कवीराज
मार्च 21, 2021लाट
जुलै 17, 2021रोप
कोरोनाच्या संकटामुळे सारं जग हवालदिल झालं आहे. ह्या संकटात काही जणांनी आपले प्रियजन गमावले आहेत. इतरांना आपल्यावर तर अशी वेळ येणार नाही ना अशी धास्ती वाटते आहे. आपण ह्या संकटाला फार लवकर शरण जात आहोत असं तर नाही ना? हे संकट नैसर्गिक आहे – बहुतेक. पण मग निसर्गाकडूनच आपल्याला काही शिकता येईल का? ह्या काव्यकथेतील स्वामींनी आपल्या शिष्याला दिलेली शिकवण, पाहा तुम्हालाही पटतेय का ते …ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/ZAgyTFrPPhY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
लहानसे ते गाव ज्यामध्ये लहान आश्रम होता
नवीनच तेथे आला होता शिष्य एक तो छोटा ॥ १ ॥
शिष्य असे तो मस्तीखोर अन् होताही धडपड्या
हरला की अन् रडायचा तो होता मोठा रड्या ॥ २ ॥
स्वामीजींनी दिधले त्या शिष्याच्या हाती बीज
शिष्याला म्हणाले हे पेरून नंतरच नीज ॥ ३ ॥
पेरून झाले बीज शिष्य तो बनला त्याचा माळी
लक्ष ठेवतो रोज त्यावरी सकाळ संध्याकाळी ॥ ४ ॥
एके दिवशी त्या बीजातून कोंब बाहेर आला
पाहून त्या कोंबास शिष्यास फार आनंद झाला ॥ ५ ॥
कधी घालतो माती त्याला कधी घालतो पाणी
कधी सांगतो गोष्टी त्याला कधी गातसे गाणी ॥ ६ ॥
सकाळी उठल्या उठल्या पळतो पाहावया ते रोप
सांजे त्याला पाहिल्याविना येतच नव्हती झोप ॥ ७ ॥
दोन तीन अन् पाच सात ती वाढत गेली पाने
शिष्य दाखवी सर्वांना ती पाने अभिमानाने ॥ ८ ॥
एक दिशी तो शिष्य पाहतो आक्रीत काही घडले
शिष्याचे ते रोप त्या तिथे मोडून होते पडले ॥ ९ ॥
आकांडतांडव करुनी शिष्य आश्रम घेई डोक्यावर
स्वामी मात्र टाळती काहीही बोलायाचे त्यावर ॥ १० ॥
गळली पाने रोपाची पण शिष्य करी दुर्लक्ष
स्वामी मात्र जल घालती त्याला रोज राहुनी दक्ष ॥ ११ ॥
एक दिशी शिष्यास स्वामींनी रोपापाशी नेले
काडीवरती शुष्क एक ते पान दिसे इवलाले ॥ १२ ॥
शिष्य होतसे चकित पाहुनी रोपाची त्या जिद्द
स्वामी पुसती त्याला ह्यातून काय होतसे सिद्ध ॥ १३ ॥
शिष्याने त्या निरखून ऐसे पानाला पाहिले
स्मरूनी वागणे अपुले विचार मनामध्ये दाटले ॥ १४ ॥
रोपाने त्या कसे जगावे दिले ते दाखवून
प्रसंग आला बाका गेले नाही ते डगमगून ॥ १५ ॥
जल यत्नांचे घालत राहणे ते अपुल्या हातात
संकटावरी कितीही भयंकर खचितच होते मात ॥ १६ ॥
ऐकून उत्तर स्वामीजींचा चेहरा प्रसन्न झाला
समजले त्यांस शिष्याला त्या पाठ पहिला मिळाला ॥ १७ ॥