मोबाईल फोन
फेब्रुवारी 4, 2011पहिली गाडी
मध्यमवर्गीयांमध्ये दोन ठळक उपवर्ग आहेत – एक ज्यांच्याकडे गाडी नाही तो आणि दुसरा अर्थातच ज्यांच्याकडे आहे तो. टीवी, फ्रीज, फोन आता सगळ्यांकडे असतात. पण गाडीचं तसं नाही. गाडी असणं म्हणजे श्रीमंतीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल. पहिल्या उपवर्गाची दुसऱ्यात जाण्याकरता नेहेमीच धडपड सुरु असते. आणि मग जेव्हा पहिली गाडी घरी येते तेव्हा त्या गाडीचं अप्रूप पुढे आयुष्यभर वाटत राहिलं नाही तरच नवल.
मेहनत करण्याचा तेव्हा
भलताच होता जोश
तरूणार्इ पण अशीच असते
माझा नव्हता दोष
नोकरी होती चांगली
त्याला लग्नाचीही जोड
प्रमोशन मिळालं आणि
बातमी आली गोड
अजूनसुद्धा आठवली तर तिच्यावर मी भाळतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || १ ||
पहिल्या दिवशी बसलो त्यात
वाटलं एकदम खास
अजून नाकात दरवळतोय
तो सीट कवरचा वास
वाटत होतं माझ्याकडेच
बघतात माणसं सारी
गाडी नव्हती होती ती जणू
हत्तीची अंबारी
विहरत होतो असा जसा मी ढगांवरच चालतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || २ ||
गाडीवाले आपल्या देशात
नशीबवान ते थोडे
आयुष्यभर बाकी सारे
झिजवत रहाती जोडे
ट्रेनमधली गर्दी आता
इतिहासजमा झाली
किती नशीबवान मी ही
समज मजला आली
आता फार क्वचितच मी रस्त्यावरती चालतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || ३ ||
पहिला चरा पडला त्यावर
घासून गेली बस
अन्न पाणी बेचव झालं
आठवतोय दिवस
नंतरसुद्धा बरेच झाले
आघात तिच्यावर
पण पहिला चरा पडला होता
माझ्या काळजावर
अजून शिव्या ड्रायवरच्या त्या नावाने मी घालतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || ४ ||
सुखरूप नेहमी नेलं घडलं
नाही काही अघटित
खूप आठवणी तिच्यासंगे
आहेत माझ्या निगडीत
शिकवताना बायकोशी
भांडण झालं होतं
अन् गाडीतूनच घरी आमचं
बाळ आलं होतं
तिच्याबद्दल वार्इट काही ऐकायचं मी टाळतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || ५ ||
कधी कधी ती गाडी माझी
रागावलेली दिसते
प्रेम कमी जर केलं तर ती
रूसूनसुद्धा बसते
दाखवते सर्विसिंगनंतर
आनंदी चेतना
आपल्यासारख्या आहेत पहा
तिजलाही भावना
आजारी जर पडली ती तर अजून मी गलबलतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || ६ ||
पहिली गाडी आल्यानंतर
प्रगती माझी झाली
हुद्दा झाला मोठा आणखीन
मोठी गाडी आली
जुनी झाली गाडी सगळे
सांगतात टाक विकून
पहिली गाडी इथेच राहील
सांगतो त्यांना निक्षून
अजूनही दर वर्षी तिचा वाढदिवस मी पाळतो
माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो || ७ ||