युधिष्ठीर आणि दुर्योधन
ऑगस्ट 7, 2015आठवणी
नोव्हेंबर 20, 2015चांगलं तेवढं घ्यावं
थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यात काही वावगं नाही. मात्र ते करताना त्यांच्या केवळ त्रुटी दाखवून देऊन आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं ह्यात काही अर्थ नाही. थोर व्यक्तींना थोरपण ज्या गुणांमुळे लाभतं तेवढे गुण घावेत, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि बाकी सारं सोडून द्यावं . . .
दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || धृ ||
हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद् भुत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || १ ||
शतकानुशतकं अचल उभे ठाकलेले आहेत पर्वत
खाचखळग्यांची दमवून टाकणारी निबिड वाट अंगावर मिरवत
आपण माथ्यावरून दिसणारं विहंगम दॄष्य डोळ्यांत साठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || २ ||
वादळात घरं संसार होतात उद्ध्वस्त
सागरपॄष्ठी गलबतं नौका होतात क्षतिग्रस्त
आपण वार्याच्या झुळुकीप्रमाणे उष्म्याला शीतल करावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || ३ ||
गावा शहरांची वाताहात होते जेव्हा अतिवॄष्टीमुळे पूर येतो नदीला
कुटुंबंच्या कुटुंबं लागतात देशोधडीला
आपण तहाननेनं व्याकूळलेल्या जीवांना जीवन पाजावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || ४ ||
मॄत्यूला कारणीभूत ठरतो उष्माघात
प्रखर किरणांनी शेतंच्या शेतं जळून जातात एकजात
आपण अंधार्या आयुष्यांना प्रकाश दाखवण्याचं कार्य करावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || ५ ||
विज्ञानाने दिलेल्या अस्त्रांमुळे झाला विध्वंस
अत्याचार झाले अगणित नॄशंस
आपण विज्ञानानेच आरोग्याचं आंदण दिलं हे का विसरावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || ६ ||
आर्इवडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || ७ ||
महामानवांच्या हातूनही चुका होत असतात
महा असले तरी तेही मानवच असतात
रामाकडून संयम घ्यावा
कृष्णाकडून कर्म करत राहण्याचा उपदेश घ्यावा
बुद्धाकडून शांती घ्यावी
महंमदाकडून मैत्री घ्यावी
ख्रिस्ताकडून हळवं मन घ्यावं
झरतॄष्टाकडून पराक्रमी मनगट घ्यावं
ज्ञानेश्वरांकडून जगत्कल्याणाचं सूत्र घ्यावं
रामदासांकडून मनाला आवर घालण्याचं कसब घ्यावं
चाणक्याकडून चातुर्य घ्यावं
शिवबाकडून सर्वजनसुखाचं बाळकडू घ्यावं
लोकमान्यांकडून स्वाभिमानाचं शिक्षण घ्यावं
बापूंकडून अहिंसेचं व्रत घ्यावं
सावरकरांकडून जाज्वल्य देशप्रेम घ्यावं
चाचा नेहरूंकडून भविष्याचं स्वप्न घ्यावं
महामानवांच्या चुका पाहून विचालित होऊ शकतं चित्त
पण म्हणून त्यांचे चांगले विचार आचरणात न आणणं हे केवळ एक निमित्त
ह्माकरताच आपण त्यांच्या दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं || ८ ||