अनाथ
ऑक्टोबर 21, 2011बी पी
जानेवारी 4, 2012रफू
आपण बोलताना बरेचदा ‘क्यायच्या क्याय!’ विधानं करून बसतो आणि मग त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं ते आपल्याला समजत नाही. असे फाटलेले संवाद रफू करून देणारा एखादा शिंपी मिळाला तर त्याला कामाचा कधीही तुटवडा पडणार नाही. एका राजाला असा शिंपी मिळाला आणि त्याने त्या राजाची कशी मदत केली ते वाचा ‘रफू’ ह्या काव्यकथेत …
राजाच्या दरबारी आला कलाकार तो करी सलाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || धॄ ||
राजा म्हणतो त्याला
असती मम दरबारी
शिंपी निपुण प्रभारी
शिवणकला ती सारी
मला सांग मी तुजला
कशास ठेवू जवळ
शिवणकला ती सकल
त्यात काय ते नवल
शिंपी म्हणतो कपडे नाही रफू करीन मी बोल तमाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || १ ||
राजा त्याला सांगे
मनुष्य दिसशी भला
नवलाची ती कला
दाखव लवकर मला
शिंपी म्हणतो संगे
राहीन चोवीस तास
मिळता तो सहवास
कला दाखवीन खास
संधी मिळता दिसेल तुजला मम कौशल्याचे परिणाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || २ ||
राणीस एकदा राजा
दावी नवा महाल
जगतात हा विशाल
म्हणतो तिला खुशाल
राणीच्या माहेरी
होती मोठी शान
महाल होता छान
राणीला अभिमान
राजा खजील झाला
चढे राणीचा ज्वर
सेवेसी सत्वर
शिंपी तो तत्पर
महाल असती सारे
विटेच्यावरी विट
महाराजांची रीत
त्यात मिसळली प्रीत
हसला मनात शिंपी जेव्हा द्रवे राणीचे अंतर्याम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || ३ ||
राजाच्या भेटीला
आला एक नरेश
ओलांडुनीया वेस
मोठा त्याचा देश
राजा म्हणतो लग्न
युवराजाचे येर्इ
फक्त जवळचे स्नेही
आमंत्रण मी देर्इ
नरेशास आमंत्रण
नव्हते आले ध्यानी
नरेश मोठा मानी
झाली असती हानी
शिंपी म्हणे रिवाज
आमंत्रण वरवरचे
स्नेही ते दूरचे
तुम्ही आमुच्या घरचे
नरेश होर्इ प्रसन्न शिंपी हसतो राजा पुसतो घाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || ४ ||
साधू एकदा आला
राजाच्या दरबारा
मनी पापाला थारा
करीन पाणउतारा
म्हणतो मजला हवा
पुत्र तुझ्यासम गुणी
असशी मोठा दानी
दे मजला तू राणी
काय हवे ते माग
राजा वदला होता
पडला असता खोटा
प्रसंग बाका मोठा
शिंपी म्हणे नॄपाला
नसे पित्याचे छत्र
एकच उपाय मात्र
बनव तयाला पुत्र
बोल बोलला शिंपी आणखी लज्जित झाला तो उद्दाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || ५ ||
राजा सांगे रानी
हत्ती आला पुढून
दात तयाचे धरून
टाकलाच फाडून
दरबारातील सारी
मान खालती वळे
फार बोललो बळे
राजालाही कळे
शिंप्याकडे पाहतो
आशेने अंधुक
होती त्याची चूक
शिंपी राही मूक
शिंपी म्हणे नॄपाला
रफूच माझे काज
कसे करावे आज
जर फाडीलेस गजराज
एका मर्यादेच्या पल्याड घाल तू मुखावरी लगाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || ६ ||
राजाच्या दरबारी आला कलाकार तो करी सलाम
शिवणकलेचे घेर्इन दाम रफू करीन ते माझे काम || धॄ ||