साचेबद्ध नसतात हिरो आणि विलन
तुमच्या शत्रूच्या आयुष्यातही असेल मित्रांच्या मैत्रीची साखर
तुमचा वैरीही घालत असेल आपल्या कुटुंबीयांवर मायेची पाखर
तुमच्या दुष्मनावरही कुणीतरी ठेवत असेल विश्वास
आणि तुमच्या वागण्याचाही कुणालातरी नक्कीच होत असेल त्रास
म्हणाल तुम्ही प्रत्येक व्यक्तीबद्दल जर मनाचा धागा सांधला
बाकी कसाही असला‚
तरी तो मनाने फार आहे चांगला || ४ ||