मोकळा वेळ
मे 1, 2015वीकएंड
जून 19, 2015कायदा पाळणारा गाढव
तुम्ही वेळेवर कर भरता का? तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता का? तुम्ही दुकानांत वस्तूंच्या पावत्या मागता का? तसं असेल तर तुम्ही गाढव आहात . . . दचकू नका. आपल्या देशात, जिथे जास्तीत जास्त कायदा मोडणाऱ्याला हुशार किंवा चतुर समजलं जातं, तिथे दुसरं काय म्हणणार?
प्रत्येक कायद्याची ज्याने केली पायमल्ली
त्याच्या घरी सुबत्ता नांदतेय अष्टौप्रहर हल्ली
तोच पुन्हा वळून माझी चेष्टा करतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || १ ||
कधीच पाळत नाही तो लाल दिव्याचा नियम
चुकीच्या बाजून गाडी पुढे काढतो कायम
घरी पोहोचण्याची शर्यत मग नेहेमी मीच हरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || २ ||
पगार घेताना निम्मे पैसे मागतो रोकडे
आयकर भरताना दाखवतो उत्पन्न तोकडे
तेवढेच उत्पन्न पण मी दुप्पट कर भरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ३ ||
नव्वद दिवसांचे मी मोजतो क्षणन् क्षण
तो मात्र दलालाकरवी करतो आरक्षण
मी अनारक्षित आणि तो बर्थवर पाय पसरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ४ ||
आयुष्यभर झुरतोय घ्यायला घर मोठं
त्याने मात्र खोली बांधली जिथे अंगण होतं
तरीही घरपपट्टीला उशीर झाला तर मीच घाबरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ५ ||
स्वस्त वस्तूंची दुकाने त्याला ठाऊक आहेत
मी मात्र पावतीशिवाय वस्तूच नाही घेत
माझ्यापेक्षा मोठा टीवी त्याच्याकडे अवतरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ६ ||
लहानपणापासून ऐकत आलो आहे बात
कायद्याचा म्हणे भारी लांब असतो हात
पण हा हात कायदा मोडणाऱ्यांना कधी धरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ७ ||
इंग्रज गेला तरी तेच पोलीस आणि नोरकशाही
कायद्याच्या रक्षकांनाच कायद्याची पर्वा नाही
त्यांना जाब विचारायला तुम्ही आम्ही घाबरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ८ ||
कायदा तोडण्याला कारण नसतो नाइलाज
विचार करता आपली आपल्यालाच वाटेल लाज
स्वार्थीपणे जो तो गेंड्याचे कातडे पांघरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || ९ ||
उफराटेपणा पाहून होतात मनाला क्लेश
वाटतं कुठे चालला आहे आपला देश
मग वाटतं कशाला आणि कोणाकरता आपण झुरतो
कारण
कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो || १० ||
त्या दिवसावर आहे माझी भिस्त
जेव्हा सर्व जण पाळू लागतील शिस्त
नाही म्हणणार कोणी मी बेकायदेशीर मार्ग आचरतो
तेव्हाच म्हणता येर्इल
कायदा पाळणारा शेवटी गाढव नसतो || ११ ||