शेतकरी राजा
मार्च 20, 2015मोकळा वेळ
मे 1, 2015आभार
तराजूच्या एका पारड्यात भ्रष्टाचार, प्रदूषण, गुन्हेगारी, स्पर्धा, चिंता, आजारपणं वगैरे आयुष्य असह्य करणाऱ्या गोष्टी टाकल्या तरी हा तराजू संतुलित करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या दिमतीला हजर असतात. ह्या गोष्टी आपल्याला देऊन आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या कलाकार, क्रीडापटू, शास्त्रज्ञ अशा व्यक्तींचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत . . .
उन्हाळ्याचे दिवस होते गाडीस अमाप गर्दी
दहा स्टेशनं गेल्यानंतर सीट मिळाली अर्धी
वरचा पंखा चालत नव्हता येतच नव्हता वारा
घुसमट होती होत त्यात अन् घामाच्याही धारा
एक प्रवासी ओरडला मी मागे मग बघितलं
शतक सचिनचं झालं त्याने सगळ्यांना सांगितलं
तसं पाहिलं शतकाने त्या फरक फार ना पडला
पण तरीही बातमी ऐकून मनास आनंदच वाटला
सुनील कपिल अन् सचिन आणती आमुच्या मनी बहार
आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार || १ ||
ऑफिसमध्ये लिफ्टसमोरील मोठी रांग बघता
पाच जिने चढलो नाहीतर उशीर झाला असता
चार वाजता मीटिंग होती येतो साहेब मोठा
मीटिंगकरता फार्इल माझा साहेब मागत होता
किचकट फार्इल बनवत होतो तेव्हा बातमी आली
मंगळयानाची मोहीम त्या दिवशी फत्ते झाली
ऐकून आपुल्या शास्त्रज्ञांचा गगनभेदी प्रताप
दिवसभरच्या कामाचाही हलका झाला ताप
भारतवर्षाच्या स्वप्नांना शास्त्रज्ञच आधार
आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार || २ ||
थकून भागून स्टेशन गाठलं ट्रेन होत्या लेट
माणसांच्या त्या तळ्यात होतं ट्रेन नामक बेट
परत जाच परत त्रास परत आणखीन गर्दी
परत दहा स्टेशनांनंतर सीट मिळाली अर्धी
डुलकी लागता लागता गाणं ऐकू आलं खास
किशोर कुमार गात होता पल पल दिल के पास
लग्नाआधी हिचं नि माझं लाडकं गाणं होतं
मनामध्ये उलगडत गेलं आठवणींचं जणू पोतं
किशोर रफी लता ऐकता मिटे मनी अंधार
आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार || ३ ||
संध्याकाळी ठरला होता चित्रपटाचा बेत
अर्धा तास उशीर कुठली रिक्षाच नव्हती येत
दर पाहून तिकिटांचे ते फिरले माझे डोळे
सगळ्यांसमोर चेहरा ठेवला हसरा बळे बळे
सुरू जाहला पिक्चर आणि गेला सगळा शीण
भिन्न विश्वात वावर केला पुढचे तास तीन
आखीव रेखीव मेकअप दिसतो चेहरे सगळे लख्ख
कौशल्याने अभिनेत्यांच्या झालो मी तर थक्क
तीन तासांत मीच हिरो अन् विलन खाती मार
आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार || ५ ||
आम्ही मध्यमवर्ग आमचं आयुष्य असतं हेच
सुखदु:खाच्या हाती चाले कायम रस्सीखेच
महिन्यांमागून महिने येती नवीन नवीन खर्च
व्याही धाडतात घोडं आधीच थोडं नसतं घरचं
आमचे सारे कष्ट पाहूनी देवही हेलावतो
दु:खावर फुंकर घालण्यास दूत धाडूनी देतो
कला विज्ञान क्रीडा आणि साहित्याची क्षेत्रं
आम्हाला सुख मिळवून देती बनती आमुचे मित्र
यश तुम्हाला मिळता त्याचे कौतुक आम्हा फार
आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार || ५ ||
जीवनातल्या शुष्क रणातील ओॲसिस तुम्ही बनता
देव कुणी पाहिला आमुचे देवही तुम्हीच बनता
प्रत्येकाचा छंद असे त्या इच्छा आपुल्या जपणं
पूर्ण तुम्ही पण करता आमुची बालपणीची स्वप्नं
तीव्र अशा भावनांचा तुम्ही परंतु ठेवा धाक
इजिप्तच्या राणीचं चालत नाही तिरकं नाक
आहात तुम्ही मानव आम्हा ठाऊक नाही काय
दावू नका पण कधी आम्हा तुमचे मातीचे पाय
सुप्त अपेक्षांचे आमुच्या तुम्ही पेलत ठेवा भार
आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार || ६ ||