बाप्पांची आरती
सप्टेंबर 7, 2012संशयी ससा
एप्रिल 17, 2015निकाल
परीक्षा संपून आता निकालांची वेळ जवळ आली आहे. एकीकडे ‘मुलांचा निकाल आहे, आपला नाही’ ह्याचा असुरी आनंद तर दुसरीकडे ‘काय दिवे लावले आहेत कोण जाणे’ ह्याची चिंता अशा कातरीत तुमच्यापैकी बरेच जण सापडले असतील. घरातील तणाव कमी व्हावा म्हणून खास बाळगोपाळांकरता लिहिलेली ही कविता त्यांना अवश्य वाचून दाखवा …
मीच एकटी दु:खी
बाकी सारे सर्व खुशाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || धृ ||
उठून गेले शाळेत तास इंग्लिशचा पहिलाच
पेपरमध्ये मला मार्क होते केवळ पाच
दुसरा तास मराठीचा मज प्रिय होता फार
पेपरमध्ये मार्क मात्र होते फक्त चार
लाज वाटूनी झाले माझे
दोन्ही गाल लाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || १ ||
तिसरा तास येता बसला धक्का एक आणखीन
गणितामध्ये मला मिळाले मार्क फक्त तीन
चौथा आला तास माझे मार्क विचारतो कोण
कॉम्प्युटरच्या पेपरमध्ये मार्क फक्त दोन
गळ्यात दाटलं रडू
शोधू लागले मी रूमाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || २ ||
पाचवा तास हिंदी संस्कृतचा होता बहुतेक
स्वच्छतेचाच तेवढा मला मार्क मिळाला एक
रसातळाला गेले सहावा तास असे भूगोल
पेपरमध्ये मार्क होते फक्त दोन गोल
एक एक पायरी खाली आले
झाली खरंच कमाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || ३ ||
विसरून गेले त्याच्यानंतर बाकीचे पेपर
सुचत नव्हतं कोणावरती फोडू मी खापर
एवढुसे ते मार्क बघूनी होर्इ तोंड कडू
आर्इला मी काय सांगू आलंच मला रडू
माझ्या जागी स्वत:स ठेवा
तुम्ही सुद्धा रडाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || ४ ||
एवढ्यात झाल्या गुदगुल्या पण माझ्या ह्मा पोटी
शाळेमधून आलाय फोन आर्इ म्हणत होती
राग नाही कौतुकाचे चेहर्यावरती भाव
पहिली आलीस शाळेमध्ये काढलंस बघ तू नाव
अशी कशी हिला स्वप्नं पडतात
हसत तुम्ही असाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || ५ ||
बाबा पार्टी देणार आज्जी म्हणे दॄष्ट काढू
आर्इनेही देवासमोर ठेवले चार लाडू
सगळे आनंदात मला पण सुचत नाही काही
एकच विचार करते हेही स्वप्नच माझं नाही
पुन्हा उठवून आर्इ म्हणेल
झाली बघ सकाळ
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || ६ ||
मीच एकटी दु:खी
बाकी सारे सर्व खुशाल
परीक्षेचा नाही
लागलाय माझाच आज निकाल || धृ ||