दोन बाजू
फेब्रुवारी 4, 2011वर्ष २०००
एप्रिल 1, 2011क्रिकेट आणि युद्ध
क्रिकेटला जर धर्म मानला तर विश्वचषक स्पर्धेला कुंभमेळा किंवा हजची यात्रा म्हणायला हरकत नसावी. विशेषतः मराठी मनाला तर क्रिकेट म्हणजे अगदी कबड्डी किंवा खोखोइतका जवळचा खेळ. क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटबद्दलचे माझे विचार कवितेच्या रूपाने मांडायचा प्रयत्न करत आहे.
मॅच सुरू होता त्याचे प्राण येती कंठी
न विसरता ठेवतो जवळ साखरेची तो वाटी
डॉक्टर म्हणतात टेंशनमुळे शुगर लो होते
खात रहा साखर चक्कर न येण्यासाठी
मॅच आली काट्यावर तर हरपे त्याची शुद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। १ ।।
मॅच सुरू झाली की मग रस्ते पडतात ओस
जिंकलो एकदा मॅच तर मग होतो मनी तोष
आमच्या प्रतिक्रिया नेहमी टोकाच्याच असतात
हरलेले खेळाडू आमचा ओढवून घेतात रोष
फरक पडत नाही आम्हा कोणी असो विरूद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्या सारख्यांकरता युद्ध ।। २ ।।
लारा वॉर्न मुरली पाहून चढतो आम्हा चेव
हिरो आमच्याकरता धोनी सुनील कपील देव
क्रिकेटच्या प्रेमाला आमच्या नसते कुठली हद्द
क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन असतो देव
असा विचार करणाऱ्यांच्यात असतात आबालवृद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। ३ ।।
क्रिकेट पहात नाहीत जे ते आम्हा असतात हसत
आम्हाला पण आमचं वागणं वावगं नाही दिसत
प्रत्येकाची प्रेम करायची वेगळी असते तऱ्हा
आमची देशप्रेमाची ही अशीच आहे पद्धत
प्रेम करायची आमची आहे पद्धत ही विशुद्ध
क्रिकेट म्हणजेच असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। ४ ।।
विचार करा आपली पिढी आहे नशीबवान
खरं युद्ध पाहिलं नाही ठेवा ह्याचं भान
सोक्षमोक्ष लावून टाका म्हणणं सोपं असतं
असतात रम्य युद्धकथा ऐकायलाच छान
वाटलं का कधी सैन्यामध्ये जावं आपण खुद्द
क्रिकेट म्हणजेच असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। ५ ।।
खरं युद्ध फक्त सीमेवरती लढत नसतात
सगळे तरूण सैन्यामध्ये भरती होत असतात
नाक्यापर्यंत पोहोचलेल्या बंदुकधाऱ्यांपासून
बायका मुलं लपून आपला जीव वाचवत असतात
आशा करा येणार नाही तिसरं महायुद्ध
क्रिकेट म्हणजेच असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। ६ ।।
असं युद्ध लढण्यापेक्षा क्रिकेट काय वाईट
कनिष्ठ देश इथेही जातो पराभवाच्या खाईत
लढणाऱ्यांच्या जीवालाही इथे धोका नसतो
उलट बनतात बघणाऱ्यांच्या गळ्यामधले ताईत
युद्धात रग जिरते ह्या मग बनतो गौतम बुद्ध
क्रिकेट म्हणजेच असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। ७ ।।
अमेरिकेने खेळून पाहावे इराकमध्ये क्रिकेट
जगभर त्याचे करून पाहावे प्रक्षेपणही थेट
युद्धावरचा खर्च टळेल पैसा मिळेल बक्कळ
मॅचनंतर घ्यावी एकमेकांची गळाभेट
परमानंदात नहातील लोक विसरून जातील युद्ध
क्रिकेट म्हणजेच असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध ।। ८ ।।