वर्ष २०००
एप्रिल 1, 2011षंढ
जुलै 16, 2011आळस
१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो … म्हणजेच काम करणाऱ्यांचा दिवस. त्यामुळे ह्या दिवशी माझ्यासारख्या आळशी माणसांना कुठे लपावं ते समजत नाही. माझे कामसूपणाबद्दलचे काही ‘प्रांजळ’ विचार ‘आळस’ ह्या कवितेद्वारे मांडत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते पटतील ह्यात मला शंका नाही. १ मे बद्दल लिहिलेली कविता इतक्या उशिरा का? कारण अर्थातच … ‘आळस’!
सारे म्हणती मला मी तर आळसाचा कळस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || धृ ||
न्यूटनच्या त्या सिद्धांताचं
आहे फार महत्व
प्रत्येक वस्तूमध्ये असतं
अंगभूत जडत्व
सर्वमान्य नियम घालत
नाही कोणी वाद
निसर्गनियमा माणसांचा
ना असे अपवाद
चार पानी कधी कुणी का पाहिला रे पळस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || १ ||
पुसती मला ते कामापासून
दूर का तू पळशी
जग सारं काम करतं
असा कसा तू आळशी
माझं म्हणणं काम मला जर
समोर दिसलंच नाही
तर त्याच्यापासून दूर पळायचा
प्रश्नच येत नाही
कामं करण्यासाठी लागते लोकांची का चुरस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || २ ||
ऑफिसमध्ये असेल बॉसला
कामाची जर घार्इ
माझं टेबल ओलांडून तो
पुढल्यापाशी जार्इ
सहकारी मग कामं करतो
उशिरापर्यंत सारी
पाच वाजता मी आपला पण
असतो आपल्या घरी
मला काम सांगायचं कोणी करत नाही धाडस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || ३ ||
पसार्यात जे हवं असेल ते
लगेच मला सापडतं
आवरलेल्या घरात पावलो
पावली माझं अडतं
मनात असतो बायकोच्या अन्
विचार एकच घोळत
असा कसा रे राहू शकतोस
पसार्यात तू लोळत
लागट बोलण्यानेही माझा होत नाही विरस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || ४ ||
काम करणार्यांना वाटतो
नेहमीच आमचा हेवा
आम्ही करतो काम अन् हे
करून घेतात सेवा
मग सदान्कदा देत बसतात
आम्हाला ते काम
आम्हीही बेरड झालो आहोत
हलत नाही जाम
काम तुमचा देव कुंभकर्णाचा मी वारस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || ५ ||
मनात म्हटलं आळशांची एक
काढू संघटना
आळसाच्या हक्काची तुम्ही
थांबवा विटंबना
एकदोघांना बोललो माझ्या
विचार मनी जे आले
हो पुढे मी आलोच म्हणुनी
पसार सारे झाले
आळशांच्या त्या संघटनेला आड आला आळस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || ६ ||
कामसू माणसांमुळेच झालं
दुषित पर्यावरण
पुढची पिढी म्हणेल
जगण्यापेक्षा चांगलं मरण
केवढी प्रगती केलीस माणसा
जरा तरी तू थांब
एका झटक्यात कित्येक बळी
घेतोय ॲटमबॉम्ब
आळशी असती माणसं तर जग राहिलं असतं सरस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || ७ ||
सुखामागे धावता धावता
विचार करा हो थोडा
सुखी व्हायचं असेल तर मग
काम करणं सोडा
शंभर गोष्टीत एक गोष्ट
सांगतो आहे खरी
असेल माझा हरी तर तो
देर्इल खाटल्यावरी
कामात झालात अंध तुम्ही अन् आम्ही राहिलो डोळस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || ८ ||
सारे म्हणती मला मी तर आळसाचा कळस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस || धृ ||